कथामंजिरी ४ - ‘तो'च माझा मार्ग एकला - १-४५ मधील प्रार्थना

कथामंजिरी ४ - ‘तो'च माझा मार्ग एकला - १-४५
काशीनाथरावाने त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार गळ्यातील जपमाळ काढून मंत्रगजर सुरू केला. त्याची एक माळ पूर्ण होत असतानाच, इतरांचेही जप पूर्ण होत होते. कारण त्या प्रत्येकाने अगदी जणू घड्याळ पाहिल्याप्रमाणे काशीनाथरावाबरोबरच गजर सुरू केला होता.
काशीनाथरावाने त्याची जपमाळ परत स्वतःच्या गळ्यात घातली आणि दोन्ही हात जोडून मस्तकाला लावत स्वयंभगवानाला नमस्कार केला आणि एकाएकी त्याच्या मनाचे सर्व बांध फुटले.
काशीनाथराव भगवंताला साद घालीत बोलू लागला -
प्रार्थना
‘हे भगवंता! हे त्रिविक्रमा! काय चालले आहे. असे वाटते की घराच्या छताला अक्षरशः शेकडो भोके पडली आहेत आणि पाऊस जोरात चालू आहे. कुठले भोक आधी बुजवायचे आणि कुठले नंतर?
कसेही केले आणि काहीही केले, तरीदेखील सगळी भोके बुजवेपर्यंत घर संपूर्णपणे पाण्याने भिजून जाणार आहे - वस्तूही आणि माणसेही.
हे भगवंता! तुझ्या चरणांशिवाय आम्हां भक्तांसाठी दुसरा कुठला आधार आणि आश्रय आहे!
हे भगवंता! तुझे नाम आणि तुझा मंत्रगजर ह्यांच्याएवढा वरिष्ठ आणि श्रेष्ठ (Superior and Best) असा दुसरा कुठला उपाय आहे!
सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची धाव कितीही मोठी असली, तरीदेखील जेथे बुद्धीसुद्धा हरते अशा प्रसंगी मन धावणार तरी कुठे आणि किती?
हे दीनदयाळ! दादासाहेबांचे, माझे व लक्ष्मणदादाचे घर, बानुबाईचे घर, आनंदीबाईचे घर ह्यांच्याबरोबरच हे डॉक्टर दांपत्यही संकटात पडले आहे
आणि मुख्य म्हणजे आमच्या सर्वांच्या समस्या एकमेकांच्या प्रश्नांमध्ये गुंतलेल्या आहेत. हा गुंता सोडवायला सुरुवात करण्यासाठी, ह्या गुंत्याचे एखादे तरी टोक अर्थात काहीतरी सुगावा लागणे आवश्यक आहे.
हे समर्थ सद्गुरु! तुझ्याशिवाय दिशा कोण दाखविणार! तूच खराखुरा मार्गदर्शक आहेस. काहीतरी कर राजा!
हे परमकृपाळू महाराजा! खरंच आणीबाणीची वेळ आहे. ह्या क्षणाला आमची परीक्षा पाहू नकोस, किंबहुना आम्ही सर्व अनुत्तीर्ण (Fail) झालेलोच आहोत, नापास झालेलो आहोत हे जाणून घे आणि आम्हाला पास करून घेण्यासाठी तूच येऊन आमची प्रश्नपत्रिका सोडव.
हे प्रभु रामभद्रा! तुझ्या नामात सर्व विश्व सामावलेले आहे व तुझ्या मंत्रगजरात भक्तांना सहाय्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा आहेत, असे सर्व संत सांगत आले आहेत व मी स्वतः ह्या गोष्टीचा अनेक वेळा अनुभवही घेतलेला आहे.
मग आज काय चालले आहे? आम्ही नेमके कुठे चुकत आहोत किंवा चुकलो आहोत, हेही कळत नाही आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूशी लढण्याची आमच्यात ताकद नाही, किंबहुना त्या लढाईसाठीची साधनेही आमच्याकडे नाहीत.
हे सद्गुरुसमर्था! अशा मोठ्या लोकांशी लढण्यासाठी आपल्यालाही तेवढेच मोठे असावे लागते. आम्ही सर्व साधीसुधी माणसे आहोत. कुणीही मोठा राजकीय नेता किंवा प्रभावशाली अधिकारी आमच्या साध्या ओळखीचाही नाही किंवा आमच्याकडे खूप मोठी संपत्तीही नाही.
त्या दुष्टांकडे बंदुका आहेत, पिस्तुले आहेत, गावठी बाँब आहेत. शिंट्याचा बंदोबस्त करण्यासाठी हे सखारामा! तूच स्क्रू-ड्रायव्हर्स पुरविले होतेस (संदर्भ : कथामंजिरी ४-१-१८) व आमच्याकडील चाकूही पुरेसे होते.
त्यावेळी मदत करणारा तू आणि आजचा तू काय वेगळे आहात? मुळीच नाही! तू सदैव भक्ताभिमानीच आहेस. (नुपेक्षी कदा राम दासाभिमानी - संत रामदास). मग निश्चितच आमचेच काहीतरी चुकत असणार किंवा आधीच खूप मोठी चूक घडलेली असणार.
असेल! तसेही असेल! परंतु हे आत्मारामा! आमच्या हृदयात राहून सर्व खेळ करणारा तूच आहेस.
जीवनाच्या खेळाचे, क्रीडेचे नियम घालून देणाराही तूच, आम्हाला खेळ शिकविणारा शिक्षकही तूच आणि आम्हाला ‘आऊट' (Out) म्हणून घोषित करणारा अंपायरही तूच.
हे प्रेमसागरा! एक वेळ सातही समुद्र आटतील. परंतु तुझ्यातील एक थेंबही कधी संपणार नाही, असा तू एकमेव आहेस.
देवाधिदेवा! तूच समुद्र, तूच मेघ, तूच पावसाचे पाणी, तूच नदी, तूच विहीर आणि मुख्य म्हणजे तूच आमच्या हातातील पाण्याने भरलेला पेला - असा अक्षय्य पेला - कधीही न संपणारा - तुझ्या अक्षय्य भात्याप्रमाणे.
हे हरिहरा! प्रसंग बिकट आहे. आमची धडगत दिसत नाही. तू कमरेवर हात ठेवून सदैव उभा असतोस. परंतु आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. तूच धावत ये.'