'ॐ त्रिविक्रमाय नम:' - सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे मराठी प्रवचन

‘ॐ त्रिविक्रमाय नम:’ या नामावर परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू त्यांच्या मराठी प्रवचनात बोलत आहेत. दि. 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर प्रकाशित झालेल्या, सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध-लिखित ‘त्रिविक्रम(हरिहर) अनंतनामावलि’त या त्रिविक्रमाची, या हरिहराची नामे आणि त्यांचा थोडक्यात अर्थही देण्यात आला आहे. भक्तीत भाव महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करताना बापूंनी राष्ट्रसन्त श्रीतुकडोजी महाराज यांच्या ‘मनी नाही भाव, म्हणे देवा! मला पाव’ या अभंगाचा संदर्भ दिला. बापू अनेक वेळा त्यांच्या प्रवचनात या अभंगाचा संदर्भ देतात. 

आषाढी एकादशीच्या सप्ताहातील गुरुवारी पंढरपुरच्या विठ्ठलाच्या सन्तांच्या विविध अभंगांचा सत्संग श्रीहरिगुरुग्राम येथे बापूंच्या मार्गदर्शनानुसार, बापूंच्या उपस्थितीत संपन्न होत असताना एका सत्संगात सन्त श्रीतुकडोजी महाराजांचा हा अभंग घेण्यात आला आणि तेव्हा हा अभंग गात सत्संगात सामील झालेले बापू आपणा सर्वांना नक्कीच आठवत असतील. 

‘देव म्हणजे काय’ हे सोप्या शब्दांत सांगताना बापू म्हणाले - ‘देव हा आधार आणि आनंद यांचा मूळ स्रोत असणारा, आधार आणि आनंद देणारा आहे.’ 
आम्हां भक्तांना आधार आणि आनन्द देण्यासाठीच भगवन्त, सद्‍गुरुतत्त्व सगुण साकार रूप धारण करून अवतरते. ‘सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती’ या अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या आरतीतील ओळीचा उल्लेख करून बापूंनी यावेळी केला. 


या संदर्भात मला सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘आवाहनं न जानामि’ या पुस्तकाच्या सुरुवातीच्या ओळी आठवतात. सद्‍गुरुतत्त्वास साद घालताना बापू म्हणतात - ‘हे माझ्या लाडक्या गुरुराया, ..... तुझ्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन निघाल्यावर सर्व भक्तांना होणारा परमानंद हीच माझ्या अज्ञानी मनातील एकमेव गुरुकिल्ली, एकमेव ज्योती आणि एकमेव आधार.’ 


जो खराखुरा श्रद्धावान आहे, त्याचं पुण्य कधीच संपत नाही, हे वाक्य मनात ठसवण्यासही बापूंनी त्यांच्या प्रवचनात सांगितले. श्रद्धा आणि श्रद्धावान यांची व्याख्या बापूंनी श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रन्थराज द्वितीय खण्ड प्रेमप्रवास मध्ये दिलीच आहे. 


‘ईशावास्यमिदं सर्वम्.....’ या ईशावास्य उपनिषदातील प्रथम मन्त्राचा अर्थ स्पष्ट करताना बापूंनी ‘ईशावास्य उपनिषदास शिखर उपनिषद् असेही म्हणतात’ ही माहितीदेखील दिली. 


श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रन्थराज तृतीय खण्ड आनन्दसाधना मध्ये या मन्त्राचे माहात्म्य सांगताना बापू लिहितात - ‘हा एक असा महान मंत्र आहे की ज्यात संपूर्ण भारतीय संस्कृतीचे व भारतीय धर्मांचे संपूर्ण सार साठविलेले आहे.’ 


भक्तांना अडचणी-संकटांतून सोडवण्यासाठी सर्वोच्च शासक असणारा त्रिविक्रम मार्ग कसा काढतो, ते त्यालाच ठाऊक असते, असेही बापूंनी सांगितले आणि त्याचबरोबर स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या सार्वभौम मंत्रगजराचे महत्त्व विशद केले. 


औरंगाबादला राहणारी, युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेली एक श्रद्धावान विद्यार्थिनी, सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या स्मरणासह मनात सतत मन्त्रगजर करत, रशिया युक्रेन युद्ध सुरू होताच त्या भीषण परिस्थितीत, उणे ६ डिग्री तापमानात ३० कि.मी.पर्यंत पायपीट करत पोलंडच्या सीमेपर्यंत पोहोचते, तेथे प्रवेश मिळण्यात येणारे अडथळे पार करते आणि तेथून पुढे भारतात सुखरूप परतते, हा तिच्या जिवावर बेतलेल्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या प्रवासाचा अनुभव ऐकणार्‍याच्या जिवाचा थरकाप उडवणारा आहे आणि त्याचबरोबर सद्‍गुरुस्मरणासह केलेल्या मन्त्रगजराचे सामर्थ्य स्पष्ट करणारा आहे.   


सद्‍गुरुवन्दनाच्या ‘ब्रह्मानन्दं परमसुखदं....’ या सुविख्यात श्लोकातील ‘भावातीत’ या शब्दाच्या अर्थाचे बापूंनी विवेचन केले. मूळ सद्‍गुरुस्वरूप त्रिविक्रम हा भावातीत महाभाव असून जो भक्त एकदा मन्त्रगजराचा स्वीकार करतो, त्याला तो कधीच टाकत नाही असेही त्यांनी सांगितले.

प्रवचनाच्या शेवटी बापूंनी स्वत:च्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी श्रीपंचमुखहनुमत्कवच अधिकाधिक वेळा म्हणण्यास सांगितले. बापूंनी ०९ मार्च २०१७ पासूनच्या आपल्या प्रवचनांमध्ये पंचमुखहनुमत्कवचाचे सविस्तर विवेचन केले आहे.

सन्तश्रेष्ठ तुलसीदासजींनी संकटमोचन हनुमानाष्टकात ‘को नहीं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो’ असे स्पष्टपणे म्हटलेच आहे. ‘कुठलेही संकट आले की घाबरून जाऊ नका. जेवढे संकट मोठे तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे. तेवढे माझे प्रयत्न अधिक मोठे झाले पाहिजेत’ हे बापूंचे वाक्य आम्हाला ठाऊक आहेच. बापूंनी सांगितल्याप्रमाणे आपण पंचमुखहनुमत्कवचाचे अधिकाधिक पठण करूया, भक्तिभावचैतन्यात राहून मन्त्रगजर करत राहूया. ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’ हे आम्हाला बापूंनी दि. ३ मार्च २०२३ रोजीच्या प्रवचनात सांगितलेच आहे.