श्रीमहिषासुरमर्दिनी स्थापना सोहळा - श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्(Mahishurshamardini at Shree Aniruddha Gurukshetram)

 Mahishurshamardini at Shree Aniruddha Gurukshetram

 श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे संपन्न झालेल्या श्रीमहिषासुरमर्दिनी स्थापना उत्सवाला येत्या ९ ऑगस्ट २०१३ रोजी बरोबर ४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ऑगस्ट २००९ साली झालेल्या ह्या अभूतपूर्व सोहळ्याच्या आठवणी जागृत होताना मला खूप आनंद होत आहे. त्या आठवणी सर्व श्रद्धावानांबरोबर शेअर करण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे.

९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २००९ ह्या काळात हा उत्सव श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे संपन्न झाला. साक्षात दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितलेल्या ‘त्रिपुरारहस्य’ ग्रंथातल्या मूळ महात्म्यानुसार, ह्या आदिमातेचे / देवमातेचे पूजन चतुर्विंशति म्हणजेच २४ उपचारांनी (रहस्योपचारे) व २ आचारांनी केले गेले. २४ उपचार व २ आचार ह्यांनी केल्या गेलेल्या ह्या पूजनाला ‘वज्रमण्डलपीठपूजनम्’ हे दुसरं नाव आहे. हे २४ उपचार व २ आचार खालीलप्रमाणे आहेत: १) आवाहनम् २) आसनम् ३) पाद्यम् ४) अर्घ्यम् ५) आचमनीयम् ६) स्नानीयम् ७) पंचामृतस्नानम् ८) शुद्धोदकम् स्नानम् ९) वस्त्रम् १०) गन्धम् ११) अक्षतान् १२) सौभाग्यद्रव्यम् १३) पुष्पाणि १४) धूपम् १५) दीपम् १६) नैवेद्यम् १७) आचमनीयम् १८) सिन्दूरम् १९) कुंकुमम् २०) भूषणानि २१) मांगल्यसूत्रम् २२) फलानी २३) तांबूलम् २४) दक्षिणा २५) नीरांजनम् २६) नमस्कार

ह्या पूजनामधील मंत्र उच्चारणासाठी स्वत: परमपूज्य बापूंच्या आवाजात मंत्र रेकॉर्ड केले गेले होते. उत्सवाच्या काळात दररोज सकाळी पूजनविधी झाल्यानंतर, सूर्यास्तापर्यंत ‘श्रीचण्डिका हवनम्’ संपन्न होत असे (जे सध्या दररोज सकाळी साधारण ८.३० ते ९.४५ ह्या वेळेत गुरुक्षेत्रम्‌म‌ध्ये संपन्न होते). उत्सवाच्या काळात पूजनानंतर नेहमीप्रमाणे दुपारची व रात्रीची आरती होत असे. ह्याच उत्सवाच्या काळात परमपूज्य बापूंनी आदिमाता श्रीमहिषासुरमर्दिनीची आरती (माते गायत्री सिंहारूढ भगवती...) ही सर्वांसाठी नव्याने खुली केली आणि तेव्हापासून दररोज दुपारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये माध्यान्न पूजनाच्या वेळी ही आरती घेण्यात येते.

ह्या उत्सवातील पहिल्या दिवशीचं पूजन तसंच सांगतेच्या वेळी ९व्या दिवशीचं पूजन स्वत: परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांनी केले. मलाही एक दिवस हे पूजन करण्यासाठी परमपूज्य बापूंनी संधी दिली. ह्या ९ दिवसांच्या उत्सवादरम्यान, प्रत्येक दिवशी एक, असे ९ खास पंचधातूपासून बनवून घेतलेले तोड्यांचे सेट प्रत्येक पूजकाने श्रीमहिषासुरमर्दिनीला अर्पण केले. हेच तोडे दरवर्षी चैत्र नवरात्र (शुभंकर नवरात्र) व अश्विन नवरात्र (अशुभनाशिनी नवरात्र) अशा दोन्ही उत्सवांच्या वेळी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे भक्तांकरिता दर्शनासाठी ठेवण्यात येतात.

उत्सवाच्या आधी घेतलेल्या मिटिंगमध्ये परमपूज्य बापूंनी सांगितले होते की "ह्या ९ दिवसात आपल्याला देवीला अगदी मनापासून, जमेल त्या भाषेमध्ये, श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् ह्या उत्सवस्थळी येऊन साद घाला. ह्या देवीने आपली मान डाव्या बाजूला कलती ठेवलेली आहे. ह्याचे कारण म्हणजे तिच्या डाव्या बाजूला परशुराम उभा आहे आणि तो तिला सतत साद घालत आहे. तिने लक्ष्मी-पार्वती-सरस्वती ह्या भक्तमातांना वर दिलेला आहे की ‘श्रावण महिन्यामध्ये तुमचा जो कोणी भक्त हाक मारेल, त्याची हाक मी स्वत: श्रवण करीन.’ ह्या श्रावण महिन्यात श्रवणाचा महिमा अपार आहे कारण ती देवी स्वतः श्रवण करत असते आणि म्हणूनच तिची मान सदैव कललेली राहते. तिने तिच्या हातात शंख धारण केलेला आहे व तो तिने तिच्या कानाशी धरलेला आहे. शंख हे सगळ्या अस्त्रांमधलं ध्वनी उत्पन्न करणारं अस्त्र आहे. अतिशय लांबपर्यंत आवाज जाणारा असा तो शंख, तिने कानाशी धरलाय; ते रिसिव्हींग स्टेशनही आहे. भक्ताचा अगदी लहानातला लहान आवाजदेखील ऐकता यावा म्हणून तिने शंख कानाशी धरलेला आहे. हिची मान कायम कलतीच कां? तर त्या परमात्म्याने हा विचार केला की माझ्या आईने आपल्या लेकरांसाठी, त्यांची साद ऐकण्यासाठी कायम मान कलतीच ठेवावी. म्हणून ‘तो’ परमात्मा सतत तिला हाक मारीत असतो, सतत तिचं स्मरण करत राहतो. म्हणूनच तुम्हीही साद घालताना बाकी काहीही मागू नका. फक्त एवढंच मागा, "काहीही होवो, पण तू आम्हाला टाकू नकोस, सोडू नकोस, तू आम्हाला मार, झोड, काहीही कर पण आम्हाला तुझ्या चरणांशी शरणागत बनवून ठेव". श्रीगायत्री पापनाशिनी आहे, श्रीअनसूया दुःखनाशिनी आहे आणि श्रीमहिषासुरमर्दिनी अशुभनाशिनी आहे. अशी ही चण्डिका - महिसासुरमर्दिनी आमच्यावर प्रसन्न झाली की प्रज्ञापराध होऊ देत नाही, एकही रोग होऊ देत नाही. ज्यांनी तिचा आश्रय केलेला आहे, त्यांना विपत्ती बाधत नाही. अशा अष्टादशभुजा (अठरा हात असणार्‍या) आईला, देवमातेला अत्यंत प्रेमाने साद घालायची आहे आणि परमात्मत्रयीलाही."

ह्या उत्सवाची तयारी करण्यासाठी खालील तीन प्रमुख गोष्टी केल्या गेल्या होत्या. १) रंगदीप - एकूण १०८० रंगदीप तयार केले गेले. मोठ्या पणत्या आणून त्या प्रेमाने सुंदर रित्या रंगवल्या गेल्या होत्या. उत्सवकाळात दररोज १०८ दीप अर्पण केले गेले. हे रंगदीप रंगवताना प्रत्येकाने ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः’चा जप केला होता.

२) मणिभद्रकंकण - लाल-हिरवे मणि ओवून बांगड्या तयार केल्या गेल्या होत्या. ३ वेगवेगळ्या आकाराच्या गाळ्यांमध्ये लहान-मोठ्या बांगड्या तयार केल्या गेल्या. बांगड्यांमध्ये मणी ओवताना परमपूज्य बापूंनी त्यात एका मण्याची जागा रिकामी ठेवण्यास सांगितली होती. ती जागा ‘गायत्री मण्याची’ मानली जाते, कारण गायत्री अरंग आहे. तो मणी फक्त श्रीराम, श्रीकृष्ण किंवा श्रीपरशुरामच त्या जागी भरू शकतो असे बापूंनी सांगितले होते.

रोज ६४८ कंकणे याप्रमाणे एकूण ६४८० मणिभद्र कंकणे अर्पण करावयाची होती. ही कंकणे तयार करतानादेखील प्रत्येकाने ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः’चा जप केला होता.

उत्सवाची सांगता झाल्यानंतर परमपूज्य बापूंच्या आज्ञेप्रमाणे भक्तांसाठी त्यांच्या इच्छेनुसार श्रीमहिषासुरमर्दिनीला मणिभद्रकंकणं अर्पण करण्याची सेवा चालू करण्यात आली.

३) दिव्य वस्त्र - एकूण १०८० दिव्य वस्त्रे तयार केली गेली. धवल आणि सुवर्ण वर्णाचं, चुनरीच्या आकाराचं वस्त्र घेऊन त्यावर नारिंगी (ऑरेंज) रंगाने ‘ॐ नमश्चण्डिकायै’ हा जप लिहीला गेला होता. संपूर्ण वस्त्रावर वाचता येईल एवढ्या मोठ्या अक्षरात हा जप लिहीला गेला. दिव्य वस्त्र तयार करताना प्रत्येकाने ‘ॐ नमश्चण्डिकायै’चा जप केला होता.

ह्या तीनही गोष्टी तयार करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.