चरखा शिबीर २०१८

हरि ॐ,

३ ऑक्टोबर २००२ रोजी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी १३ कलमी कार्यक्रमात चरखा योजना मांडली. ही योजना मांडतेवेळी कष्टकरी समाजाला वस्त्र पुरवणे हा बापूंचा एक प्रमुख उद्देश होता. आजही गावांमधीलच नव्हे, तर लहान शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांमध्ये दारिद्र्यामुळे आपले शरीर झाकण्याएवढेही वस्त्र नसते. त्यामुळे त्या कुटुंबातील मुले शाळेत जात नाहीत व शिक्षणापासुन वंचित रहातात. या निरक्षरतेमुळे गरिबी वाढत जाते. बापूंच्या संकल्पनेतून निघालेली चरखा योजना’ गरिबी आणि निरक्षरतेचे चक्र तोडण्यासाठी उपयुक्त ठरते.

आपण जो दोन स्पिंडलचा चरखा वापरतो तो अहमदाबाद येथून आणला जातो. या चरख्यावर दोन बाँबिन पूर्ण भरून त्यातून एक लडी बनवण्यासाठी साधारणतः एक ते सव्वा तास लागतो. श्रद्धावान या लड्या श्रीहरिगुरुग्राम येथे किंवा श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रात जमा करतात. तेथे लड्यांचा किलोप्रमाणे गठ्ठा बनवला जातो. साधारणतः एक किलोत चाळीस लड्या येतात. या एक किलो लड्यांमधुन अंदाजे सहा ते साडेसहा मीटर कापड निघते ज्यातून कापडाचे Wastage धरून एका विद्यार्थाचा गणवेश शिवून होतो. ह्या लड्या विविध ठिकाणी विणकामासाठी पाठवल्या जातात. यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विणकाम हे हातमागावरच करतो जेणेकरुन तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. हे विणलेले कापड नंतर डाईंग व ब्लिचिंगसाठी पाठवले जाते. आपण ज्या ज्या शाळेत युनिफाँर्म वाटप करणार आहोत त्या शाळेच्या कलर कोड प्रमाणे कापड ’डाय’ केले जाते. नंतर हे प्रोसेस झालेले कापड गारमेंट्स फँक्टरी मध्ये योग्य त्या मापात प्रथम कापून नंतर शिवण्यासाठी पाठवले जाते. शिवलेले गणवेश एक्स्ट्रा थ्रेड कटिंग आणि पँकिंगसाठी पाठवले जातात, हे काम श्रद्धावान कार्यकर्त्यांकडून केले जाते.

कोल्हापूर, विरार, पाली येथे होणार्‍या वैद्यकिय व आरोग्य शिबीरासाठी प्रत्येक शाळेतून इयत्तेप्रमाणे विद्याथ्यांची यादी येते. ही यादी आल्यानंतर गणवेश शाळानिहाय बाँक्समध्ये भरले जातात. गणवेश बाँक्समध्ये पँक केल्यानंतर त्या बाँक्सवर त्या शाळेचे नाव आणि बाँक्समधील इयत्तेप्रमाणे गणवेशांच्या संख्येचे लेबल चिकटवले जाते व ते बॉक्स वाटपासाठी पाठवले जातात. लड्यांपासून गणवेश बनविण्याची प्रक्रिया व त्याला लागणारा वेळ लक्षात घेता एप्रिल - मे मध्ये जास्तीत जास्त लड्यांची आवश्यकता भासते. यासाठीच आपली संस्था दरवर्षी या काळात श्रीहरिगुरुग्राम येथे चरखा शिबीर आयोजीत करते. आतापर्यत आपल्या सर्व संलग्न संस्थांनी मिळून अंदाजे २३,७५,००० लड्यांपासून ४,२५,००० मीटर कापड बनवून, त्यापासून गणवेश शिवले आहेत व त्यांचे वाटप कोल्हापूर येथील वैद्यकिय शिबीरात केले गेले आहे. यावर्षीही आपल्याला अंदाजे १,९०,००० लड्यांची गरज भासणार आहे.

यंदा हे शिबीर दिनांक २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०१८ याकाळात होत आहे. शिबीराची वेळ सकाळी १०:०० ते रात्रौ ९:०० अशी असून गुरुवारी मात्र या शिबीराची वेळ ही सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यतच आहे. या शिबीरात चरख्याचे कार्यकर्ते श्रद्धावानांच्या मदतीसाठी हजर असतात, जे आपल्याला चरखा योग्य पद्धतीने चालवण्याबाबत व लड्या बनवताना कच्च्या सुतामुळे होणारे Wastage कमी करण्याबाबत मार्गदर्शन करतात.

जे श्रद्धावान या शिबीरात काही कारणास्तव भाग घेऊ शकत नसतील ते अनोख्या पद्धतीने या शिबीरात सहभागी होऊ शकतात. चरख्यातून लड्या बनवण्यासाठी पेळूची आवश्यकता भासते. एका पेळूच्या संचाची (२ नग) किंमत साधारणतः २७० रुपये असते. ज्या श्रद्धावानांना जेवढे शक्य आहे तेवढे पेळूचे संच विकत घेऊन ते संस्थेला देणगी स्वरूपात देऊ शकतात किंवा त्या पेळूंचे मूल्य देणगी म्हणून देऊ शकतात, जेणेकरून त्यांना ह्या शिबीरात सहभागी असण्याचे समाधान मिळेल. मला खात्री आहे की जास्तीत जास्त श्रद्धावान या भक्तिमय सेवेत सहभागी होऊन कष्टकरी कुटुंबाच्या जीवनात आनंद फुलवण्यास सक्रिय हातभार लावतील.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥