मी पाहिलेला बापू पुस्तकाची प्रस्तावना
मी प्रथम बापूंना पाहिले, ते १९८५ मध्ये. ‘दादाचे नायरमधील सर’ ही बापूंची तेव्हा माझी झालेली प्रथम ओळख. मी शिक्षण संपवून पुण्याहून परतल्यावर बापूंबरोबर काम करण्यास सुरुवात झाली व त्यायोगे बापूंच्या परळच्या क्लिनिकवरही जाण्यास सुरुवात झाली. हे सर्व करत असताना बापूंचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची व त्यांची कार्यपद्धती अनुभवण्याची संधी मिळाली. हे अनुभवत असताना, पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या.
परळच्या क्लिनिकमध्ये रात्रौ उशिरापर्यंत तासनतास न कंटाळता थांबणार्या, गावोगावच्या पेशंट्सशी बोलण्याची संधी मिळाली. या व अशा बोलण्यातूनच ‘दै. प्रत्यक्ष’च्या ‘मी पाहिलेला बापू’या विशेषांकाची संकल्पना पुढे आली.
या आहेत बापूंविषयीच्या आठवणी. ज्यांनी ज्यांनी बापूंना त्यांच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळापर्यंत जवळून पाहिले, अनुभवले आणि जाणले अशा बापूंच्या शिक्षक, सह-अध्यायी, मित्र, शेजारी, पेशंट्स आणि त्यांचे कुटुंबीय, ज्यांना बापूंच्या अनोख्या विलक्षण, असामान्य व्यक्तिमत्वाची झलक अनुभवायला मिळाली, साक्षी होण्याची संधी मिळाली, त्यांच्या या आठवणी आहेत. बापूंविषयीच्या त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजेच ‘मी पाहिलेला बापू हे पुस्तक.
पण काही जणांना प्रश्न पडू शकतो की या आठवणी संग्रहित करायची आवश्यकताच काय? कारण एकच, या सगळ्या आठवणींमधून प्रकर्षाने जाणवत राहते, ते एक समान सूत्र. आपल्या मित्र, आप्त व त्याचबरोबर पीडित आणि उपेक्षितांच्या जीवनातील दुःख, कष्ट व अंधःकार दूर करण्यासाठीचे, त्यांच्या विकासासाठीचे बापूंचे प्रयास, अथक प्रयत्न अगदी त्यांच्या विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंत; आणि जाणवत राहते, ते या सर्वांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षाचे प्रेम व बापूंना या सर्वांविषयी असणारी आत्मीयता, जिव्हाळा आणि अथांग प्रेम; एक अनोखे आणि विलक्षण लाभेविण प्रेम.
आणि या आठवणींतून जाणवत राहतो, तो बापूंचा अनेकविध क्षेत्रांशी असणारा संबंध, त्यांचे त्या क्षेत्रांतील असणारे प्रभुत्व, नैपुण्य व अफाट ज्ञान, जे त्या क्षेत्रांतील एक्स्पर्ट्सनाही (तज्ञांनाही) अचंबित करते. उदाहरण द्यायचेच झाले, तर मल्लखांब व जिमनॅस्टिकचे सर्वोच्च महदाचार्य उदय देशपांडे बापूंच्या त्या क्षेत्रातील कार्यपद्धतीविषयी सांगतात - ‘हे पाहून तेव्हा मला प्रश्न पडायचा की एवढा अभ्यास, एवढे ज्ञान एका व्यक्तीकडे कसे असू शकते?
कारण इतकी वर्षे मी या क्षेत्रात असूनसुद्धा डॉक्टरांनी सांगितलेल्या बर्याच गोष्टी माझ्यासाठी नव्या असायच्या.’ पुढे जाऊन ते सांगतात, ‘बापूंच्या सहवासात खूप माहिती व ज्ञान सहजतेने मिळत होते. मला अजूनही त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची इच्छा आहे.’
या व अशा अनेक आठवणींमध्ये तिसरीतील ७ (सात) वर्षांचा बापू ‘हिमालयाची साद’ हा देशभक्तिपर निबंध लिहिताना दिसतो; तर पाचवीतला ९ वर्षांचा बापू, ‘माझे वडील डॉक्टर आहेत ते पूर्ण वर्षाची फी एकदम भरू शकतात. मला फी- माफी नको. ती सवलत तुम्ही हिला द्या. हिच्या पायांना चप्पलही नाही. फी-माफीची गरज हिला आहे’ असे वर्गशिक्षकांना सांगणारा कर्तव्यदक्ष सहृदयी विद्यार्थी व मित्र दिसतो. त्याचबरोबर‘संन्यासाश्रमाचा अनुभव घेऊन पुन्हा संसारात येण्यास काय हरकत आहे’ ह्या अत्यंत गंभीर विषयावर ‘माझे मत असे आहे’ हे ठामपणे मांडणारा दहावीतला बापू दिसतो.
कॉलेजच्या जीवनात मित्रांसाठी टोकाला जाऊन मदत करणारा बापू व त्याचबरोबर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात थट्टा-मस्करी, हास्यविनोद करणारा, पण ‘डिसेन्सी’न सोडणारा, उथळ उच्छृंखलपणा न होऊ देणारा बापू दिसतो; तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना वेळात वेळ काढून स्पेशल वर्ग घेणारा, डिग्री शिकवणारा कडक शिक्षक दिसतो.
परळ-लालबाग-शिवडीसारख्या गिरणगावातील कष्टकरी व श्रमजीवी वर्गाला व त्यांच्या गावाकडील आप्तेष्टांना अत्यल्प आणि केव्हा केव्हा काहीच फी न घेता ट्रीटमेंट देणारा एम.डी. डॉक्टरही आम्हाला दिसतो. त्याचबरोबर नुकत्याच बापूंच्या सानिध्यात आलेल्या मान्यवरांना बापूंचा भावलेला व्यासंग, बापूंचे सरळ आणि साधेपण, त्याचबरोबर त्यांनी अनुभवलेले बापूंचे अलौकिकत्व हे या आठवणींतून आपल्या समोर येते.
बापूंविषयींच्या आठवणींमधून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे बापूंनी कधीच कोणाचीच उपेक्षा केली नाही, कधीच कोणाला कमी लेखले नाही, प्रत्येकाला त्यांनी सांभाळून घेतले, प्रत्येकाचा न्यूनगंड कमी करून प्रत्येकाला कायम दिलासा दिला. ब्लड डोनेशन कँपच्या वेळेस 'I am not totally useless, at least I can donate blood' असे सांगून विश्वास जागवला आणि म्हणूनच बापूंच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही बापूंवर विश्वास होता. म्हणून बापूंचे शाळेतील शिक्षक जी. डी. पाटील सर सांगतात, ‘हा विश्वास बापूंनी विद्यार्थीदशेत असताना कमावला होता.’
या आठवणी आम्हाला बापूंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दाखवतात. एक विद्यार्थी, एक शेजारी, एक मित्र, एक शिक्षक, एक डॉक्टर व मुख्य म्हणजे एक माणूस म्हणून बापूंचे विलक्षण, व्यापक व अद्भुत व्यक्तिमत्व आमच्या समोर येते. बापू तेव्हाही तसेच होते, जसे आज आहेत.
आज आजूबाजूला जग, परिस्थिती खूप वेगाने बदलतेय. या बदलाला सामोरे जाणे प्रत्येकासाठी कठीण जात आहे. या बदलांना कशा प्रकारे सामोरे जावे, हे सेमिनार्स व अग्रलेखांच्या माध्यमातून बापू आपल्यासमोर मांडत आहेत. पण हे सगळे करत असताना, मांडत असताना, हे बदल घडत असताना एक गोष्ट मात्र ‘नित्य’, ‘शाश्वत’ आहे, ते म्हणजे बापू, बापूंचे प्रेम आणि बापूंची मूल्ये.