नवरात्रीचे महत्त्व (Significance of Navaratri)
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीचे महत्त्व’ याबाबत सांगितले.
आज आत्ता जे श्रीसूक्त योगिंद्रच्या तोंडून मी ऐकत होतो, माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा माझे वयस्कर मंडळी आजोबा, पणजोबा, आज्या, पण ज्या माझ्या नात्यातली मंडळी उपस्थित असायची नवरात्रीमध्ये दोन्ही नवरात्रांमध्ये. अर्ध्या-अर्ध्या वयातल्या स्त्रिया, अर्ध्या काय सगळयाच्या सगळया त्या स्त्रिया वयातल्या ह्या नऊवारीमध्येच असायच्या. सुंदर खोपा घातलेल्या, नाकामध्ये नथ, सगळ्या दागिन्यांनी मढलेल्या आणि बाजूला पगडी घातलेले किंवा कमीतकमी टोपी घातलेले काळी अशी मंडळी बसलेली अशी धोतर-बीतर कोट-बीट घालून व्यवस्थित आणि त्यांच्या खड्या आवाजाने श्रीसूक्त म्हटलं जायचं, एक्झॅक्टली ह्याच प्रकाराने, जो परंपरागत वैदिक परंपरेनुसार चालत आलेला, चालत आलेला छंद आहे, चाल आहे त्यामध्ये.
तर खरचं सांगतो आमच्या लहानपणी दिवाळी पेक्षाही नवरात्रीला जास्त महत्व असायचं. दिवाळीचं महत्व हळूहळू मुंबईमध्ये वाढत गेलं लक्ष्मीपूजन असायचं, बळीराजाचं पूजन असायचं बस तेवढचं आणि सकाळी मंगलस्नान असायचं, भाऊबीज असायची. पण आजचं जेवढ महत्व दिवाळीला आहे, नवरात्रीच कमी होत चाललयं तसं नव्हत. नवरात्रीला उलट सगळ्यात जास्त खरेदी वैगरी करायची ती नवरात्रात आणि नवरात्र सुरू झाली की दसर्यापर्यंत खरचं प्रत्येकाच्या घरी मजा असायची.
घरोघरी घट बसलेले असायचे, घरोघरी चांगली स्तोत्र म्हटली जायची, घरोघरी जागरण व्हायचं. पण तेव्हाचं जागरण हे आजच्या जागरणाचं म्हटलं तर आपण सकाळी सहा पर्यंत करतो. तेव्हा जागरणं जास्तीत जास्त एक, सव्वा, दीड म्हणजे डोक्यावरून पाणी, कारण जेवणं सात-साडेसातलाच झालेली असायची संध्याकाळाची. पण सगळी मंडळी एकत्र येऊन जे एक सुंदर वातावरण तयार व्हायचं आणि त्या वातावरणामध्ये खरचं एक सौंदर्य होतं, एक प्रेम होतं त्या जगन्माऊलीच्या प्रत्येक अविष्काराबद्दलचं प्रेम होतं, ह्यांच्याकडे गेलो ह्यांची देवी कुठली? हे पण कधी विचारलं नाही. तुम्ही कुठल्या देवीचं नवरात्र घातलयं? आम्ही कुठल्या देवीचं नवरात्र घातलयं? देवीचं नवरात्र आहे, आईचं नवरात्र आहे आणि तिकडे जात, रंग, भेद कुठेही मानला जातं नव्हता. सगळ्या स्त्रिया अगदी एकमेकींशी प्रेमाने अगदी व्यवस्थित पूजन करत होत्या, सगळे पुरूष जात होते प्रसाद घेतं होते, सगळे आरत्या अटेंड करत होते. खरचं मंतरलेले दिवस होते नवरात्रीचे, ते दिवस परत आले पाहिजेत आता.
आमच्या लेखी नवरात्र म्हणजे काय? जास्तीत जास्त गरबा खेळायला कुठे चान्स मिळेल, कोणाचं फ्री टिकीट मिळेल तिकडे जायचं आणि गरबा बघून परत यायचं. म्हणजे एक गुजरात वरून आपल्याला ती मिळालेली देणगी आहे गरब्याची ती आपण अशीच घालवली. त्यानंतर देवीच्या मंदिरात, आईच्या कुठल्यातरी महालक्ष्मीला जाऊन, दोन मंदिरात गेलो न गेलो, आम्ही कुळाचार आमच्या गावाला करतात बसं. मग तो चुलत-चुलत-चुलत-चुलत अकरावा चुलतभाऊ असेल तरी आम्ही त्याच्याकडे जे नाही आमच्या घराचे तिकडे आहे म्हणजे आम्हाला करायची जरूरी नाही. मी तुम्ही करा असंही म्हणत नाही, नाही करा असंही म्हणत नाही खरचं सांगतो. परंतु नवरात्री म्हणजे काय हे आपण आज उपनिषदामधून शिकलो आहोत, आपण मातृवात्सल्यविंदानम् मध्ये शिकलो आहोत आई़चं संपूर्ण चरित्र.
हे नऊ दिवस किती महत्वाचे असतात ह्या पृथ्वीवरती, ह्या वसुंधरेवरती. आम्हाला स्त्रीसूक्तम् म्हणता येत असेल आपण म्हणू, आम्ही साधी ‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी’ ही आरती तर करता येते. ही जरी आम्ही नवरात्रात न चुकता घरात अगदी समजा कुठल्या देवीचा फोटो नाही आहे धरून चला, देवीची मूर्ती पण नाही आहे हरकत नाही नुसता बाबा एक गणपती आहे, एक साईबाबा आहे किंवा स्वामीसमर्थ असेल पण त्या देव्हार्याचा घराच्या समोर, देवाच्या फोटो समोर उभं राहून आम्ही रात्रीची तरी सगळ्यांनी एकत्र येऊन दुर्गे दुर्गट भारी आरती म्हणायला काय हरकत आहे. अगदी आरतीच ताट पण घेऊ नका काही हरकत नाही पण प्रेमाने एवढी आरती तरी आम्हाला नवरात्रात म्हणता येईल की नाही, येईल की नाही?... मग तुम्ही म्हणाल की नाही?... पण प्रेमाने करा राजांनो, त्या आईचं स्वागत करायला शिका. त्यावेळी घरामध्ये घटच बसले पाहिजेत, अमुक-अमुकच केलं पाहिजे तमुक-तमुकच केलं पाहिजे असल्या काही रूढींना जवळ करू नका. आम्ही काय कुठला कलश मांडू, फोटो तुम्हाला सजावट वैगरी करायचीय तर जरूर करा. पण ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे आईचा वावर असतो. जो ह्या ग्रंथांच पठण करतो, जो रात्री जागरण करतो त्याच्या मस्तकावर, खांद्यावर आई हात ठेऊन जाते हे आपल्याला माहिती आहे, मग हा चान्स सोडा कशाला मला सांगा, बरोबर की नाही. आयुष्यामध्ये अशा संधी थोड्या असतात, बरोबर म्हणजे असतात ह्या संधी आपल्याला सोडून चालेल का? नाही आणि तिने सांगितलयं मी येते म्हणजे येतच असणार. पण ती येते, ती स्पर्श करते आणि तो प्रखर मातृत्वाचा, अत्यंत सुंदर मातृत्वाचा अनुभव आपण घ्यायलाच पाहिजे.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात नवरात्रीचे महत्त्व याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll