कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँप २०१७ची तयारी

गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले. मुंबईहून २२ बसेस, तसेच इतर कार्समधून मिळून ७४८ कार्यकर्ते, पुण्याहून ३ बसेसमधून ११३ कार्यकर्ते, तर रायगडमधून १ बसमधून २५ कार्यकर्ते शिबिराकरिता रवाना झाले.

ह्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे नंदाईंची व सुचितदादांची उपस्थिती. कँपच्या अचूक नियोजनाचा जणू कणाच असलेले हे दोघे म्हणजे कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे उगमस्थान. आताही कँपकरिता येणाऱ्या सर्च कार्यकर्त्यांच्या आधी पोहोचून कँपशी संबंधित विविध समित्यांबरोबर नंदाई व सुचितदादा मीटिंग्स घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

संस्थेच्या सर्व सेवाकार्यांचा पाया ‘भक्ति’ असल्यामुळे प्रत्येक सेवाकार्याची सुरुवात प्रार्थनेने होते. हे भगवान, ह्या सेवाकार्यात सेवाकरायची संधी आम्हाला देऊन तू आम्हाला उपकृत केले आहेस, असा भाव सर्व कार्यकर्त्यांचा ही प्रार्थना करताना असतो. त्याचबरोबर संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये लक्षणीय असते, ती शिस्त. त्या अनुषंगानेच कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या सेवाक्षेत्रानुसार बॅजेस् दिले जातात, जेणेकरून काही गोंधळ होणार नाही.

ह्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपला झटणार्‍या कार्यकर्त्यांची नीट काळजी घेतली जाते व त्यांच्या जेवणाखाण्याची कधीच आबाळ होत नाही. आताही कँपच्या आदल्या दिवशी पोहोचलेले कार्यकर्ते त्यांच्याकरिता आयोजित केलेल्या जेवणासाठी जमत आहेत.

॥ हरि ॐ॥ श्रीराम॥ अंबज्ञ॥