रामरक्षा ध्यानमंत्र - आपल्यातील दोषांचा, दुर्गुणांचा नाश करण्याचा आणि जीवन सुंदर बनवण्याचा मार्ग
रामरक्षेचा खरा विनियोग – रामासाठीच केलेली साधना
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू रामरक्षा या स्तोत्रमंत्र मालिकेतील ६व्या प्रवचनात सांगतात की, आपण रामरक्षा या स्तोत्रमंत्राचे पठण कशासाठी करावे हे सांगणारा श्लोक म्हणजे ’श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग:।’ माझ्या पठणाचा विनियोग म्हणजेच उपयोग हा या माझ्या रामचंद्रासाठीच व्हावा, या रामचंद्राची प्रीती प्राप्त करण्यासाठीच व्हावा अशी प्रार्थना करणारा हा श्लोक आहे . रामरक्षेचे पठण हे स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर रामासाठी आणि रामाच्या प्रेमासाठी केलेली साधना आहे.
भगवंतासाठी केलेले कार्य देते अनंत फळ
बापूंनी उदाहरणे देत सांगितले की, जसे बी पेरल्यावर अनेक पटीने पीक मिळते तसेच स्वतःच्या फायद्याचा त्याग करून देवासाठी केलेले कार्य अनंत फळ देणारे ठरते. फक्त मिळालेले सर्व धान्य सर्वच्या सर्व लगेच वापरण्याऐवजी त्यातील दोन मुठी ध्यान्य बाजूला ठेवून ते योग्य पद्धतीने पेरल्यासच भरपूर प्राप्ती होते. म्हणूनच जेव्हा मी रामरक्षा रामासाठी म्हणतो तेव्हाच रामचंद्र मला काय द्यायचे, कसे द्यायचे आणि कधी द्यायचे व काय द्यायचे नाही हे ठरवतो. कारण तो सर्व जाणतो.
कृपेची बँक आणि जीवनातील खरी संपत्ती
जरी माझ्याकडे अनेक Banks ची डेबीट कार्डस् असतील पण बॅकेत पैसेच नसतील तर ती कार्डस् माझ्या कामाची नसतात. मला चांगले आरोग्य मिळाले आहे, शिक्षण मिळाले आहे, चांगले घर आहे ह्या गोष्टी म्हणजे म्हणजे ही कार्डस् आणि बॅंकेतील माझा साठा म्हणजेच माझ्यावर परमेश्वाची असणारी कृपा. ही परमेश्वराची कृपा हा अक्षय साठा आहे आणि तो असेल तरची मी माझी कार्डस् वापरू शकतो. ही परमेश्वाची कृपा म्हणजेच त्या रामाचे माझ्यावर असणारे प्रेम. रामाचे प्रेम हीच जीवनातील खरी संपत्ती असते.
अकारण कारुण्य, भक्तीची गंगाजळी आणि प्रारब्धाचे कर्ज
सद्गुरु बापूंनी सांगितले की परमेश्वराचे अकारण कारुण्य हे प्रत्येकाच्या जीवनात जन्मतःच असते, पण ते आम्ही किती उधळतो किंवा त्याची किती बचत करतो आणि नवीन संपत्ती किती मिळवतो हे आपल्यावर अवलंबून असते. धनसंपत्ती देवाने निर्माण केली, पण तिचा वापर, चलनव्यवस्था आणि नियम हे मानवाने ठरवले. आपण मिळालेली संपत्ती उधळून टाकतो आणि नवीन कमावत नाही, त्यामुळे भक्तीची बँक रिकामी होते आणि उलट आपल्यावर प्रारब्धाचे कर्ज चढते. संकट आल्यावर आपण देवाची भक्ती सुरू करतो आणि लगेच फळ मिळावे अशी अपेक्षा करतो, परंतू कर्जामुळे आधी झालेले ’डेफिसिट’ म्हणजेच तूट भरून काढणे आवश्यक असते. जेव्हा मी माझ्या फायद्यासाठी काम्यभक्ती करतो तेव्हा त्याचे फळ मर्यादित असते व डेफिसिट भरण्यास वेळ लागतो. पण जेव्हा मी भक्तीपासून लांब गेलो आहे ही जाणिव निर्माण होऊन त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी मी भक्ती करतो तेव्हा माझ्या बँकेतील गंगाजळी वेगाने भरू लागते.
खरी भक्ती - देवाशी अखंड नाते जोडण्याचे साधन
खरी भक्ती ही फक्त लाभासाठी नसून, आपल्या चुका मान्य करून, देवाशी अखंड नाते जोडण्यासाठी असावी. बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेचा उद्देश फक्त श्रीरामचंद्रांच्या प्रीत्यासाठी सांगितला आहे. रामरक्षेच्या आरंभी "अथ ध्यानम्" म्हणजे रामचंद्रांचे सगुण, साकार रूप डोळ्यासमोर ठेवून, हा माझा पिता आहे आणि या विश्वाचा एकमेव त्राता आहे या भावाने, प्रेमाने आणि एकाग्रतेने ध्यान करणे हे आवश्यक आहे.
‘आजानुबाहु’ राम आणि मानवाची शरीररचना
बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेमध्ये ’आजानुबाहुं’ म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे श्रीरामाचे वर्णन केले आहे. बापू म्हणतात की मानव हा इतर प्राण्यांहून वेगळा आहे. आधी मानव चार पायावर रांगल्यासारख्या परिस्थितीतून इतर प्राण्यांसारखा होता. परंतू, मानवाने जेव्हा उभे रहाणे पसंत केलं आणि ते त्याला अधिक सोईचं वाटू लागलं. तेव्हा हातांचे कार्य आणि हातांच्या कार्याची दिशा बदलल्यामुळे हातांची लांबी ही पायांच्या लांबीपेक्षा कमी झाली. मानव हा दोन हात व दोन पाय असणारा व ताठ उभा रहाणारा (इरेक्ट) प्राणी आहे. म्हणजेच त्याचे पाय आणि हात ह्यांची कार्य पूर्णपणे वेगळी झाली आहेत. दोन हातांचं काम दोन पाय करू शकत नाहीत, दोन पायांचं काम दोन हात करू शकणार नाहीत. शरीररचनेतील ही वैशिष्ट्ये मानवाला विशेष बनवतात.
मानवातील शक्तीकेंद्रांची अद्भुत रचना
मानव शरीरात प्रमुख सात चक्रांसह १०८ शक्तिकेंद्रे आहेत, त्यातील २७ नाभीखाली आहेत तर ८१ नाभीच्या वर आहेत. कुठलेही शक्तीकेंद्र हे जसे स्वतंत्रपणे कार्य करते, तसेच इतरांच्या बरोबरीने पण कार्य करते आणि हे एकाचे कार्य सुरू असताना दुसर्याचेही कार्य सुरू असेल तेव्हा ही दोन्ही शक्तीकेंद्रं एकमेकांच्या कार्याला कुठेही विरोध करत नाहीत अशा अनोख्या पद्धतीने ह्यांची रचना केलेली असते. दोन्ही हातामध्ये मिळून चौदा आणि दोन्ही पायामध्ये मिळून चौदा अशी मोजकी शक्तीकेंद्र आहेत. पायामध्ये असणारी जी चौदा शक्ती केंद्र आहेत, ती गुडघ्यापासून खाली आहेत. गुडघा ते मांडीपर्यंत एक ही शक्ती केंद्र नाही आणि हातातली शक्ती केंद्र मात्र दंडापापासून ते बोटांपर्यंत सगळीकडे आहेत. हाताची लांबी ही नेहमी गुढघ्यांपर्यंतच जाईल, त्याच्यापलिकडे जाणार नाही ह्याची काळजी घेतली गेली आणि त्यामुळे चालताना होणार्या हालचालींमध्ये ह्या शक्तीकेंद्राचं एकमेकांशी होणारं घर्षण, त्या व्हायब्रेशन्सचं होणारं घर्षण टाळलं गेलं.
विचार, भक्ती आणि शक्तीकेंद्रांचे कार्य
चांगला विचार केल्याने किंवा भक्ती केल्याने वेगळ्या प्रकारची शक्तीकेंद्र जागृत होतात व वाईट किंवा चुकीचा विचार केल्याने वेगळ्या प्रकारची शक्तीकेंद्र जागृत होतात. सामान्य मानवाला ती नेमकी कुठे आहेत, कशी कार्य करतात हे कळत नाही. पण परमात्म्याच्या अकारण कारुण्यामुळे ही सर्व रचना संघर्षविरहित आहे.
परमात्मा जेव्हा सगुण साकार रूप घेतो तेव्हा त्याच्यातही तशीच शक्ती केंद्र असतात, त्यांची रचना काही वेगळी नसते. परंतू त्याच्या शरीरातील सर्व शक्तिकेंद्रे एकाच वेळी पूर्ण जागृत व समतोल अवस्थेत असतात व त्याच्याच इच्छेनुसार ही शक्तीकेंद्र वागतात. म्हणूनच या रामाला काही घ्यायचे नसते तर फक्त द्यायचेच असते आणि कितीही दिले तरी त्या रामाकडचे कधीही संपत नाही.
सगुण-साकार आणि निर्गुण-निराकार – समान श्रेष्ठता
सद्गुरु अनिरुद्ध बापू पुढे सांगतात की परमात्मा सगुण-साकार देह धारण करतो कारण सामान्य मानवाला निर्गुण-निराकार रूपाचं ध्यान व भक्ती करणे शक्य नाही. सगुण-साकार आणि निर्गुण-निराकार ही परमात्म्याची दोन्ही रूपे समानपणे श्रेष्ठ आहेत. ज्ञानेश्वर आणि रामदासांनी आपल्या ग्रंथामधून अद्वैत सांगितले तरीही त्यांनी सगुण साकार स्वरूपाचीच भक्ती केली.
भक्तांना सहजतेने स्पंदनं मिळावीत म्हणूनच परमात्मा अवतार घेत राहतो. त्याच्या शरीरातील सर्व शक्तिकेंद्र जागृत असतात म्हणून त्याला ज्या प्रमाणात स्पंदने द्यायची असतात त्या प्रमाणात तो भक्तांना प्रतित होतो. स्वामी समर्थांसारख्या महापुरुषांच्या रूपाबद्दल लोकं भौतिक मोजमाप करतात की त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते की त्यापेक्षा जास्त लांब होते. पण त्यांचे मोजमाप करणारे आम्ही कोण? त्याला जेव्हा हवं तेव्हा तो आपली अजानुबाहु, सहस्त्रबाहु किंवा विश्वरूप सारखी विविध स्वरूपं दाखवू शकतो.
‘बद्धपद्मासनस्थं’ – शब्दार्थ आणि आध्यात्मिक अर्थ
बुधकौशिक ऋषींनी ‘ध्यायेदाजानुबाहुं बद्धपद्मासनस्थं’ असं म्हटलं आहे. अजानुबाहु म्हणजे गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे हात, आणि बद्धपद्मासनाचा अर्थ फक्त योगमुद्रा नसून तो अजानुबाहु रूपाशी निगडीत आहे. संस्कृतमध्ये ’बद्धपद्मासनस्थं’ या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. अनेकवेळा भोंदू माणसे संस्कृतमधील शब्दांचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढतात. हे समजावण्यासाठी बापूंनी गुणाध्याय नावाच्या राजाची एक गोष्ट सांगितली. या गोष्टीद्वारे त्यांनी समजावले की संस्कृतमधील शब्दांचे विकृत किंवा चुकीचा अर्थ लावल्यामुळे कसे गैरसमज आणि अंधश्रद्धा निर्माण होतात. म्हणूनच श्रीमद्पुरुषार्थ लिहिताना संस्कृत वाक्यरचना अत्यंत सुस्पष्ट ठेवली गेली, जेणेकरून कोणी विकृत अर्थ लावू नये.
‘बद्धपद्मासनस्थं’ हा शब्द फक्त योगातील आसन नसून, कमळावर बसलेल्या रामाच्या रूपाशी निगडीत आहे. हा अजानुबाहु असल्यामुळे ह्याच्या शरीराचा कुठलाही भाग असो, पायाचा असो की हाताचा असो ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा की रामाच्या शरीरातील प्रत्येक शक्तीकेंद्र इतर सर्व शक्तीकेंद्रांचे कार्य करू शकते.
कमळ – जीवनविकासाचे प्रतीक
साध्या मानवामध्ये प्रत्येक केंद्र फक्त आपलं काम करतं. पण रामाचे प्रत्येक शक्तीकेंद्र सर्व शक्तीकेंद्रांचे काम करू शकते. म्हणूनच तो ‘अजानुबाहु’ आहे. रामाला त्याची कृपा जर भक्ताला प्रदान करायची असेल तर त्याला भक्ताकडे पहाण्याचीही गरज नाही. राम कोठेही असेल, कुठल्याही अवस्थेत बसलेला असेल किंवा उभा असेल, तरीही त्याची कृपा भक्ताला त्याच्या इच्छेनुसार प्राप्त होतेच.
बुधकौशिक ऋषींनी आम्हाला रामाचे ध्यान करताना सगळी बंधनं तोडून टाकली आहेत. ते म्हणतात, ध्यान करताना जर मला संपूर्ण राम दिसत नसेल, फक्त त्याचा कान किंवा नख किंवा केस दिसत असतील तरी त्याचे ध्यान करता येते. रामाच्या एका अवयवाच्या ध्यानानेही अखंड राम अनुभवता येतो. त्यामुळे रामाचे ध्यान जमेल तसे करा. कारण रामाचं प्रत्येक शक्तीकेंद्र इतर सगळ्या शक्तीकेंद्रांचं कार्य करू शकतं.
राम बद्धपद्मासनस्थं आहे, म्हणजेच कमळावर बसलेला आहे. कमळ हे जीवनाच्या विकासाचं प्रतीक आहे, चिखलातून उगवून, लांब देठ वर घेऊन सरळ आकाशाकडे उमलणारे. मानवाने आपले जीवनही असेच कमळासारखे बनवायला हवे. कितीही पापे घडली, चुका झाल्या तरी चिखलातून वर येत राहायचं, आणि सतत स्वतःचा विकास घडवून आणायचा; आणि एकदा का आपले जीवन या कमळासारखे बनले की हा राम बद्ध आहे माझ्या या कमळावर बसण्यासाठी. राम न बोलावताही स्वतः त्या कमळावर येऊन स्थिरावणार आहे.
ध्यानाची फलश्रुती – दुर्गुणांचा नाश
बुधकौशिक ऋषी सांगतात ध्यान करताना फोटोमध्ये जरी राम सिंहासनावर बसला असेल तरीही असे माना की तो माझ्या जीवनावर बसला आहे. “बद्धपद्मासनस्थं” म्हणजेच रामाचं आसन दुसरं काही नसून आपलं स्वतःचं जीवन आहे. तसेच माझे हृदयही कमळाचेच प्रतिक आहे, आणि त्या हृदयातही तोच बसलेला आहे. हेच खरे रामाचे ध्यान होईल.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू प्रवचनाच्या शेवटी म्हणतात, ध्यानामुळे आपल्या दोषांचा, दुर्गुणांचा नाश होतो आणि जीवन गोड, सुंदर बनतं. जसं दही छानल्यावर त्यातील दुर्गंध नाहीसा होऊन त्यातून सुंदर व सुगंधी श्रीखंड तयार होतं, तसंच भक्ती आणि ध्यानामुळे आपले दुर्गुण नाहीसे होतात. कपिलमुनींनी कपिल स्तोत्रात सांगितले आहे की मानवाच्या आत्म्यातील जे काही वाईट आहे ते पुरुष (म्हणजेच परमेश्वर) आणि प्रकृती (म्हणजेच त्या परमेश्वराची भक्ती) यांच्या संयोगामुळे नाहीसे होते. अंतःकरण शुद्ध होते. हा पुरुष आणि प्रकृतीचा संयोग होण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे; आणि या रामरक्षा स्तोत्रमंत्रामध्येच ध्यान कसे करावे हे सांगितले गेले आहे.
