अशक्याचे शक्य करणारे बापू 

- संजयसिंह जाधव, रेंदाळ, कोल्हापूर

हा अनुभव वाचणार्‍यांपैकी कुणाला तरी ‘हे कसे शक्य आहे?’ असे नक्की वाटेल. पण जे घडले, ऐकले व स्वत: अनुभवले ते सर्व पूर्णसत्य मांडले आहे. असो. तर अशा रितीने ह्या भयंकर प्रसंगातून व दरोड्याच्या खोट्या आळामधून माझ्या बापूंनीच मला वाचवले, हा माझा ठाम विश्वास आहे. बापूराया, तुझ्या श्रद्धावान भक्तांसाठी नेहमीच अशक्याचे शक्य होत असल्याचे आम्ही पाहतो.

मी 1996 साली कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळहून मुंबईला नोकरीच्या शोधात गेलो होतो. त्याच दरम्यान माझ्या एका नातेवाईकांकडून मला सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंबद्दल माहिती मिळाली. सन 2003 पर्यंत मी मुंबईत होतो. पण त्यानंतर घरच्यांच्या आग्रहास्तव मी परत रेंदाळला आलो. मी रेंदाळला आल्यानंतर आमच्या येथील एका प्रसिद्ध उद्योजकांकडे कामास लागलो. पेट्रोल पंप, हॉटेल्स्, सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक असे त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. माझी पारख करून मालकांनी माझ्यावर हळूहळू महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यास सुरूवात केली. आणि मग ‘तो’ भयंकर प्रसंग माझ्यावर ओढवला. 

तर घडले असे - 

1994 पासून वर्षातून एकदा 5 ते 6 दिवस कामातून सुट्टी घेऊन मी देवदर्शनासाठी पंढरपूर, गाणगापूर अशा तीर्थक्षेत्रांना जाऊन येतो. तशीच यावेळीदेखील दिनांक 4 एप्रिल ते 11 एप्रिल 2008 या दरम्यान मालकांना पूर्वकल्पना देऊन रीतसर सुट्टी घेतली व देवदर्शनाला जाऊन आलो. 

कामावर असताना मी रात्री मालकांच्या बंगल्यावरच झोपतो कारण मालक व त्यांचे कुटुंबीय कोल्हापूरला असतात. पण त्या दिवशी प्रवासामुळे थकल्याकारणाने रात्री घरीच झोपलो. दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून मालकांच्या जनावरांच्या गोठ्यात जाऊन, काढलेले दूध घेतले. ते दूध ‘दूधसंघा’त देऊन मी सकाळी 7 च्या दरम्यान बंगल्यावर गेलो. तिथे जाऊन बघतो, तर काय....

....बंगल्याचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतमध्ये गेल्यानंतर समोरील दृश्य पाहून अंगाला घामच सुटला. बघतो तर काय, बंगल्यातील सामान विस्कटलेले होते. चोरी झाली आहे हे माझ्या लक्षात आले. घाबरल्यामुळे मनातल्या मनात बापूंचा धावा करू लागलो. मी त्वरीत मालकांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. 

थोड्या वेळाने मालक आले. त्यांनी बंगल्याची सर्व पहाणी केली. मग त्यांनी आम्हांला सांगितले की तिजोरी फोडून त्यातील 20 तोळे सोने व 35 किलो चांदी व काही रोख रक्कम असे मिळून जवळजवळ दीड कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता चोरांनी लुटली आहे. 

क्षणभर आम्ही ऐकणारे सर्व अवाकच झालो होतो. त्यानंतर मालकांनी पोलीस स्टेशनला फोन करून दरोडा पडल्याची माहिती दिली. थोड्या वेळाने पोलीस आले. पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. माझ्या रोजच्या कामानुसार मालकांच्या मित्रमंडळींना मी चहापाणी देऊ लागलो. 

तितक्यात मालकांनी मला वरच्या मजल्यावर येण्यासाठी हाक मारली. 

त्या ठिकाणी मालक व पोलीस अधिकारी उपस्थित होते. मालकांनी बहुधा संशयित म्हणून माझेच नाव घेतले असावे. कारण त्यांतील एका अधिकार्याने मला जवळ बोलावले व अक्षरश: माझी कॉलर पकडून आणि रागाने मोठ्या आवाजात त्याच्या कंबरेला लावलेल्या बंदुकीला हात लावत मला म्हणाला की ‘संज्या, लेका चोरी झालेली मालमत्ता व चोर कुठे आहेत ते इथेच सांग, नाहीतर तुझे काही खरे नाही’. ते वाक्य ऐकून अक्षरश: माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्या व्यक्तीच्या घरात मी गेली 6 वर्षे प्रामाणिकपणे काम करीत होतो; घरच्या एखाद्या सदस्याप्रमाणे वावरत होतो, त्या मालकानेच माझ्यावर आळ घ्यावा, आरोप करावा, ह्याचा त्या क्षणी मला मोठा धक्का बसला होता.

पण मी स्वत:ला सावरले, मनात ‘हरि ॐ बापू’ म्हणालो. माझी कॉलर धरलेल्या त्या अधिकार्याचा हात मी बाजूला करत त्यांना एवढेच म्हटले की, ‘साहेब, उगाच काही बी आळ घालू नका, माझा दरोड्याशी काहीही संबंध नाही’. त्यावर तो पोलीस अधिकारी पुन्हा रागाने ओरडला की, ‘एऽऽऽ, तू उगाच थापा मारून नाटक करू नकोस. तू देवदर्शनाला गेल्यानंतरच हा दरोडा कसा पडला रे? तूच चोरांना सर्व माहिती दिलीस व संशय नको म्हणून देवदर्शनाचे नाटक केलेस. कुठल्या तरी मस्त ठिकाणी मौजमजा करत बसला असशील. गपगुमान सगळं खरं सांग, नाहीतर तुला....’

मी पूर्णपणे निर्दोष होतो. मी मालकांना म्हणालो की ‘मालक, मला ह्यातील काहीच माहिती नाही. तुम्ही माझ्यावर कितीही खोटा आळ घातला तरी मी घाबरून खोटा जबाब देणार नाही एवढेच सांगतो.’ (मनात मात्र ‘हरि ॐ बापू! मला यातून सोडवा’ असे म्हणालो.)

पण माझ्या मालकांना, मी तो दरोडा घालण्यासाठी चोरांना मदत केली आहे असेच वाटत होते. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली असेल. मालकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी मला संशयित आरोपी म्हणून अटक केली व हातात बेड्या घालून पोलीस व्हॅनमध्ये बसवले. गाडी पोलीस स्टेशनकडे निघाली. 

माझ्या डोक्यात, घडलेल्या प्रकारामुळे विचारांचे थैमान सुरू झाले होते. मी डोळे बंद केले व मनातच बापूंशी बोलू लागलो. ‘बापू, तुम्ही माझ्यावर इतकी वाईट वेळ येऊच कशी दिली, तुम्ही हे थांबवायला पाहिजे होते’ असे म्हणत मी बापूंना दोष देऊ लागलो होतो. 

मी मनात हे वाक्य बोलतोय, तितक्यात व्हॅनचा ब्रेक करकचून दाबल्याचा आवाज झाला. मी दचकून डोळे उघडून ‘गाडी का थांबली’ हे बघण्यासाठी समोर पाहिले, तर एक गाय अचानक गाडीपुढे आडवी आल्यामुळे ड्रायव्हरने तसे केले होते. गाडीतले सर्वजण पुन्हा एकदा सावरून बसले. त्यानंतर अचानकपणे एक कॉन्स्टेबल मला म्हणाला की ‘तू चोरीत सामील आहेस की नाही हे कळेलच, पण मी एवढेच सांगतो की जर तू निर्दोष असशील आणि त्या दरोड्याच्या रात्री जर तू त्या बंगल्यात झोपला असतास तर दरोडेखोरांनी पहिल्यांदा तुला ठार मारले असते व मगच दरोडा घातला असता, हे माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून मी तुला सांगतो.’ एवढे बोलून तो गप्प बसला. 

कुणीतरी गाढ झोपेतून एकदम हलवून जागे करावे असे मला झाले. अंगावर खरोखरच ‘सर्रर्रर्रर्र’ करून काटा आला. म्हणजे बापूंनी मला अडचणीत आणले नव्हते, तर उलट माझे प्राण वाचवले होते आणि मी मात्र बापूंना दोष देत होतो. माझे डोळे पाणावले, मी मनोमन बापूंची माफी मागितली. 

खरं तर मी देवदर्शनाची तारीख थोडी पुढे ढकलणार होतो. परंत त्याचवेळी मी देवदर्शनासाठी परगावी जावे हे माझ्या मते 108% त्या दयाळू सद्गुरुतत्त्वानेच योजून आणले होते. दरोड्याच्या वेळी मी जर बंगल्यात असतो तर कदाचित त्या दरोडेखोरांनी माझा मुडदाच पाडला असता. 

हा विचार मनात पक्का होताच माझा बापूंवरील विश्वास आणखीनच वाढला व माझे बापू मला ह्या प्रसंगातून बाहेर काढतीलच ह्या विश्वासाने, इथून पुढे येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मी तयारी केली. 

पोलीस व्हॅन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. मला कोठडीत टाकण्यात आले. माझी पत्नी व मुले यांनादेखील या घटनेनंतर मानसिक धक्का बसला होता. मी निर्दोष आहे याची त्यांना पक्की खात्री होतीच. तुरुंगात माझ्यावर काय बेतेल, या विचाराने तेही काळजीत पडले होते. 

मला अटक झाल्याच्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये, दरोडा पडल्याची बातमी पहिल्या पानावर आली होती. माझे नाव तर चौकटीमध्ये ठळक शब्दांत ‘संशयित आरोपी’ म्हणून छापले होते. माझ्या अटकेची बातमी सर्वत्र पसरली होती. त्यामुळे माझ्या घरातील लोकांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. 

इथे पोलीसकोठडीत, ‘मी दरोडेखोरांना सामील आहे’ असे वाटणार्या पोलिसांनी माझ्याकडून कबुलीजबाब घेण्याकरिता सौम्य ते कठोर असे सर्व उपाय वापरण्यास सुरुवात केली होती.

ह्यांमध्ये एकदा तर, माझे मनोधैर्य खचून मी कबुलीजबाब द्यावा म्हणून हाताला दोर बांधून पोलीस स्टेशनपासून गावच्या मुख्य चौकापर्यंत माझी वरात काढण्यात आली. ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, त्या गावातले सगळेच ओळखीचे, त्यामुळे मी मान खाली घालूनच चालत होतो. त्यामुळे मला फक्त माझ्या गळ्यातील बापूंचे लॉकेट व त्यावरील बापूंचा फोटो दिसत होता. मनात बापूंचा जप चालू होता आणि माझ्या डोळ्यांतील अश्रुधारांनी आपसूकच बापूंना अभिषेक होत होता. बापू नक्कीच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी मी स्वतःची समजूत काढत होतो.

त्याचबरोबर पुढील सात दिवसांत असे अनेक अधिकाधिक कठोर प्रकार माझ्या बाबतीत केले गेले. मी फक्त मनात बापूंचा जप चालू ठेवून ते सर्व सहन करत होतो.

ह्या सर्व प्रकारात माझी बापूंवरची श्रद्धा कायम होती. मला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर माझ्या घरचे जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आले, तेव्हाच मी बापूंचा आशीर्वाद देतानाचा कव्हरफोटो असलेले ‘कृपासिंधु’ मासिक व उपासनेला लागणार्या इतर गोष्टी मागवून घेतल्या होत्या व आह्निक, ‘ॐ मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः’ हा तारकजप व अन्य उपासना, तसेच आरती वगैरे रोज करीत असे. त्याचबरोबर काही शिसपेन्सिलीही मागवून घेतल्या होत्या. त्यांनी मी तुरुंगाच्या भिंतींवर बापूंचा जप लिहीत असे. जेवढे दिवस पोलीसकोठडीत होतो, तेवढ्या दिवसांत एक भिंत जपाने भरत आली होती. 

ह्यामुळेच ह्या सगळ्या भयंकर प्रकाराला सामोरे जाण्यासाठी माझे मनोधैर्य कायम राहिले, असे मला वाटते. इतके की एकदा एक कॉन्स्टेबल न राहवून माझ्यावर ओरडलाही की ‘तू काय माणूस आहेस की जनावर? इतके होऊनही तू हूं की चूं करीत नाहीस. इतर कैद्यांना आम्हाला फरफटत ह्या खोलीत आणावे लागते, तू स्वतःच्या पायांनी चालत येतोस.’

मी मागे वळून त्याला एवढेच म्हणालो, ‘माझा बाप....माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू माझ्यासोबत आहेतच. तेच हा त्रास सहन करायची ताकद मला देत आहेत व पुढेही देत राहतील, हा माझा ठाम विश्वास आहे.’ तो माझ्याकडे बघतच राहिला.

तुरुंगात मला येऊन भेटण्यासाठी माझ्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना ठराविकच वेळ दिला गेला होता. त्यावेळी मला ते येऊन भेटत असत. भेटल्यानंतर माझ्या पत्नीने सांगितले की माझ्या आई-वडिलांनाही ‘मी दोषी आहे’ असे वाटल्यामुळे त्यांनी मला तुरुंगात येऊन भेटण्याचे टाळले आहे. या बातमीमुळे मी आणखीनच दु:खी झालो. मात्र अधिकाधिक नेटाने उपासना करत होतो. 

असे आठ दिवस गेले. आठव्या दिवशी नेहमीप्रमाणे बापूंची उपासना.... दिवसभर इतर सर्व ठरल्याप्रमाणे झाले....संध्याकाळ झाली. पत्नी व मुले भेटायला आली. आज काय माहीत, पण त्यांना बघितल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रूच वाहू लागले. त्यांना कळू नये म्हणून मी डोळ्यांवरून हात फिरवून स्वत:ला सावरले. कारण पोलिसांचा जीवघेणा बनलेला रिमांड, समाजात झालेली नामुष्की व पत्नीची, मुलाबाळांची, आई-वडीलांची भविष्यातील चिंता या सर्व विचारांमुळे मी फारच खचून व थकून गेलो होतो. कदाचित त्यामुळेच माझ्या डोळ्यातून पाणी आले असावे.

प्रथम मी मुलांशी निवांत व मनमोकळेपणाने बोललो. काही जबाबदारीच्या गोष्टी सांगितल्या. ‘आईची व आजी-आजोबांची काळजी घेत जा’ असे सांगितले, पण पुन्हा एकदा माझे डोळे पाणावले. पत्नी व मुलेही रडू लागली. नंतर त्यांना सावरत मी म्हटले, ‘बापू आहेत, ते सर्वकाही सांभाळून घेतील, तुम्ही धीर सोडू नका’. 

त्यानंतर मी मुलांना बाहेर जाण्यास सांगितले व मी माझी पत्नी अमिता हिच्याशी बोलू लागलो. तिच्याशी बोलताना आज भेटण्याची वेळ लवकरच संपत चालली आहे, असे वाटले. अमिताशी मी मनमोकळेपणाने बोललो. मध्येच एकदा बाहेरील कॉन्स्टेबल ओरडून म्हणाला की ‘वेळ संपली आहे.’ 

अमिता निघून चालली होती. मी तिचा हात धरला व तिला थांबवले व म्हणालो की ‘आता मी फारच थकलो आहे. फक्त बापूंच्या स्मरणाने येत असलेल्या ताकदीमुळेच मी इथवर सगळं सहन केले, पण आता सहन होत नाही गं. फारच त्रास होतो या सगळ्यांचा! मी तुला मोकळेपणाने व खरंच सांगतोय की उद्या सकाळी बापूंची उपासना केल्यानंतर मी स्वत:ला संपवून घेणार आहे. तू मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घे. त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न कर.’ 

माझ्या ह्या वाक्यामुळे ती जास्तच रडू लागली. ती मला ‘असे काही करू नका’ असे सारखे विनवीत होती. तोपर्यंत बाहेरून एक लेडीज कॉन्स्टेबल आत आली व तिने माझ्या पत्नीच्या हाताला धरून तिला बाहेर नेले. पाणावलेल्या डोळ्यांनी ती बाहेर जातानादेखील माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत होती. आम्हां दोघांना अजून बरेच काही बोलायचे होते, पण वेळ संपली होती. 

सायंकाळचे 7 वाजले. त्या दिवशी रात्रीचे जेवणही मी घेतले नाही. रात्री झोपण्यापूर्वी मी बापूंचे स्मरण, नामस्मरण करून बापूंशी एवढेच बोललो की, ‘बापू, माझी मनःस्थिती तुम्हाला माहीतच आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे’ असे बापूंशी बोलून मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण डोक्यातील विचारांच्या थैमानामुळे मला काही झोप लागली नाही. 

रात्रभर मी जागाच होतो. पहाटेचे 4 वाजले होते. मी अंथरुणातून उठलो, ते स्वत:ला संपवून घेण्याच्या पक्क्या इराद्यानेच! 

मी आंघोळ करून आलो. माझ्या नेहमीच्याच उपासनेच्या जागी मी बसलो. ‘कृपासिंधु’ मासिक समोर ठेवले. त्यावर बापूंचा आशिर्वाद देणारा फोटो होता. मी उपासना पूर्ण केली. आन्हिकही केले. बापूंची आरती केली, त्यानंतर डोळे मिटून पुन्हा एकदा बापूंना मनापासून नमस्कार केला. पत्नी व मुलांची मनातल्या मनात माफी मागितली. 

माझ्याजवळ दाढी करण्यासाठी आणलेले ब्लेडचे पाकिट ठेवले होते. त्यातील एक ब्लेड उजव्या हातात धरून, डाव्या हातातील शिर कापण्यासाठी त्यावर मी ठेवले.

सकाळी 5 चा सुमार असेल. इथे पोलीसस्टेशनच्या आतील बाजूस मी स्वत:ला संपवून घेण्याच्या तयारीत लागलो होतो, तर त्याचवेळी बाहेरील बाजूस पोलीस स्टेशनमधील लँडलाईनची रिंग बराच वेळ पूर्णपणे वाजून बंद झाली होती. 

जेव्हा तिसर्यांदा लँड लाईनची रिंग वाजली, तेव्हा मी हाताची नस कापून घेण्यासाठी मनात धाडस जमा करतच होतो. पण ‘करू की नको’चा खेळ माझ्या मनात 5 ते 10 मिनिटे चालला होता. तितक्यात कॉन्स्टेबल ओरडतच माझ्याकडे आला व म्हणाला की ‘अरे संज्या....लेका! तू सुटलास की रे, ते चोर काही वेळापूर्वीच सापडलेत!’ 

त्याचे ते वाक्य ऐकून अक्षरश: माझे सारे शरीर आनंदाने शहारून आले. डोळ्यातून भराभरा आनंदाश्रु वाहू लागले. मी ब्लेड बाजूला फेकले. समोर बापूंचा फोटो होताच. मी रडत रडतच अक्षरश: त्या फोटोसमोर लोटांगण घातले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी जोरात ओरडलो की ‘बघा, मी सांगत होतो ना की ‘बापू माझा सद्गुरु, माझा बाप आहे आणि तो मला वाचवणारच’!

त्याने मला कोठडीबाहेर काढले. पोलीस स्टेशनमधील सर्व कॉन्स्टेबल व इतर कैदीही माझ्या त्या आवाजाने जागे होऊन आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिले होते. 

तो फोन इचलकरंजी पोलीस स्टेशनमधून आला होता. पोलीसप्रमुख स्वत: त्यावेळी फोनवरून बोलत होते. दरोडा घातलेले ते चोर इचलकरंजी स्टँडवर पहाटे 4.30 वाजता मुद्देमालासोबत सापडले असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर हेही सांगितले की ‘तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये कैद असलेला संशयित आरोपी संजय जाधव यास त्वरित तुरुंगातून बाहेर काढा. आम्ही पोलीस व्हॅनमधून त्या चोरांना तुमच्याकडे घेऊन येत आहोत.’ 

त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीसप्रमुख व इतर सर्व स्टाफ माझ्याशी अदबीने बोलू लागला.

पोलीसप्रमुख तर म्हणाले देखील की ‘अरे, तू म्हटल्याप्रमाणे खरंच तुझ्या बापूने तुला सोडविले की रे!’ 

मग त्यांनी मला ‘हे बापू कोण? कुठले?’ याची विचारपूस केली. मी त्यांना, बापूंची भक्ती कशी करू लागलो हे सविस्तर सांगितले. त्यानंतर मी त्यांना ‘कृपासिंधु’ मासिक वाचण्यासाठी दिले. ते खुर्चीवर बसून मासिक चाळू लागले. मी समोरील खुर्चीवर बसलो होतो. 

पण माझे लक्ष आमच्या बोलण्याकडे नव्हतेच. माझ्या मनात प्रश्न पडला होता की ‘बापूंनी हे कसे घडवून आणले असेल? नेमके काय घडले असेल?’ 

असे बरेच प्रश्न मनात येत होते व एकच उत्सुकता लागून राहिली होती. साहेबांचे व माझे बोलणे चालू होते, तेवढ्यातच इचलकरंजीहून ती पोलीस व्हॅन आमच्या पोलीस स्टेशनला चोरांना घेऊन पोहोचली. ते चारजण होते, चौघांनी मिळून दरोडा घातला होता. आमच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी प्रथम त्या चोरांना माझ्याकडे बोट करून विचारले की ‘ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? चोरीसाठी याने तुम्हाला काही मदत केली आहे का?’

त्यावर त्यांतील एका चोराने ‘आम्ही याला ओळखत नाही’ असे स्पष्ट सांगितले. मात्र हे सांगत असताना त्याची नजर पोलीसप्रमुखांच्या टेबलावर ठेवलेल्या बापूंच्या ‘कृपासिंधु’ मासिकावरच होती व हे बोलतच तो टेबलाजवळ आला. 

त्याच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले स्पष्टपणे जाणवत होते. त्याने पोलीसप्रमुखांची परवानगी घेऊन ‘कृपासिंधु’ मासिक हातात घेतले. त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या बापूंच्या फोटोकडे तो चोर एकटक पाहतच राहिला होता. पोलीसस्टेशनमधील सर्वजण त्या चोराकडे आश्चर्याने पाहात होते. 

काही सेकंदांसाठी त्या ठिकाणी भयाण शांतता पसरली होती....

तितक्यात त्या मासिकावरील बापूंचा फोटो पोलीसप्रमुखांना दाखवत त्या चोराने विचारले की ‘साहेब, हा माणूस कोण? चोरी केलेल्या क्षणापासून हा आमच्या मागेच आहे, असा आम्हाला सारखा भास होतोय. हा दिसायचा आणि दिसेनासा व्हायचा. याच्यामुळेच आमचे पसार होण्याचे प्लॅनिंग सतत बदलत गेले, नाहीतर आम्ही केव्हाच पसार झालो असतो. एखाद्या पोलीस अधिकार्‍यासारखा हा दिसतो म्हणून आम्ही जास्तच घाबरलो होतो. आजदेखील सकाळी इचलकरंजी एस.टी स्टँडवर आम्ही गेलो, तर हा तिथेदेखील समोरच्या बाकड्यावर बसलाय की काय असे आम्हाला वाटले. कोण आहे ही व्यक्ती? खरंच हे पोलीस अधिकारी आहेत का?’ असे अनेक प्रश्न विचारून तो चोर बोलायचा थांबला. 

त्याच्या त्या वाक्यानंतर माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला. माझ्या डोळ्यांत पाणी जमा होऊ लागले होते. हा अनुभव वाचणार्यांपैकी कुणाला तरी ‘हे कसे शक्य आहे?’ असे नक्की वाटेल. पण जे घडले, ऐकले व स्वत: अनुभवले ते सर्व पूर्णसत्य मांडले आहे. असो. तर अशा रितीने ह्या भयंकर प्रसंगातून व दरोड्याच्या खोट्या आळामधून माझ्या बापूंनीच मला वाचवले, हा माझा ठाम विश्वास आहे. बापूराया, तुझ्या श्रद्धावान भक्तांसाठी नेहमीच अशक्याचे शक्य होत असल्याचे आम्ही पाहतो. आज मी व माझे घरातील सर्व आनंदी व सुखी आहोत, ते फक्त तुझ्यामुळेच! आमच्याकडून अशीच भक्ती व सेवा तू करवून घे. ‘बापू, तू आमचा सद्गुरु, मित्र, बाप सर्वकाही आहेस.