साई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||

आज मागची दीड दोन वर्ष बापूंची "श्रीसाईसतचरित्रावर" हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील "पंचशील परीक्षा" सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं.

बापू म्हणतात, "आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे मला कळत नाही. मग आम्ही नानाविध चुकीच्या मार्गांनी जात राहतो आणि म्हणूनच हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठ भक्ताने साईनाथांच्या उपस्थितीत हे श्रीसाईसच्चरित्र लिहीलय; आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी.

बापू पुढे सांगतात, "आम्हाला पारायणाच्या वेळेस ते संपवण्याची घाई असते व आमचं म्हणावं तसं लक्ष कथेमध्ये जसं असायला हवं तसं राहत नाही व आम्हाला अर्थ म्हाणावा तसा कळत नाही; आम्ही साईनाथांनी काय चमत्कार केला एवढंच फक्त बघतो; व बाकीचा शब्दन शब्द आम्ही विसरून जातो. त्यामुळे आमच्या आयुष्यात चमत्कार घडत नाहीत. कारण मला पहिलं समजलं पाहिजे की चमत्कार कसा घडलाय, कधी घडलाय, आणि कोणासाठी घडलाय. साईनाथांची करुणा मला प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांची करुणा मला झेपता यावी यासाठी मी कसं वागलं पाहिजे हे मला त्या घटनांमधून कळतं. बाबांनी ( साईनाथांनी ) जो चमत्कार केला, घडवला, हा त्या गोष्टीतील result आहे, इतिवृत्त आहे.

ह्या चमत्कारांचं महत्त्व विषद करताना बापू पुढे सांगतात, "म्हणून आम्हाला चमत्काराची पहिल्यापासूनची कथा काय आहे हे माहित पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कथेमध्ये हेमाडपंतांनी फक्त चमत्कार सांगितलेला नाही तर त्या कथेमध्ये त्या त्या भक्ताची स्थिती, त्या भक्ताची वृत्ती आणि त्या भक्ताची "कृती" ह्याचं सुंदर विवेचन केलेलं आहे आणि या सर्वांमधून मला जाणवत राहतं की ही सद्गुरु माऊली आपल्या जीवनात कशी संपूर्णपणे आणि समानपणे पसरलेली असते."

परवाच्या गुरुवारी साईनाथांच्या ११ वचनांनंतर प्रवचन करताना बापू म्हणाले की श्रीसाईसच्चरित्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हेमाडपंत, ज्यांनी श्रीसाईसच्चरित्र लिहीलं, ज्यांच्यामुळे आज आपण साईनाथांना जाणू शकतो, ज्यांच्या हातात साईनाथांनी सर्व चाव्या दिल्या होत्या. अशाच हेमाडपंतांच्या घरी साईनाथांची पहिली घडवलेली मूर्ती आली; आणि कशा प्रकारे तर साईनाथांनी स्वप्नात येऊन हेमाडपंतांना सांगितलं की मी तुझ्याकडे उद्या (होळी पौर्णिमा १९११) जेवायला येतोय; दुपारच्या जेवणाच्या वेळेस येतोय व तशाप्रकारे साईनाथ (हेमाडपंतांकडॆ) आले.

आपण ह्या नव्या वर्षात आपल्या या साईनाथांच्या, साईबाबांच्या, श्रीसाईसच्चरित्राच्या, साईंच्या फोरमची सुरुवात हेमाडपंतांपासूनच करूया.

या फोरमच्या निमित्ताने दर पंधरवड्यात मी एक "Article" पोस्ट करीन; जे कंटिन्यु होत राहील. आपण प्रत्येकजण; जो साईनाथांवर, श्रीसाईसच्चरित्रावर मनापासून प्रेम करतो, सद्गुरुतत्वावर प्रेम करतो, त्या प्रत्येकाने या फोरममध्ये सहभागी व्हावं हेच उचित होईल.

परमपूज्य अनिरुद्ध (बापू) त्यांच्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज (द्वितीय खंड - प्रेमप्रवास) मध्ये श्रीसाईबाबांचा अतिशय प्रेमपूर्वकपणे उल्लेख "माझ्या अन्नमय कोशाचा स्वामी व माझा दिग्दर्शक गुरु" असाच करतात. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यांच्या दोन मंत्रजपांपैकी एक जप हा "ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:" हाच आहे व हाच जप श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी उपासनेला घेतला जातो.

ह्या आजच्या पोस्टने आपण आपल्या फोरमची पुन्हा सुरुवात करत आहोत.

श्रीराम - हरि ॐ - अंबज्ञ

English