जाणीव - भाग ३ (Consciousness - Part 3)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले.
प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, दुसरे खाल्ले जातात का? नाही, वाघ कधी गवत खातो का? नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का? नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का? कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो.
बुद्धी ही चांगली गोष्ट आहे, परमेश्वराची देणगी आहे, बरोबर, ती बुद्धीच आमची जाणीव, बुद्धीचा उपयोग कशासाठी आहे, आमची जाणीव अधिक बलवान करण्यासाठी, आमची जाणीव अधिक शुद्ध करण्यासाठी, बरोबर. रस्त्यात डोंगर आला तर त्यातून बोगदा खणण्यासाठी, बरोबर. पण आम्ही त्या बुद्धीचा वापर कशासाठी करतो? आम्ही त्या बुद्धीचा वापर ज्या गोष्टीसाठी करतो, ती गोष्ट ह्या प्राण्यांकडे अजिबात नाही. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये एक गोष्ट अजिबात नाही. आणि प्रत्येक माणसांमध्ये आहेच अशी गोष्ट कुठली? असा एक गुणधर्म की जो कुठल्याही प्राण्यामध्ये जरादेखील नाही, माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये आहेच, काही संतमहात्मे वगैरे असतील, त्यांच काय मला माहित नाही, काय?
‘असत्य’ ही गोष्ट कुठल्याही प्राण्याकडे नाही. बापू! त्याला बोलताच येत नाही हो, मग खोटं कसं बोलतील? खोटं वागता येतं ना, कुठलाही प्राणी खोटं वागत नाही. तो त्याच्या गुणधर्मानुसारच वागतो. असत्य ही एक गोष्ट अशी आहे की मनुष्य स्वत:च्या बुद्धीने तयार करतो कारण असत्य हे बुद्धी नसल्याशिवाय तयार करता येत नाही आणि बुद्धीचा वापर मनुष्य ज्या प्रमाणात असत्यासाठी करतो, त्या प्रमाणात त्याच्या जाणिवा ह्या अशुद्ध व्हायला लागतात. आलं लक्षामध्ये? सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥