कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर {KMHC}

(के एम एच सी) ग्रामीण/ नागरी / समाज / आदिवासी ह्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करून विकास (प्रतिबंधक, प्रोत्साहक, उपचारात्मक आणि पुनर्वसन)

भारत सध्या जगातील अग्रेसर /(अग्रगणी ) अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.  तथापि अर्थव्यवस्थेची भरभराट होत असली तरी, देशातील भागांमध्ये काही समस्या वारंवार प्रकट होऊन जोमाने वाढत राहतात. सार्वत्रिकरीत्या ग्रामीण भागांमध्ये, विशेषत: दारिद्र्य हे एक असे सामाजिक दैन्य आहे, जे समाजाला अपंग बनविते आणि त्याच्या विकासात अडथळा आणते. बहुतांश वेळा, त्यामुळे जागरूकता, स्वच्छता आणि शिक्षण ह्यांच्या अभावासह कुपोषणासारख्या अन्य बाबी उदयास येतात, जेथे एका वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे सुध्दा एक आव्हान बनते, तर आरोग्य सेवेसाठी पैसा किंवा साधनसामग्री परवडणे ही अत्यंत चैनीची गोष्ट मानली जाते.

प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्यासही जेथे वाव नाही, अशा वंचितांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी देशभरात विविध संस्थांतर्फे वैद्यकीय शिबीरांचे आयोजन केले जाते. तथापि फक्त तपासणी, निदान आणि औषधोपचार किंवा विशेष उपचार-पध्दती वा शस्त्रक्रिया समाजाच्या ह्या विभागासाठी पुरेशा नाहीत, कारण त्यांना होणार्‍या आजारांबाबत किंवा त्यांच्या समस्यांबाबतच्या मूळ कारणांबद्दल ते अनभिज्ञ असतात. उपचारांपेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो'. अशाप्रकारे अशा वंचितांमध्ये त्यांना उद्भवणार्‍या विविध समस्या आणि त्यांच्या आरोग्याशी निगडीत समस्या ज्यातून सतत दु:ख आणि क्लेश निर्माण होऊन त्यांना पीडा देत राहतात, ह्याबाबत जागरूकता वाढवत राहणे अत्यंत निर्णायक बनते.

कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्यसेवा शिबीर - या उपक्रमाद्वारे समाजातील अशा वंचितांबरोबर काम करण्यासाठी पुढाकार घेतला गेला आहे. येथे फक्त त्यांच्या वैद्यकीय समस्यांना हाताळले जात नाही तर

...इतर अनेक मूलभूत समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी देखील प्रयास केले जातात. मुख्यत्वे चुकीच्या समजुती ज्यामुळे बरेचदा अनारोग्य आणि खराब परिस्थिती उद्भवते आणि ही परिस्थिती रोगांचा प्रसार आणि इतर अनेक समस्यांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते.   

           

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर ही डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम.डी.) मेडिसिन, ह्यांची अभिनव संकल्पना - संकलित माहितीच्या आधारे तपशीलवार पूर्व - नियोजन आणि योग्य विश्लेषण केले असता कसे आश्चर्यकारक परिणाम घडून येतात ह्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. २००४ साली ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट’ आणि पुनर्वसन केंद्रातर्फे पहिले कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यासाठी कोल्हापूरच्या अंतर्गत खेड्यापाड्यात राहणार्‍या नागरिकांच्या राहणीमानाचा तसेच जीवनशैलीचा सखोल व विशेष लक्ष केंद्रीत करून अभ्यास केला गेला होता. हा अभ्यास प्रामुख्याने संस्थेच्या कोल्हापूर येथील मोठ्या प्रमाणावरील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सुलभ झाला होता. कोल्हापूरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतराच्या बाहेरील खेड्यापाड्यांत राहणार्‍या लोकांच्या राहणीमानाबाबत आश्चर्यजनक वस्तुस्थिती ह्या अभ्यासातून निदर्शनास आली. ह्यानंतर पहिल्या कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरामध्ये काही भयानक गोष्टी सामोर आल्या.

विविध वयोगटातील रुग्णांना मुख्यत्त्वे एक सर्वसाधारण आजार आढळला - अशक्तपणा आणि खरूज. खरूजाच्या समस्येवर उपचार करणे हे कमी आव्हानात्मक आहे असे निदर्शनास आले तर विशेषत: मुलांमध्ये अशक्तपणाची समस्या अधिक गंभीर असून पूर्ण तपासणी नंतर हाताळायला हवी असे लक्षात आले. पुढील संशोधनामध्ये मुलांमधील अशक्तपणाच्या प्रमुख कारणांपैकी शौचालयाचा (संडासचा) अभाव हे एक मुख्य कारण दिसून आले. लोक बहुधा उघड्यावर शौचास जात, ज्यामुळे एक विशिष्ट प्रकारचे जंतू - जमिनीत पोसले जात, ज्यांना हूकवर्म /कृमी म्हणतात. हे जंतू मुलांच्या कोमल पायांतून प्रवेश करून शरीरात लहान आतड्यांपर्यंत जात, जेथे ते लाल रक्त पेशींवर हल्ला करीत. ह्यामुळेच अशक्तपणा निर्माण होत असे. ह्या समस्येला २ पध्दतींनी हाताळण्यात आले - (अ) स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढविणे आणि (ब) मुलांना हूकवर्मच्या जंतुपासून ताबडतोब सुरक्षितता पुरविणे. यांपैकी स्वच्छ्तेविषयी जागरूकता निर्माण करण्याची प्रक्रिया विचारात घेता, यासाठी बराच वेळ लागणार होता, मात्र त्या तुलनेत त्याच ठिकाणी पायाभूत सुविधा असल्यामुळे दुसरी पध्दत वापरणे अधिक सोपे होते. म्हणून या समस्यांनी ग्रासलेल्या भागामधील काही निवडक गावांमध्ये जनगणना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक मुलाच्या पायाचे माप घेऊन त्याची नोंदणी करण्यात आली आणि पुढील शिबीरामध्ये त्या प्रत्येक मुलाला चपलांचा एक जोड व संपूर्ण वर्षभर पुरेल असे लोहयुक्त टॉनिक देण्यात आले होते. त्यानंतरच्या पुढील वर्षाच्या शिबीरातील माहितीद्वारे अनेक आश्चर्यजनक परिणाम सामोर आले होते. यामध्ये अशक्तपणाच्या आजाराचे व त्याच बरोबरीने खरूजेचेही प्रमाण अर्ध्याहून अधिक कमी झाल्याचे प्रकर्षाने समोर आले. त्यानंतरच्या ४-५ शिबीरात अशक्तपणा व खरूजेचा एकही रुग्ण आढळला नाही.

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिराची दुसरी नेत्रदीपक कामगिरी म्हणजे कोल्हापूरातील गावकर्‍यांकडून वर्षानुवर्षे पाळल्या जाणार्‍या देवदासी पद्धतीचे पध्दतशीररीत्या केलेले निर्मूलन. तेथील प्रथेनुसार (अंधश्रध्देनुसार) एखाद्या मुलीच्या केसांमध्ये जटा तयार झाल्या की तिला देवदासी बनविले जावे असे मानले जात होते. योग्य पध्द्तीने केलेल्या संशोधनातून निदर्शनास आले की केसांची स्वच्छता न राखल्यामुळे जटा तयार होतात ज्यातून पुढे त्या मुलीच्या केसांमध्ये उवा वाढतात. उवांनी टाकलेल्या घाणीतून आणि मेलेल्या उवा केसांमध्ये अडकल्यामुळे केसांमध्ये जटा बनतात. स्वच्छतेविषयी थोडीशीही माहिती नसल्यामुळे मुलींचे केस कधीच धुतले जात नसत त्यातून ही समस्या अधिक गुंतागुंतीची बनली होती. अशा प्रकारच्या रूढीबद्दल त्यांचा विश्वास इतका दांडगा होता की त्यांच्याशी बोलून, त्यांना समजावून ही रूढ पध्दती सोडून देण्याबद्दल सांगणे हे व्यर्थ होते, निष्फळ होते. त्यामुळे फक्त  दुसरा व्यवहारी पर्याय हाती होता की त्यांना पचनी पडेल, स्विकारता येईल अशा प्रकाराने त्यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता रूजवायची. म्हणून त्याच्या पुढील वर्षात प्रत्येक निवडलेल्या गावांमध्ये जाऊन जनगणना घेऊन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाची तपशीलवार माहिती घेऊन त्याची नोंदणी केली गेली. ह्या माहितीच्या आधारे, प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेसाठी आवश्यक अशा टूथब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्त्री-पुरूष अशी वयानुसार वर्गवारी करून कपड्यांचे दोन-दोन जोड दिले गेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या कुटुंबामध्ये (घरांमध्ये) मुलगी होती त्यांना केसात उवा होऊ नये म्हणून औषध आणि उवा काढण्यासाठी कंगवे दिले गेले. ह्या दिल्या गेलेल्या सर्व साहित्याचा वापर कसा करायचा ह्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांना नीट समजावून सांगितले. अवघ्या दोन वर्षांमध्ये उवा न होण्याच्या औषधाने आणि उवा काढण्याच्या कंगव्यांनी जणू जादू केली. एकाही मुलीच्या केसात जटा बनल्या नाहीत ज्यामुळे त्या भयावह देवदासी पध्दतीत बळजबरीने ढकलल्या जात होत्या. अशा रीतीने गावातील लोकांच्या भावना न दुखावता, त्यांना जाणवून न देता वर्षानुवर्ष चालत असलेल्या वाईट प्रथेचे उच्चाटन करण्यात आले.

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर २०१७ हे ह्या शिबीराचे १४ वे वर्ष होते आणि ह्या मध्ये अनेक खरोखर आनंद देणारे परिणाम आढळले. ह्या वर्षांदरम्यान विशेष लक्ष केंद्रित केलेल्या गावांमध्ये साक्षरतेचे प्रमाण दखल घेण्याइतके वाढल्याचे आढळले. गावकर्‍यांच्या आरोग्याच्या नोंदीमध्ये उल्लेखनीय बदल झाले आहेत. अशक्तपणा व खरूज ह्यांचे नवीन रूग्ण आढळले नाहीत. मुलांना शाळेत पाठविण्याच्या आवश्यकतेबाबत पालकांमधील जागरूकतेचे प्रमाण वाढले आहे. ह्या शिबीराचा अनेक वर्षे लाभ घेणार्‍यांपैकी दोन मुलांनी  ‘बी.एच.एम.एस’ (होमियोपथी) शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे.

शिबिराची काही ठळक वैशिष्ट्ये : 

  • शिबिराचा परिसर हा साधारणत: १० एकर जमिनीवर पसरलेला आहे , ज्यावर  ८०,००० चौरस फूट मंडप बांधला जातो.
  • शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व क्रीडा साहित्याचे वाटप
  • कपडे व स्वच्छतेसाठी लागणार्‍या साहित्याचे गावकर्‍यांना वाटप
  • शालेय विद्यार्थ्यांच्या व गावकर्‍यांच्या मोफत आरोग्य तपासण्या
  • नेत्र चाचण्या व चष्म्यांचे वाटप
  • शिबीरात सहभागी होणार्‍या मुलांना व गावकर्‍यांना जेवण

हिंदी     English