गव्हाचे सत्व बनविण्याची पाककॄति (रेसिपी) (recipe-of-wheat-concentrate-gavhache-sattva)

हिंदी      English      தமிழ்      ગુજરાતી      ಕನ್ನಡ      తెలుగు      বাংলা     

FI- wheat2

२७ जून २०१३च्या प्रवचनात बापूंनी विशद केलेल्या गव्हाच्या सत्वाची पाककृति (रेसिपी) येथे देत आहे.

गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुसर्‍या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिसऱ्या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. चौथ्या दिवशी गव्हातील पाणी काढून टाकावे व त्यानंतर ह्या भिजलेल्या गव्हात थोडे नवीन पाणी घालून हे गहू वाटून घ्यावेत (मिक्सरमध्ये अथवा पाट्यावर). अशा प्रकारे वाटलेले गहू पिळून व गाळून तयार झालेली लापशी एका पातेल्यात काढून घ्यावी व ताटलीने झाकून ठेवावी.

सहा ते सात तासांनी भांड्यावरील झाकण उघडून पहावे. गव्हाचे सत्व भांड्यात खाली राहते व वरती पाण्याची निवळ / पाणी दिसते. वरती आलेली पाण्याची निवळ / पाणी काढून टाकावे. अशा प्रकारे तयार झालेले गव्हाचे सत्व बरणी अथवा डब्यात भरुन ठेवावे.

पर्याय १: स्थूल व्यक्तिंकरता :- १) गव्हाचे सत्व - एक वाटी २) पाणी - चार वाटी ३) हिंग - एक छोटा चमचा ४) मीठ (चवीनुसार) ५) जीऱ्याची पुड (चवी पुरती)

वरील मिश्रण एका पातेल्यात घेऊन मंद गॅसवर ठेऊन शिजवावे. हे मिश्रण सतत घोटत राहणे आवश्यक आहे, जेणेकरुन ह्यात गुठळ्या तयार होणार नाहीत.

पर्याय २: कृष (बारीक) व्यक्तिंकरता :- १) गव्हाचे सत्व - एक वाटी २) तुप - दोन चमचे ३) दूध - एक वाटी ४) साखर - दोन चमचे ५) वेलची पावडर (चवी पुरती) एका पातेल्यात दोन चमचे तुप घालून परतावे. आता यात गव्हाचे सत्व घालावे. त्यानंतर त्यात एक वाटीभर दूध व दोन चमचे साखर घालून, मंद गॅसवर शिजवावे. वेलची पावडर (हवी असल्यास) घालून सतत घोटत रहावे. घोटलेल्या मिश्रणास लकाकी आल्यावर ते शिजले आहे असे समजून गॅस बंद करावा.

गव्हाचे सत्व दिवसातून एकदा नेहमीच्या वापरातील वाटी एव्हढे खावे.

(टीप: या रेसिपीचा व्हिडीयो लवकरच देण्यात येईल)