मॉडर्न कॉलेज, पुणे येथे अनिरुद्ध बापूंचे व्याख्यान (Aniruddha Bapus speech modern college Pune)
दिनांक ३१ मे २०१५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजी नगर, पुणे येथील विश्वस्थ मंडळातर्फे ८२व्या वर्षात प्रदार्पणाचे औचिंत्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजेन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाबरोबरच आपल्या परमपूज्य बापूंना (अनिरुद्धसिंहना) व्याख्यानासाठी येण्याबाबत आमंत्रित करण्यात आले. आपल्या लाडक्या बापूंनी ते आमंत्रण प्रेमाने स्वीकारले आणि ते तेथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. बापूंचे हे व्याख्यान मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस(Modern College, Pune), सायन्स एण्ड कॉमर्स, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजी नगर, पुणे - ४११००५ येथे ६.१५ वाजता सुरू होणार आहे. हे व्याख्यान सर्व श्रद्धावानांसाठी खुले असून ज्या श्रद्धावानांना आपल्या लाडक्या डॅडचे व्याख्यान ऐकण्याची इच्छा आहे ते श्रद्धावान येथे सहभागी होऊ शकतात.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजी नगर, पुणे येथील या कार्यक्रमाचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे असणार आहे -
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ८२व्या वर्षात प्रदार्पण करण्याच्या निमित्ताने प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रो. ए. सोसायटी) यांचे आपल्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये मनोगत आले आहे ते मी येथे देत आहे.महाराष्ट्र राज्यात खाजगी शिक्षणसंस्थांचे शिक्षण प्रसारात मोठे योगदान आहे. पुणे शहर व परिसर यांमध्ये देखील अशा अनेक शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही अशीच नामवंत शिक्षणसंस्था आहे. या शिक्षणसंस्थेची स्थापना मा. गुरूवर्य कै. शंकरराव कानिटकर यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत १६ मे १९३४ (अक्षयतृतीया) या दिवशी केली. त्यांच्या सहकार्यांपैकी गुरूवर्य वि. त्र्यं. ताटके हे एक होते.
त्या काळात पुण्यामध्ये काही नावाजलेल्या खाजगी शिक्षणसंस्था कार्यरत होत्या. त्या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजातील प्रसिध्द व्यक्ती होत्या. अशा परिस्थितीत पुण्यामध्ये एक नवीन शिक्षणसंस्था स्थापन करणे, तिचा विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगणे, हे फार मोठे धाडस होते. काही व्यक्तींनी त्यावेळी कै. कानिटकरांच्या ह्या उपक्रमाची कुचेष्टा केली, उपहासही केला. परंतु प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व स्वतःच्या कार्याविषयी पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती या गुणांमुळे लवकरच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था नावारूपाला आली. दि. १६ मे १९३४ रोजी मॉडर्न हायस्कूलची स्थापना करून संस्थेच्या कार्यास सुरूवात झाली.
या संस्थेच्या स्थापनेपासून १९७० सालपर्यंत संस्थेचे काम शालेय स्तरापर्यंत मर्यादित होते. परंतु नंतर येणार्या काळाची पाऊले ओळखून संस्थेच्या पदाधिकार्यांनी महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. गुरूवर्य कै. वि. त्र्यं. ताटके यांचे संस्थेचे कार्यवाह या नात्याने मॉडर्न महाविद्यालय स्थापन करण्यात फार मोठे योगदान होते. गुरूवर्य ताटके गणिताचे एक नामवंत शिक्षक होते. तसेच ते मॉडर्न हायस्कूल, पुणे ५ चे अनेक वर्षे मुख्याध्यापक होते. शिवाय प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य व कार्यवाह होते. प्रो. ए. सोसायटी नावारूपाला आणण्यात गुरूवर्य कै. कानिटकर, गुरूवर्य ताटके, गुरूवर्य चाफेकर व इतर गुरूजन व्यक्तींचे अथक परिश्रम, त्याग व तळमळ कारणीभूत आहेत.
१९८६ यावर्षी काही तरूण व धडाडीच्या कार्यकर्त्यांनी या संस्थेचे काम करण्याचे ठरविले. संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने तो एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सध्या या संस्थेच्या अंतर्गत सुमारे ५८ शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सुमारे ४५,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे शहरातील शिवाजीनगर, गणेशखिंड, वारजे, पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर निगडी, त्याचप्रमाणे मोशी, भोसे, पौड, थूगांव या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालये ही सर्व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल प्रसिध्द आहे. महाविद्यालयीन स्तरावर कला, विज्ञान, वाणिज्य, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, आरोग्यविज्ञान इ. अनेकविध विद्याशाखांमध्ये शिक्षण देण्याची सोय आहे. येत्या काही वर्षात अजूनही काही शाळा-महाविद्यालये काढण्याचे व सध्या अस्तित्वात असलेल्या शाळा-महाविद्यालयांचा विकास करण्याचे संस्थेने ठरविले आहे.
संस्थेच्या अनेक महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नॅक बंगलोर व विश्वविद्यालय अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून उच्च दर्जाबद्दल प्रमाणित केले गेले आहे.
त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच उच्च व तंत्र शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्था आज देशाच्या पातळीवर आज उत्कृष्ट कार्य करीत आहे. संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील अनेक शिक्षकांना विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व राष्ट्रपती पुरस्कार यांसारखे उच्च दर्जाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
संस्थेच्या नियामक मंडळामध्ये प्रामुख्याने शिक्षक असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने होत चाललेल्या बाजारीकरणाचा लवलेश या संस्थेत आढळत नाही, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. गुरूवर्य कानिटकर व त्यांच्या सहकार्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार त्याचप्रमाणे ‘प्रोग्रेसिव्ह‘ आणि ‘मॉडर्न‘ या दोन मंत्रांची जपणूक करून संस्थेची वाटचाल २१ व्या शतकात मोठ्या दिमाखाने चालू आहे. संस्थेने यावर्षी अक्षय्यतृतीया या दिवशी ८१ वर्ष पूर्ण करून ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचे सर्व श्रेय संस्थेतील नियामक मंडळाचे सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सभासद व हितचिंतक यांना आहे. त्यांचे मी त्यांच्या अनमोल सहकार्याबद्दल आभार मानतो.
या संपूर्ण वाटचालीमध्ये माझ्या कुटुंबीयांनी मला मोलाची साथ दिलेली आहे. त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणे मला जास्त आवडेल.
मा. गुरूवर्य शंकरराव कानिटकर यांनी १९३४ साली पेरलेल्या या लहान बिजाचे आज सुमारे ८१ वर्षांनी एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. मा. गुरूवर्य कानिटकर, गुरूवर्य ताटके, गुरूवर्य चाफेकर व इतर गुरूजनांनी जो निष्काम कर्मयोग आचरला, त्याचे फळ म्हणून या संस्थेचा विकास झाला आहे व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था नावारूपाला आली अशी माझी व माझ्या सहकार्यांची धारणा आहे. त्याचप्रमाणे सद्गुरु श्री. अनिरुद्ध बापू यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे संस्थेची भरघोस प्रगती झाली आहे. संस्थेने संशोधन (Research) क्षेत्रात काम करावे. अशी सद्गुरु श्री. अनिरुद्ध बापू यांची इच्छा असल्यामुळे संस्थेने ‘ज्ञानमय’ हे स्वत:चे Research Journal यावर्षीपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे पहिल्या अंकाचे प्रकाशन सद्गुरु श्री. अनिरुद्ध बापू यांच्या हस्ते होणार आहे. हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे असे आम्हा सर्वांना वाटते. त्या थोर गुरुजनांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार यापुढेही आमच्या सर्वांच्याकडून शिक्षणक्षेत्रात कार्य होवो, अशी श्रीपरमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे मनोगत संपवतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ॥