अधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना

हरि ॐ

आपण सर्व श्रद्धावानांनी अनिरुद्ध पौर्णिमेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. ह्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील अधिकृत ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना पादुका वितरण करण्याचा व नवीन मान्यता मिळालेल्या केंद्रांना पादुका प्रदान करण्याचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘पादुका’ स्वरूपात आपले लाडके सद्गुरु बापूच आपल्याबरोबर येत आहेत’ ह्या भावनेने उपस्थित श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यामध्ये चिंब न्हाऊन निघाले, हे आपण सगळ्यांनीच अनुभवले. ह्या वर्षी नव्याने मान्यता मिळालेल्या ७२ ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना पादुका प्रदान करण्यात आल्या.

अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना

केंद्रांना ‘अधिकृत उपासना केंद्र’ अशी मान्यता देताना व त्या अनुषंगाने पादुका प्रदान करताना परमपूज्य सद्गुरु अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार नव्या निकषांचा अवलंब करण्यात आला.

सद्गुरु बापूंच्या मार्गदर्शनानुसार पुढील निकष लावून निर्णय घेण्यात आले आहेत -

१) मेट्रोपॉलिटन सिटीत म्हणजेच महानगरात एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रे असू शकतील. २) देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रे असू शकतील. ३) जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रे असू शकतील. ४) ज्या गावांची लोकसंख्या २ लाखांपेक्षा जास्त असेल, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रांना मान्यता मिळू शकेल. ५) मात्र ज्या गावांची लोकसंख्या २ लाखांपेक्षा कमी असेल, अशा ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रे असणार नाहीत व काही कारणाने घरगुती / प्रायोगिक उपासना केंद्रे तयार झालीच, तरीही त्यांना अधिकृत केंद्राचा दर्जा दिला जाणार नाही.

अनेक गावांमध्ये/शहरांमध्ये श्रद्धावानांच्या सोयीकरिता एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रांना परवानगी देण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी ह्या धोरणाचा विपर्यास करून काही असंतुष्टांनी, मोजक्या श्रद्धावानांना हाताशी धरून, इतर श्रद्धावानांशी जमवून न घेण्याच्या वृत्तीमुळे, चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त अधिकृत उपासना केंद्रांना मान्यता प्राप्त करून घेतली. मात्र आता अशा प्रकारे तयार झालेली केंद्रे पुढील काही काळामध्ये मूळ केंद्रामध्ये विलीन करण्यात येतील, जेणेकरून अशा प्रकारच्या आत्मकेंद्रित वृत्तीला आळा बसेल. इथे दोन केंद्रांमधील अंतराचा कुठलाही निकष असणार नाही. ह्या धोरणानुसारच नवीन अधिकृत उपासना केंद्रांना मान्यता देण्यात येईल, ह्याची सर्व श्रद्धावानांनी, डिस्ट्रिक्ट कमिटी मेंबर्सनी नोंद घ्यावी व घरगुती / प्रायोगिक / अधिकृत केंद्रांमध्ये येणाऱ्या श्रद्धावानांपर्यंत ह्या धोरणाची माहिती पोहोचवावी.

वरील धोरणानुसार ह्याच वर्षी सांगलीमध्ये सांगलवाडी, विश्रामबाग व कलानगर ही अधिकृत केंद्रे, त्यांच्याच विनंतीनुसार, राममंदिर-सांगली शहर ह्या मूळ केंद्रामध्ये विलीन करण्यात आली.

अनिरुद्ध उपासना केंद्रे निर्माण करण्यामागील सद्गुरु अनिरुद्धांची संकल्पना ही ‘सर्व श्रद्धावानांनी एकत्र येऊन, एकदिलाने सामूहिक उपासना करावी व त्याचा अधिकाधिक लाभ श्रद्धावानांना मिळावा’ हीच होती व त्याच्यानुसारच वरील धोरणाला अनुसरून आता केंद्रांना ‘अधिकृत उपासना केंद्र’ हा दर्जा देण्यात येईल.

महेशसिंह झांट्ये (मुख्य कार्यकारी अधिकारी)

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।