धृतशरधनुषं - रामाच्या आयुधांची खरी ओळख

दुःखबंधनातून मुक्ती देणारा ‘रामबाण’

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू रामरक्षा या स्तोत्रमंत्र मालिकेतील ७व्या प्रवचनात सांगतात की जसा आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब शेवटी समुद्रालाच मिळतो, तसंच कोणत्याही भाषेतून किंवा प्रदेशातून आलेली भगवंताच्या विविध पवित्र स्वरूपांची भक्ती ही फक्त त्या परमेश्वरालाच जाऊन पोहोचते. या भक्तीला आणि प्रेमाला कशाचेही बंधन नसते. परंतू मानव जीवनात दुःखांच्या अनेक बंधनांनी आपण जखडलेलो असतो, त्यातून मुक्त करणारा खरा उपाय म्हणजे ’रामबाण’. म्हणूनच ‘रामबाण उपाय’ किंवा ‘रामबाण औषध’ हे शब्द आपण वापरतो.

‘धृतशरधनुषं’ – हातातील धनुष्याला बाण लावलेला राम

रामरक्षेच्या ध्यानमंत्रात रामाचे वर्णन “ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं” असे आहे, म्हणजेच ज्याने हातात धनुष्य-बाण धारण केलेले आहे असा राम. राम नेहमी फक्त धनुष्य-बाण धारण करताना दिसतो, इतर कुठलेही शस्त्र तो धारण करीत नाही. म्हणूनच बुधकौशिक म्हणजेच विश्वामित्र ऋषी, ज्याने हातातील धनुष्याला बाण लावलेला आहे अशा अवस्थेतील रामाचे ध्यान करण्यास सांगतात.

रामाच्या बाणाचे सात अद्वितीय गुणधर्म

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी या प्रवचनात रामाच्या बाणाचे सात अद्वितीय गुणधर्म सांगितले आहेत. त्यातील पहिला म्हणजे, तो नेहमी अचूक असतो आणि त्या बाणाची अचूकता व कार्य रामाच्या इच्छेनुसार असते. रामाच्या इच्छेप्रमाणे जर बाण शत्रूच्या छातीतून आरपार जाणार असेल परंतू त्याचा प्राण घेणार नसेल तर तसेच घडते. या बाणाचं खास वैशिष्ट्य असं की, तो फक्त वाईटाचा नाश करतो आणि कधीही चूक करत नाही.

सैतान म्हणजे अभाव – रामबाण म्हणजे भावनिर्मिती

परमेश्वर कधीही कोणाचे वाईट करत नाही. परमेश्वर भावस्वरूप आहे. परमेश्वराचा अभाव माझ्या मनात उत्पन्न होणे म्हणजेच सैतान. म्हणूनच अभावाला म्हणजेच सैतानाला वेगळं अस्तित्व नाही. जेव्हा परमेश्वर फक्त साक्षीरुपाने राहतो त्यामुळे त्याची क्रियाशीलता जेथे नसते तेथेच सैतानी वृत्तीचा उदय होतो आणि रामबाण जेव्हा अशा सैतानाच्या छातीवरून, सैतानी वृत्तीच्या माणसाच्या छातीवरून जातो, तेव्हा तो भाव उत्पन्न करतो. रामबाण अचूक आहे; चुका सुधारणारा आहे.

सद्‌गुरु अनिरुद्ध बापू एका कथेद्वारे समजावतात की रामाचा बाण अभाव घालवण्यासाठी दुसर्‍या ठिकाणाहून काही आणत नाही, तर जिथे अभाव आहे तिथेच भाव निर्माण करतो. उदा. जर रामाला एका विशिष्ट ठिकाणी बाण मारून गंगा आणायची असेल तो त्या विशिष्ट ठिकाणापासून जेथे गंगा आहे तिथपर्यंत त्याच्या बाणाने जमिन छेदून गंगा आणण्याऐवजी राम जेथे बाण मारतो तेथेच गंगा उत्पन्न होते. रामाने धनुष्याला बाण लावलाय असे आम्ही त्याचे ध्यान करत असताना, हा बाण माझ्यामध्ये येऊन माझ्यातलं सगळं वाईट दूर करणार आहे, माझ्या प्रारब्धाचा नाश करणार आहे हा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये आधिकाधिक दृढ होत जातो आणि त्यामुळे माझे अष्टभाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून जे पाणी वहायला लागेल ना, ती गंगा असते, रामाच्या बाणाने उत्पन केलेली गंगा असते जी माझ्या संपूर्ण आयुष्याला पावित्र्य देते.

जखम भरून परत येणारा रामबाण

रामाच्या बाणाचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राम त्याच्या बाण तो ज्या दिशेने पाठवतो त्याच दिशेने परत येतो. हा बाणामुळे जी जखम निर्माण केली असते तीच जखम भरून काढत तो बाण परत येतो. जखम झाली म्हणजे शरीरातील पेशींचा अभाव निर्माण झाला. त्या अभावाचे रुपांतर भावात करण्यासाठी तो बाण पुन्हा त्याच दिशेने परत येतो म्हणजेच त्याच्या अक्षयभात्यामध्ये परत येतो.

वेदनारहित व रक्तरहित रामबाण

तिसरं वैशिष्ट्य म्हणजे रामाच्या बाणाला कधी रक्त लागत नाही आणि रामबाण कधीही वेदना देत नाही. रामाचा बाण जेव्हा कुठल्याही सजीवाच्या शरीरामध्ये शिरतो मग तो सजीव कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्याचे शरीर रामाच्या बाणाचे स्वागत करते. त्या बाणाला सजीवाच्या शरीराचा प्रत्येक भाग वाट करून देतो.

१०८ शक्तीकेंद्र जागृत करणारा रामबाण

चौथं वैशिष्ट्य म्हणजे रामाचा बाण शरीराच्या कुठल्याही भागातून गेला तरी तो संपूर्ण शरीरातील सर्व १०८ शक्तीकेंद्रांना जागृत करतो.

आवाहनाशिवाय/आव्हानाशिवाय न सुटणारा रामबाण

रामाच्या बाणाचे पाचवं वैशिष्ट्य म्हणजे समोरच्याने आवाहन केल्याशिवाय किंवा आव्हान दिल्याशिवाय राम बाण कधीच सोडत नाही. बाण फक्त आवाहन किंवा आव्हान झाल्यावरच सुटतो. राम हा पूर्ण सत्वगुणी असल्यामुळे तो अचल (Masterly Inactive) आहे. आम्ही त्याला जोपर्यंत आवाहन करत नाही तो पर्यंत तो चल होत नाही आणि बाण सोडत नाही. रामाचा प्लॅन नेहमी समोरच्या व्यक्तीवरूनच ठरतो. म्हणूनच त्याला चल करण्यासाठी रावणापेक्षा हनुमंतासारखे भक्त होणे केव्हाही चांगले आहे.

प्रेम व द्वेषानुसार लागणारी रामबाणाची संख्या

सहावं वैशिष्ट्य म्हणजे आमचे रामावर जेवढे प्रेम व भक्ती जितकी गाढ, तितक्या कमी बाणांची गरज लागते; याउलट द्वेष जितका अधिक, तितके अधिक बाण लागतात. याबद्दल सद्‌गुरु अनिरुद्ध बापू सांगतात की रामाने रावणासाठी असंख्य बाण वापरले परंतू आपण आधीच्या प्रवचनातील कथेत ऐकल्याप्रमाणे हनुमंताला मारलेल्या एकाच बाणाने राम स्वतः ही घायाळ झाला.

ध्यास लागल्यावरच सुटणारा रामबाण

रामाच्या बाणाचे सातवं वैशिष्ट्य म्हणजे रामाचा बाण फक्त तेव्हाच सुटतो जोपर्यंत समोरील व्यक्ती शत्रुत्वाने किंवा मित्रत्वाने रामाचा ध्यास घेत नाही. आणि आम्हाला एकदा का रामाचा ध्यास लागला की रामाचा बाण सुटतो आणि रामालाही आपला ध्यास लागतो. संत कबीरदास म्हणतात – “राम हमारा जप करे, हम बैठे आराम”. म्हणजे जेव्हा आपण रामाचा ध्यास धरतो, तेव्हा रामालाही आपला ध्यास लागतो. प्रापंचीक जीवनात कुठलाही ध्यास धरावा, पण रामाचा ध्यास मात्र कायम ठेवावा; मग रामाचे कोणतेही रूप असो, कृष्ण असो की महाविष्णु असो. तो एकच आहे. असे ७ वैशिष्ट्य असलेला बाण आपल्या धनुष्यावर लावलेला आहे. हे धनुष्यही विशेष आहे. त्याचे तीन गुणधर्म आहेत:

रामाचे निराकार धनुष्य

रामाचे धनुष्य निराकार आहे, म्हणजेच त्याला कुठलाही विशिष्ट आकार नाही आहे. ते रामाच्याच इच्छेनुसार पाहिजे तो आकार पाहिजे तेव्हा धारण करू शकते.

रामाचे स्थैर्य देणारे धनुष्य

रामाचे धनुष्य सदैव अधः-उर्ध्व या दोन दिशांना स्थिर असते. म्हणजेच ते सरळ आहे, तिरके होत नाही. हे धनुष्य बाणाला योग्य गती व स्थैर्य देते. रामाच्या धनुष्याचे अधः टोक म्हणजे खालचे टोक हे त्याला बाण जोडूनसुध्दा जमिनीला टेकलेले असते, पृथ्वीशी नाते सांगणारे असते म्हणून ते स्थिर असते. राम आपल्या भक्ताला त्याच्या उपासनेचे कुठले फल झेपेल हे जाणतो व तेवढेच फल देते.

रामाचे सदैव कार्यरत असणारे धनुष्य

रामाच्या अवतारापूर्वी आणि नंतरही हे धनुष्य सक्रिय आहे. प्रत्यक्षात रामाचे धनुष्य म्हणजे हनुमंत आहे. हनुमंत म्हणजे रामाचे धनुष्य, आणि त्याची गदा म्हणजे रामनाम. म्हणून जिथे रामनाम आहे तिथे हनुमंत असतोच. राम-हनुमंताचं नाते अतूट आहे.

रामाची आयुधं आणि लक्ष्मण, सीता व हनुमंत

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध पुढे सांगतात रामाचं धनुष्य, रामाचा बाण आणि रामाचा भाता या तीनही आयुधांची मालकी प्रत्यक्षात रामाची नसून, त्यांचा सांभाळ व नियंत्रण महाशेष लक्ष्मण करतो म्हणजेच रामाचा बाण, रामाचे धनुष्य आणि रामाचा भाता, हे रामाच्या अंगावरून काढून ठेवणे आणि परत रामाच्या अंगावर घालणे हे कार्य फक्त तो एकमेव महाशेष लक्ष्मणच करू शकतो. रामाचे धनुष्य म्हणजे हनुमंत, तर हे धनुष्य वापरण्याची इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई.

रामाच्या बाणाचे कार्य म्हणजे आपल्या आयुष्यातील पुरुषार्थ जो निघून गेलेला आहे किंवा धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ति वा मर्यादा ह्या पुरुर्षार्थाचा जो अभाव उत्पन्न झालेला आहे तो पुरुषार्थ पुन्हा सिद्ध करणे. यासाठी आपल्याला रामरक्षेचे पठण करतेवेळी रामाचे ध्यान करताना ‘धृतशरधनुष्यं’ राम म्हणजेच त्याच्या भात्यासकट, बाणासकट आणि धनुष्यासकट राम आपल्या डोळ्यासमोर आणायला हवा.

देवाला शरण जाण्याचे वेड लावणारा ध्यानमंत्र

शेवटी बापू सांगतात की ध्यानमंत्र म्हणताना जेवढे शक्य आहे तेवढे ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी रामरक्षा म्हणतेवेळी, ध्यान करतेवेळी एकेका शब्दावर लक्ष दिले तरी पुरेसे आहे. ध्यानमंत्राचे कार्य काय? तर ह्या ध्यानमंत्रामुळेच मला देवाच्या नामाचे वेड लागतं, मला देवाच्या स्तुतीचे वेड लागते, मला देवाच्या रुपाचे वेड लागते. मला देवाला शरण जाण्याचे वेड लागते. हे सगळं करण्याचं काम जो करतो तो ध्यानमंत्र.