पतींना अर्धांगवायूचा (Paralysis) झटका आला आणि आयुष्य निराशेच्या गर्तेत जात होते, पण...

- रसिकावीरा सकपाळ, मालाड पूर्व, मुंबई

‘सर्व जगी आम्हां, बापूंचा आधार। नाही मोडणार संकटात’ हा सर्व बापूभक्त श्रद्धावानांचा दृढविश्वास असतो व हा विश्वास सार्थ असल्याची प्रचिती त्यांना वेळोवेळी येत असते. प्रस्तुत अनुभवातील श्रद्धावान महिलेवरसुद्धा जेव्हा एकामागोमाग एक संकटे कोसळतात, तेव्हा दुष्प्रारब्धाच्या फेर्यात सापडलेली ही महिला, तिच्या एका नातेवाईकांनी बापूंबद्दल सांगितल्यावर, गुरुवारी प्रवचनस्थळी येऊन बापूंचे दर्शन घेते आणि ह्या पहिल्या भेटीपासूनच परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होते...

सन २००२ पासून मी सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या भक्तपरिवारातील एक सदस्य झाले. माझा पुढील अनुभव हा मला आलेला बापूंचा पहिला अनुभव आहे.

सन २००१ मध्ये मला मुलगा झाला. तो साधारण ६-७ महिन्यांचा असताना अचानक माझे पती रवीसिंह सकपाळ ह्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांचा कमरेखालचा संपूर्ण भाग लुळा पडला. काय करायचे काहीच सुचेनासे झाले. आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांनी रवीसिंहला ७-८ दिवसांसाठी त्यांच्या रुग्णालयात दाखल करून घेतले. रवीसिंहच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. डॉक्टरांनी, रवीसिंह ह्यांना दुसर्या रुग्णालयात हलवा असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही ह्यांना दुसर्या चांगल्या रुग्णालयात दाखल केले. तिथेही फारसा काही फरक न जाणवल्याने डॉक्टरांनी, "ह्यांना बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन जा" असे सुचवले. तिथल्या डॉक्टरांनीही अनेक चांगले उपचार केले, पण ह्यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नसल्याने तेही निराश होत म्हणाले, "आता सर्व उपचार झाले आहेत. एक शेवटचा पर्याय म्हणून ह्यांना लिलावती रुग्णालयात घेऊन जा". 

आमची आर्थिक परिस्थिती खरे तर खूपच बिकट होती. आम्ही मीरारोडला एका गृहस्थांकडे फ्लॅटही बुक केलेला होता. दर सहा महिन्यांनी रु.५0,000/- त्याला द्यायचे, असे ठरवून आम्ही ते घर घेणार होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही पन्नास हजाराचा पहिला हफ्ता त्यांना देऊन झाला होता. कालांतराने आमची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की मला ते पन्नास हजार त्यांच्याकडून परत घ्यावे लागले. आमच्या डोक्यावरील घराचे छप्पर पूर्णपणे गेलेले होते. उपचार तर होणे आवश्यक असल्याने आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथल्या उपचारांमुळे ह्यांच्या प्रकृतीत जरा फरक पडला. पण हवा तसा फरक दिसून येत नव्हता. 

मग परिचित-मित्रपरिवार-नातेवाईक ह्यांच्या सांगण्यावरून माझगाव डॉकमधील एका डॉक्टरांकडे आम्ही गेलो. तिथे दहा इंजेक्शन्सचा कोर्स केला. डिस्चार्ज घेऊन घरी आलो. पण काहीच फरक पडत नव्हता. पैशापरी पैसा जात होता आणि मानसिक ताण होत होता, तो वेगळाच. ह्यानंतर आई, भाऊ, नणंद असे सर्व कुटुंबीय एकत्र आलो आणि ठरवले की ‘आपण जमेल ते उपचार करून झालेले आहेत. आता फक्त देवावर विश्वास ठेवावा. तो जे काही करेल ते योग्यच करेल.’ आमच्या हाताता इतर कुठलाच पर्याय नव्हता. तरीही जे कोणी काही सांगेल त्याप्रमाणे आम्ही तो-तो उपाय करून बघत होतो. कोणाच्यातरी सांगण्यावरून मालिशही करायला सुरुवात केली. स्वत: माझ्या सासूबाई त्या वयात ह्यांची मालिश करायच्या, ह्यांची सेवाशुश्रुषा करायच्या. तरीही काहीच फरक पडला नव्हता.

आमची स्थिती इतकी वाईट होती की त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. अशातच आमचे एक नातेवाईक, जे बापूंचे भक्त आहेत, ते आमच्या घरी रवीसिंह ह्यांची विचारपूस करण्यास आले. त्यांना मी सुरुवातीपासूनची आमची पूर्ण हकीगत सांगितली. ह्यावर ते म्हणाले, "वहिनी, तुम्ही आता कुठेही जाऊ नका. काहीही करू नका. तुम्ही बांद्राला श्रीहरिगुरुग्राममध्ये, जिथे आमचे सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे प्रवचन व सत्संग असतो, तिथे येऊ शकाल का"? मी "हो" म्हटले व त्याप्रमाणे त्या गुरुवारी मी व आई  प्रवचनाला गेलो. बापूंची एन्ट्री झाली व त्यांचे प्रवचन सुरू झाले. मला काही सुचत नव्हते कारण मी बाळालाही बरोबर आणले होते आणि ते माझ्या मांडीवर होते. बापूंकडे बघताच मला रडू कोसळले. असे का होत आहे, हे मला कळत नव्हते, पण मी खूपच रडत होते. बापूंनी बोलताना माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या एका नजरेमधूनच माझा, ‘एका बापाला आपल्या लेकीचे दु:ख कळले आहे’ हा विश्वास बसला. बापूंची नजर पडताच अचानक माझा हुंदका थांबत होता व नंतर मी पुन्हा रडत होते. पण मला विश्वास होता की बापूंना माझी मूक भाषा, माझे दु:ख कळते आहे.

इतक्यात प्रवचन सुरू असतानाच माझ्या दिरांचा मला फोन आला. ते मला म्हणाले, "वहिनी, तुला माहीत आहे का आत्ता काय झाले ते? अगं, आपला रवी आपल्या हॉलपासून ते बेडरूमपर्यंत भिंतीचा आधार घेत एकटा चालला!" काऽऽय! मी काय ऐकते आहे त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. खरे तर ही अशक्यप्राय गोष्ट होती. ह्याचे कारण असे की आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो होतो, तेव्हा तिथल्या प्रख्यात डॉक्टरांनी मला आणि आईला स्पष्टपणे सांगितले होते, "हा पेशंट जर उभा राहिला तर ह्याचे व तुमचे भाग्यच समजा. नाहीतर तुम्हाला हा मांसाचा गोळा कायमचा सांभाळावा लागणार आहे". त्यामुळे रवीसिंह बरे होणे अशक्य आहे हे आम्ही मनाने जवळजवळ स्वीकारलेले होते. एकवेळ आमची स्थिती अशी होती की रिपोर्ट आणायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. माझ्या नणंदेचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांचीही आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तरी तिने स्वत:चे दागिने गहाण ठेवून रवीसिंहचा रिपोर्ट आणलेला होता व चाचण्या केल्या होत्या. माझा भाऊही मला वेळोवेळी ५०० रुपये देत मदत करत होता.

अशा बिकट परिस्थितीत मी बापूंच्या प्रवचनाला पहिल्यांदा जाते काय, तिथे त्यांचा कृपाकटाक्ष माझ्यावर पडतो काय आणि इथे घरी रविसिंह प्रथमच चालायला लागतात काय! सर्वच अतर्क्य होते! ‘अशक्याचे शक्य’ होताना दिसत होते. ह्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलत गेली, चांगले दिवस दिसू लागले. ५ वर्षाच्या आत बापूकृपेने मला ‘म्हाडा’मध्ये घरही मिळाले. ह्यानंतरही माझ्या आयुष्यात अनेक समस्या आल्या. पण आता आम्ही घाबरणार नव्हतो...कारण आता आमचा ‘बाप’...आता आमचा बापू आमच्या पाठीशी घट्टपणे उभा होता. बापूंनी दर वेळी मन:सामर्थ्य देऊन आम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढले. प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यास मला धडधाकट व सक्षम बनवले. खरंच...जन्मोजन्मी आम्हाला तुझ्याच चरणांशी ठेव बापूराया! मी अंबज्ञ आहे.