विलक्षण मानवधर्म भाग - १

डॉक्टर म्हटलं की आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते. रुग्णांना तपासून त्यांची चिकित्सा करणारे, आधार आणि दिलासा देणारे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. एखाद्या वैद्यकपद्धतीतील तज्ञ डॉक्टर हा त्याच्या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान आणि नैपुण्य संपादन करतो, विलक्षण कामगिरी करतो, तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या मनात साहजिकच आदरभाव निर्माण होतो.

पण जर एखादे डॉक्टर त्यांच्या क्षेत्रात अत्यंत प्रवीण असतातच, पण त्याचबरोबर त्यांचा अन्य वैद्यकशास्त्रे, वेद, दर्शनशास्त्रे, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या, विज्ञान, माहिती-तन्त्रज्ञान (इन्फॉर्मेशन-टेक्नॉलॉजी), इतिहास, नाट्य, लोककला, संगीत, कलाप्रकार, क्रीडाप्रकार, व्यायाम, वाङ्मय, पत्रकारिता, प्रसारमाध्यमे अशा अनेक विषयांचा दांडगा व्यासंग असतो आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ञमंडळी त्या डॉक्टरांच्या विलक्षण अद्भुत व्यक्तिमत्त्वाने भारावून जातात, तेव्हा अशा डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वास आपण काय म्हणणार!

एखादे डॉक्टर नेहमीच्या शर्ट-पँटच्या पेहरावात विष्णुसहस्रनामावर अनेक वर्षे मुंबईसारख्या शहरात प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर प्रवचन करत असतील, त्यातून अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वयाचा मार्ग स्पष्ट करत असतील, तर आपल्याला त्यात विलक्षणत्व वाटणारच.

असं हे विशेष विलक्षण अद्भुत व्यक्तिमत्त्व म्हणजे दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैयधर जोशी. त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रत्यक्षच्या वाचकांना आहेच, पण अशा या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे कार्यदेखील विशेष आणि विलक्षण आहे.

या विज्ञाननिष्ठ आध्यात्मिक मित्राने, ज्या काळात नॅनो टेक्नॉलॉजी, क्लाऊड कॉंप्युटिंग, रोबोटिक्स, लेझर टेक्नॉलॉजी, स्वार्म इंटेलिजन्स, बायॉटिक्स, स्मार्ट हाऊसेस, जुगाड, स्मार्ट सिटी यांसारख्या क्षेत्रांचा भारतात नुकताच प्रवेश होत होता, त्या वेळी अशा विषयांवर स्वत: अनेक तासांची सेमिनार्स कंडक्ट केली.

अनेक तासांच्या सेमिनार्समध्ये या विषयांबद्दल डॉ. अनिरुद्धांनी म्हणजेच बापुंनी दिलेली माहिती आणि त्यांचे भविष्यकालीन महत्त्व यांबद्दलचे बापुंचे विवेचन ऐकून त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळी थक्क झाली. ‘काळाच्या पुढे राहता आलं नाही तरी हरकत नाही, पण बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या काळाबरोबर राहणं आवश्यकच आहे’, हे बापुंनी आम्हाला शिकवले आणि ‘प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे’, हे बापुंनी आमच्या मनावर ठसवले.

‘ज्यांच्याकडे कुठलाही वैयक्तिक स्वार्थ कधीच नव्हता अशी ज्ञानेश्‍वर महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, चोखोबा महाराज, पुरंदरदास, तुलसीदास, नरसी मेहता, देवी अंडाळ, रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभु आदि समस्त संतमंडळी जर ठामपणे सांगत आहेत की परमेश्‍वर आहे, तो क्षमाशील आहे, तर मग परमेश्‍वर आहेच, नक्कीच आहे, यासाठी मला अन्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही’ असे ठाम प्रतिपादन करून बापुंनी ‘वादविवादातून काहीही साध्य होत नाही, उलट परमेश्‍वराची भक्ती आणि त्याच्या गरजू लेकरांची सेवा करणे म्हणजेच भक्ती आहे’, हा संतांनी सांगितलेला भक्तीचा अर्थ आम्हाला व्यवस्थितपणे समजावला.

सुशिक्षित सुसंस्कृत समाजाला बापुंनी अध्यात्माची गोडी लावली, तरुणाईला अध्यात्माकडे वळवलं. ‘भक्ती करणे हे भ्याडांचे काम नसून शूरांचे कार्य आहे’, हे बापुंनी आमच्या हृदयावर ठसवले. काही जणांचा असा गैरसमज असतो की भक्ती ङ्गक्त भित्री व दुबळी माणसेच करतात. पण बापुंनी आम्हाला सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचन्द्र बोस, गुरु गोविंदसिंहजी महाराज हे सर्व भक्त होते आणि हे सर्व शूरच होते, यांनी प्रचंड पुरुषार्थ केला, पराक्रम केला म्हणजेच भक्ती हे शूरवीरांचेच काम आहे.

भक्तिमार्गावर येऊन माणसे दुबळी बनतात या भ्रामक समजुतीतून बापुंनी आम्हाला बाहेर काढलं. उलट, भित्र्या व दुबळ्या व्यक्तीने मन:पूर्वक भक्तीचा अंगीकार केल्यास भक्तिमार्ग हा भित्र्याला निर्भय, अडाण्याला ज्ञानी, बलहीनाला शक्तिशाली आणि संकुचित मनाला विशाल बनवितो. बापुंनी हा सिद्धान्त आमच्या मनावर ठसवला. ‘बँक’ म्हटले की आपल्याला साधारणपणे आर्थिक व्यवहार करणारी बँक आठवते. ‘रामनाम बँक’ ही अद्भुत आध्यात्मिक संकल्पना बापुंनी प्रत्यक्षात उतरवली. रामनामवही लिहिताना नामस्मरणाबरोबर ध्यानही घडते, मनाची एकाग्रता वाढते. रामनामवही देऊन बापुंनी आमचा एकाकीपणा दूर केला, मनातील निरर्थक द्वन्द्वांचा लोप केला. भक्तांनी लिहिलेल्या रामनामवह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती घडवण्याचे पर्यावरण-हितकारक कार्यही बापुंच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे सुरू आहे.

श्रीसाईसच्चरिताचे वाचन, पारायण आम्ही करत होतो. ‘साईसच्चरितातील ओव्यांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजीचे प्रयोग दडले आहेत’, ‘साईसच्चरितावर परीक्षा घेता येतील’, असे जर आम्हाला कुणी म्हणाले असते, तर त्या वेळी नक्कीच आम्हाला हे सांगणे विक्षिप्तपणाचे वाटले असते.

पण जेव्हा साईसच्चरितातील ओव्यांची उकल वैज्ञानिक प्रयोगांच्या (उदा. मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी, प्रिझम इत्यादि) आधारे करून बापुंनी साईसच्चरितातील भक्तिसिद्धान्तांचे विवेचन केले, तेव्हा साईसच्चरित जीवनात उतरवण्याचा सहजसोपा मार्गच आम्हाला सापडला. बापुंनी श्रीसाईसच्चरितावर आधारित पंचशील परीक्षांची सुरुवात केली, तेव्हा या परीक्षा ही भक्तिमार्गावर चालून स्वत:चा जीवनविकास साधण्याची एक ‘विशेष’ आणि ‘विलक्षण’ संधी आहे, हे आम्हाला जाणवले.

बापुंनी जेव्हा वस्त्र - चरखा योजना मांडली, तेव्हा आज स्वतन्त्र भारतात विज्ञान-तन्त्रज्ञान प्रचंड प्रगत झालेले असताना, चरखा चालवणं ही अनेकांना विक्षिप्त कल्पना वाटली. चरखा योजना गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळवून देणारी आणि गरजू कुटुंबाना अन्न मिळवून देणारी आहे, ही संकल्पनाच अनेकांच्या मनास पटत नव्हती. पण आज ही योजना वरील दोन्ही उद्देश यशस्वीपणे साध्य करून अत्यंत उपयोगी सिद्ध होत आहे.

चरखा चालवताना श्रद्धावान नामस्मरणही करतात, त्यामुळे एकाच वेळेस भक्ती आणि सेवा घडत असते, ही विशेष गोष्ट या योजनेतून साधण्याची संधी आम्हाला मिळाली. ज्यांच्यासाठी योजना राबवली जात आहे आणि जे ती राबवत आहेत, श्रम वेचत आहेत अशा उभयतांचा एकाच योजनेतून लाभ होणे हे बापुंच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या भक्तिसेवा कार्याचे विलक्षणत्वच आहे.

स्वत:च्या परिश्रमातून आपल्या गरजू बांधवांसाठी सूत काढण्याचा बापुंचा दृष्टिकोन अनोखाच होता. या योजने अंतर्गत हजारो शालेय गणवेशांचे वाटप आजवर केले गेले. गेली बारा वर्षे कोल्हापुर - पेंडाखळे गावाजवळील अनेक शाळांमधील विद्यार्थांना गणवेश वाटप केले जाते. या वर्षी (२०१६ साली) प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ११८३० गणवेशांचे वाटप केले गेले.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत साधारणतः ९०-९५ विद्यार्थी, तसेच गरोदर स्त्रियांना रोज एका वेळेचे अन्न दिले जाते. ‘चरखा अन्नपूर्णा’ योजनेअंतर्गत येथील स्थानिक चरखा चालवतात. त्यासाठी त्यांना चरखा, पेळू इत्यादी वस्तुंचे मोफत वाटप केले जाते. लड्या जमा झाल्यावर श्रमदान करणार्‍यांना धान्याचे वाटप केले जाते. यामुळे दैनंदिन पोट भरण्यासाठी या श्रमजीवींना कोणापुढेही हात पसरावा लागत नाही. अशा प्रकारे आतापर्यंत अंदाजे ५५०० लड्या जमा झाल्या आहेत व त्याद्वारे साधारणतः ३५ कुटुंबांना धान्य वाटप करण्यात येते.

बापुंचे प्रत्येक कार्य त्यांनी सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या उद्दिष्टांना पूर्ण करत उत्तुंग ध्येयाच्या दिशेने वाटचाल करते. बापू सांगतात की महान ध्येय (एम) निश्चित केले की त्याच्या पूर्ततेसाठी आपण करावयाच्या परिश्रमांचे आपापल्या कुवतीनुसार क्रमवार छोटे छोटे टप्पे आखावेत म्हणजेच उद्दिष्टे (ऑब्जेक्टिव्हज्) ठरवावीत व हळूहळू आणि शांतपणे, उतावीळपणा न करता प्रयास करत ते टप्पे पार करत रहावेत. मग ध्येयपूर्ति सहजच संपन्न होते. त्यामुळे पालघर येथील दुर्गम भागात सुरू असलेली, आज लहान वाटणारी ही सेवा येणार्‍या काळात हळूहळू नक्कीच व्यापक रूप धारण करेल यात शंका नाही.

‘अपयश ही यशाची पहिली पायरी नाही, उलट यशाच्या विरुद्ध दिशेने नेणारे अपयश का आले याचा व्यवस्थित अभ्यास करावा, आपल्या कुवतीबाहेरच्या उद्दिष्टांच्या पायर्‍या आपण आखत नाही ना याचा विचार करावा आणि त्याचबरोबर आपण सरावात कमी तर पडलो नाही ना हेदेखील पहावे’, असे बापू सांगतात. शिक्षण आणि सराव अर्थात थेअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे अभ्यास हे सांगून, प्रयासांचे महत्त्व आमच्या मनावर ठसवून बापुंनी आम्हाला यशाचा मार्ग दाखवला. गणवेश नसल्यामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ कुणाही विद्यार्थ्यावर येऊ नये हा बापुंचा या योजनेमागील उद्देश आज उत्तमपणे सफल होत आहे आणि त्यामुळेच चरखा योजना ही कष्टकरी समाजासाठी, विशेषत: दुर्गम भागातील गरजूंसाठी अत्यंत हितकारी, दूरगामी बदल घडवून आणणारी परिणामकारक योजना ठरत आहे.

घरातील जुने कपडे, जुनी भांडी, जुन्या वस्तू, जुनी खेळणी ही सोन्यासारखी आहेत, असे म्हटले तर यावर काही जण हसतीलही; पण दुर्गम भागातील बांधवांसाठी आमच्या जुन्या वस्तू सोन्याप्रमाणे मौल्यवान असतात, हे सत्य आहे. बापुंनी मांडलेल्या ‘जुने ते सोने’ ह्या योजनेअंतर्गत गरजूंना वस्त्र-भांडी-वस्तु-वाटप केले जाते, त्यांच्या मुलांना खेळणी दिली जातात, आज अव्याहतपणे मागील १४ वर्षे ही योजना सुरू आहे.

त्याचप्रमाणे या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले जाते व दिवाळीत कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केले जाते. पावसाचे पाणी अडवण्यासाठी ‘वनराई बंधारा’ बांधण्याचे काम गेली काही वर्षे सुरू आहे. ‘बिगर-राजकीय दैनिक’ ‘प्रत्यक्ष’ची सुरुवात करण्याचा बापुंचा निर्णय त्यावेळी अनेकांना धाडसी तर काहींना विक्षिप्तही वाटला. वृत्रपत्रक्षेत्राच्या दृष्टीने हे एक फारच मोठे साहसी पाऊल होते; पण दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या दमदार वाटचालीतून बापुंच्या निर्णयाचे विशेषत्व आणि विलक्षणत्वच सिद्ध झाले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या दैनिकापासून पत्रकारितेची सुरुवात करणार्‍या वरिष्ठ पत्रकार पुष्पाताई त्रिलोकेकर गेली साडेपाच दशके या क्षेत्रात कार्यरत आहेत. बापुंच्या या निर्णयाबद्दल ऐकताच त्यांनाही आश्‍चर्य वाटले. याबद्दल त्या लिहितात - ‘मला आठवते, ‘प्रत्यक्ष’ प्रत्यक्षात सुरू होण्याआधी त्या अराजकीय (बिगर-राजकीय) दैनिकाची कल्पना त्यांनी (बापुंनी) आम्हाला सांगितली होती. आम्ही निखळ व ठणठणीत राजकीय पत्रकारितेतली माणसे! पत्रकारितेची सुरुवातच मुळी दैनिक ‘मराठा’सारख्या चळवळीच्या वृत्तपत्रातून झालेली! त्यामुळे राजकारण हा तर आमच्या पत्रकारितेचा प्राणच होता. त्यामुळे ‘अराजकीय दैनिक’ या कल्पनेनेच आम्हाला ‘विलक्षण’ हादरवून टाकले. राजकारणविरहित वृत्तपत्र हा विचार मात्र खरोखरच ‘क्रांतिकारी’ होता. पण बापूंनी मात्र तो विचार प्रत्यक्षात उतरवला आणि ‘प्रत्यक्ष’ सुरूही झाले.’

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi, pratyaksha, pratyaksha logoप्रत्यक्ष सुरू झाल्यापासून पुष्पाताई आजपर्यंत प्रत्यक्षमध्ये नियमित साप्ताहिक सदर लिहीत आहेत. सातव्या वर्षाच्या प्रत्यक्ष वर्धापन दिनाच्या विशेषांकात त्या लिहितात- ‘दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या दरेक अंकांची वाटचाल मला रोजच बघायला मिळते आहे. बापूंनी ठरवल्याप्रमाणेच त्यांच्या कल्पनेतील ‘अराजकीय’ दैनिकाने आता निश्‍चित आकार घेतलेला आहे आणि दर्जेदार, दमदार वाटचाल चालवली आहे.’

‘प्रत्यक्ष’ अवतरल्याला आज अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. बिगर राजकीय दैनिक प्रत्यक्षची ही सिंहवत् वाटचाल खरोखरच अद्भुत आहे. बापुंच्या समर्थ लेखणीने अनेक विषयांचा ऊहापोह केला आहे, करत आहेत. दि. २३-१२-२००५च्या अग्रलेखात बापू लिहितात- ‘मतदानपत्रिकेच्या सर्वांत शेवटच्या कॉलममध्ये ‘वरील कुठल्याही उमेदवाराला मला मत द्यायचे नाही’, असाही एक पर्याय अवश्य असावा. मतदानाची गणना करताना, ही शेवटच्या कॉलममधील निगेटिव्ह मतेही स्वतंत्र मोजली जावीत.’ बापुंनी मांडलेला हा विचार आज प्रत्यक्षात उतरल्याचे आम्ही अनुभवत आहोत.

भारतावर जिवापाड प्रेम करणार्‍या बापुंचा लोकशाही मूल्यांवर प्रचंड विश्‍वास आहे. सन २००८मध्ये मुंबईवर झालेल्या पाकपुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून प्रत्येक भारतीय लोकशाहीच्या संवैधानिक मार्गाने आपले मत कसे मांडू शकतो, हे बापुंनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले. बापुंनी स्वत: अग्रलेखांद्वारे दहशतवादी पाकिस्तानचा निषेध तर केलाच, पण तातडीने काय पावले उचलणे आवश्यक आहे याबद्दलही परखडपणे मते मांडली. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्याकरिता युद्ध सैन्य निधिमध्ये प्रत्येकाने एक एक रुपया संबंधित सरकारी कचेरीत जाऊन जमा करावा, हेदेखील बापुंनी श्रद्धावान मित्रांना सांगितले आणि स्वत: कुटुंबियांसह जाऊन हे कृतीत उतरवले.

बापुंच्या श्रद्धावान मित्रांनी दहशतवादी पाकिस्तानचा धिक्कार करणारी आणि भारताने दहशतवादी पाकिस्तानला ताबडतोब आक्रमणाने चोख उत्तर द्यावे अशा आशयाची पत्रे व ई-मेल्स केन्द्र सरकारला पाठवले. दहशतवादी पाकिस्तानशी युद्ध करण्याची घोषणा लिहिलेल्या काळ्या फिती धारण करून सर्वांनी देशप्रेमासह स्वमतही व्यक्त केले. अशा प्रकारे पत्रे लिहून, ई-मेल्स पाठवून, युद्धनिधीत एक रुपया जमा करून काय परिणाम साधला जाणार आहे, असा विचार काही जणांच्या मनात आलाही असेल. पण संसदेत या सर्व गोष्टींची दखल घेतली गेली, तेव्हा बापुंच्या विचारांची विलक्षणता सर्वांच्या लक्षात आली. लोकशाही मार्गाने, विधायक पद्धतीने आणि शासनयन्त्रणेवर कोणत्याही प्रकारचा भार पडू न देता आपले मत कसे मांडावे याचा हा वस्तुपाठच होता. लोकशाहीच्या या बलस्थानांची ओळख या प्रक्रियेत बापुंनी सर्वांना पटवून दिली. सन २००६ साली डॉ. अनिरुद्धांनी लिहिलेल्या ‘तिसरे महायुद्ध’ या पुस्तकातील अनेक गोष्टींचा पडताळा गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या आणि सध्याच्या जागतिक रंगमंचावरील घटना पाहता जागरुक वाचकाला येत आहे.

आज आम्ही पाहतो की अमेरिकी कॉंग्रेस सदस्य फ्रँक वुल्फ, इस्रायल संरक्षणमंत्री मोशे यालॉन, जॉर्डन किंग अब्दुल्ला बिन हुसैन यांसारख्या जगातील काही नेत्यांनी, अनेक वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांनी ‘तिसरे युद्ध सुरू झाले असल्याचे’ मत मांडले आहे. स्वत: पोप फ्रान्सिस यांनी ‘सध्या जगात तिसरे महायुद्ध सुरू असल्याचे’ म्हटले आहे, तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील रशियाकडून क्रिमिया हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास तिसर्‍या महायुद्धाला तोंड फुटेल असे एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या त्रिकुटाचा जगाला असणारा धोका बापुंनी स्पष्टपणे पुस्तकात मांडला आहे आणि आज साऊथ चायना सी मध्ये चीनची चाललेली दादागिरी, उत्तर कोरियाच्या आक्रमक हालचाली आणि दहशतवाद्यांचे नंदनवन बनलेला पाकिस्तान ही सध्याची परिस्थिती पाहता बापुंनी त्यावेळी मांडलेले निष्कर्ष किती अचूक आहेत, हे आता जगाच्या समोर आले आहे.

दहशतवाद्यांचे थैमान, ब्रेक्झिटनंतर बदललेली युरोपीय देशांमधील समीकरणे, निर्वासितांचा प्रश्‍न, स्प्रिंगसारखी आंदोलने, हिंसा, अशान्ती, अस्थिरता अशा आज जगात चाललेल्या अनेक घडामोडी तिसर्‍या महायुद्धाची परिस्थिती गडद करणार्‍या आहेत. बापुंनी केलेल्या विश्‍लेषणानुसार जग ध्रुवीकरणाच्या दिशेने चालले असून यातून जगात मोठा उत्पात घडत आहे.

तिसर्‍या महायुद्धामुळे जगात घडत असलेल्या घटनांची माहिती प्रत्यक्षच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बापुंनी दैनिक प्रत्यक्षच्या रोजच्या अंकातील तीन पाने याच विषयासाठी ठेवली आहेत. बापू सांगतात त्याप्रमाणे ‘आजूबाजूचं परखड वास्तव माहीत नसणं म्हणजेच अंध:कार आणि अंधारातच घात होतो.’ आमच्या जीवनातून या अंधाराला दूर करण्याचे विशेष आणि विलक्षण कार्यच प्रत्यक्षच्या माध्यमातून बापू करत आहेत. 

सध्याचे युग हे माहिती- तंत्रज्ञानाचे युग आहे व त्यामुळे जग जवळ येत चालले आहे. त्याचबरोबर जागतिक पटलावर देशादेशांमध्ये आणि समाजांत भेद पडून माणूस माणसापासून दूर जात आहे.

‘आत्यंतिक निवृत्तिवाद आणि ऐहिक स्वार्थाशी निगडित प्रवृत्तिवाद या दोन्ही एकांतिक गोष्टींनी व्यक्तिजीवनात व समाजात असमतोल तयार होतो’ या बापुंच्या सिद्धान्तानुसार विज्ञाननिष्ठ आध्यात्मिक ‘अनिरुद्धांनी’ भक्तीच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकवणारा, परमेश्वरी ऐश्‍वर्य प्राप्त करून देणारा जीवनाचा महामार्ग, हा भक्तिसेवेचा विलक्षण महामार्ग सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला आहे, अगदी प्रत्येकासाठी.