'प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये परमपुज्य बापूंनी केलेले भाषण (Aniruddha Bapu's speech at Progressive Education Society)

Aniruddha Bapu's speech at Progressive Education Society

शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने उभारलेल्या अद्ययावत सभागृहाचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन परमपूज्य बापूंच्या हस्ते संपन्न झालं.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये परमपूज्य बापू

बापूंच्या आशिर्वादाने ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था प्रगती करीत आहे, अशी डॉ. एकबोटे यांची श्रद्धा आहे. पण त्याचबरोबर आपण चुकलो तर आपल्याला ताळ्यावर आणण्याचं काम बापू करू शकतात, बापूंकडूनच आपल्याला उचित मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे या सभागृहाचं उद्घाटन बापूंच्याच हस्ते व्हायला हवं, असा विचार मांडताच, डॉ. एकबोटेंच्या सहकार्‍यांनी ते पूर्णपणे मान्य केलं. बापूंच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्याचं ठरल्यानंतर, त्यासाठी कितीही थांबण्याची संस्थाचालकांची तयारी होती. अखेरीस बापूंनी वेळ दिला आणि डॉ. एकबोटे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘हे स्वप्न साकार झाले’.

या सभागृहाच्या उद्घाटन समारोहात डॉ. एकबोटेंनी आपलं हे मनोगत व्यक्त करताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यामध्ये संस्थेशी निगडित मंडळी होतीच. पण या सभागृहाबाहेरच्या प्रांगणात बापूंच्या दर्शनासाठी त्यांचे शब्द ऐकण्यासाठी बराच काळ प्रतिक्षा करणारे श्रद्धावानही होते. बापू पुण्यात या कार्यक्रमासाठी येणार, हे कळल्यानंतर दूरवरून आलेले श्रद्धावान देखील डॉ. एकबोटेंच्या हृदयस्पर्शी अनुभवाने, त्यांच्या बापूंवरील प्रेम आणि श्रद्धेने भारावून गेल्याचे दिसत होते.

१९८५ साली या संस्थेची धुरा डॉ. एकबोटे यांनी हाती घेतली. त्यानंतर संस्थेने जोरदार प्रगती केली. पण १९९८ साली अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण ही संस्था सोडण्याचा निर्णय घेतला होता, याची कबुली डॉक्टरांनी आपल्या या भाषणात दिली. हा निर्णय बापूंच्या कानावर घालून त्यांचा सल्ला घ्या, असं आपल्या पत्नीने सांगितले आणि आपण तो सल्ला मानला. बापूंची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. पण बापूंनी मला परखड शब्दात वास्तवाची जाणीव करून दिली. तुम्ही ही संस्था सोडल्यानंतर ही संस्था पत्त्यासारखी कोसळेल, ते पाहून तुम्हाला होणारा त्रास हा काम करताना होणार्‍या त्रासापेक्षा कितीतरी अधिक असेल, हे बापूंनी आपल्या लक्षात आणून दिलं. त्याचबरोबर यापुढे तुम्हाला त्रास होणार नाही आणि संस्थेची प्रगती होईल, असे बापूंचे आश्वासक शब्द घेऊन डॉ. एकबोटे पुन्हा कामाला लागले.

एक वेळ कर्जात असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या ठेवी आता ३०० कोटी रुपयांवर गेल्या आहेत. संस्थेवर एक रुपयाचंही कर्ज नाही, हे सारे शक्य झाले ते बापूंच्या आशीर्वादामुळे, त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच, हे डॉक्टरांनी ठासून सांगितल्यानंतर सभागृह आणि आजूबाजूचा परिसर बराच काळ टाळ्यांच्या कडकडाटाने निनादत राहिला. १० कोटी रुपये खर्च करून उभारलेलं हे सभागृह संस्थेच्या प्रगतीची साक्ष देत आहे. या सभागृहाचं उद्घाटन बापूंच्या हस्ते झालं याचा संस्थाचालकांना कधीही विसर पडणार नाही, या सभागृहाचे पावित्र्य भंग करणारे कार्यक्रम इथे कधीही होऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ. एकबोटे यांनी बापूंना दिली.

१९३६ साली स्थापन झालेल्या ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय आणि प्रशिक्षण संस्था मॉडर्न नावानेच सुरू होईल, असं धोरण या संस्थेने तत्त्व म्हणून स्वीकारलं. एक कोटी रुपयांचा निधी देण्यास तयार असलेल्या एका धनाढ्याने मॉडर्नच्या ऐवजी आपल्या वडिलांचं नाव नव्या उपक्रमाला देण्याचा आकर्षक प्रस्ताव संस्थेसमोर ठेवला होता. पण बापू आम्ही बाणेदारपणे हा प्रस्ताव नाकारला, हे डॉक्टर एकबोटे यांनी सांगताच, पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि स्वतः परमपूज्य बापूंनी देखील टाळ्या वाजवून संस्थेच्या या निर्णयाचं कौतुक केलं. बापूंच्या भाषणातही ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’, डॉ. एकबोटे आणि त्यांच्या सहकार्‍यांबाबतचं कौतुक अक्षरशः ओसंडून वाहत होतं.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये  परमपूज्य बापू भाषण करताना

आफ्रिकेतील नरभक्षक टोळ्यांमध्ये सेवा करणारे ‘डॉ. अल्बर्ट श्वाईनसर’ व प्रत्येक क्षणाला कार्यरत राहणारे डॉ. जॉर्ज वाशिंग्टन काव्हर्र हे आपले दोन हिरो असल्याचं बापू म्हणाले. डॉ. श्वाईनसर यांनी ‘रेव्हरंन्स फॉर लाईफ’ असं नाव असलेली स्वतःची फिलॉसॉफी तयार केली. रेव्हरंन्स फॉर लाईफ म्हणजे जिवंतपणाविषयी प्रेमादर.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये परमपूज्य बापू भाषण करताना

कावळाही आपल्यापरीने संसार करतो. पण आम्ही त्यापेक्षा वेगळं काय करतो? आमचा जिवंतपणा हा कावळ्या एवढाच आहे का? देवाने आम्हाला बुद्धी दिली, स्वतःचा विकास साधण्याची. प्राण्यांमध्ये, पक्षांमध्ये ती नाही. पण विकास साधणं म्हणजे काय, तर लहानपणापासून आपण जी स्वप्नं पाहिली, ती पूर्ण करण्यासाठी अट्टाहास करणं. खूप सुंदर स्वप्न आपण पाहिलेली असतात. मग ती कितीही लहान असली तरी हरकत नाही. मला काय हवंय, याचा विचार आपण करतो का?

हे जग सोडून जाताना, आपण मस्त जगलो, शानसे जगलो असं वाटलं पाहिजे. ८०, ९० वर्षाच्या माणसांनाही मृत्यूची भीती वाटते. आपण आयुष्यात काही केलं नाही, ही बोचणी माणसाला लागते. त्यातून मृत्यूची भीती वाटते. पण आयुष्याच्या ६०,७० व्या वर्षीही जीवन पुन्हा उभं करू शकतो. माझ्या पत्नीच्या आजींना लिहिता वाचता येत नव्हतं, वयाच्या साठीच्या पुढे त्यांनी एका वाढदिवसाला आपल्या नातीकडे लिहिणं वाचणं शिकवशील का असं विचारलं. नातीने शिकवल्यानंतर त्या माऊलीने पावणेचारशेच्यावर ग्रंथ, कादंबर्‍या वाचल्या. जीवन समृद्ध केलं. अनेक गोष्टींसाठी त्या वाचनाचा वापर केला. ह्या स्त्रीने असामान्य असं जीवनात काही केलेलं नव्हतं. पण ही असामान्य गोष्ट घडली".

सरतेशेवटी बापूंनी डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या उद्गारांची सर्वांना आठवण करुन दिली, जे त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्यच आहे. ‘स्टार्ट व्हेअर यु आर, विथ व्हॉटएवर यु हॅव, मेक समथिंग आऊटऑङ्ग इट अँड नेव्हर बी सॅटिसफाईड’.

Published at Mumbai, Maharashtra - India