मॅनेजमेंटचा नवा मंत्र ( Jugaad - The new management mantra )

अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास.

या सहस्‍त्रकाच्या पहिल्या बारा वर्षातच अनेक क्षेत्रात अनेक बदल झाले. शाश्‍वत मानवी मुल्यांची जपणूक करण्याबरोबरच या बदलांशी आणि बदलांच्या वेगाशी आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही तर कालौघात आमचा निभाव लागणार नाही, आम्ही विरून जाऊ; आणि म्हणूनच बदलत्या काळाची पावलं ओळखून बापूंनी काही मोजक्या सतरा जणांचे सेमीनार घेतले. तीस (३०) तासांच्या या सेमीनारस्‌मध्ये बापूंनी अनेकविध विषयांची ओळख करुन दिली. अटेंशन इकोनॉमी (Attention Economy), जुगाड (Jugaad), क्लाऊड कॉम्प्युटींग (Cloud Computing) यासारखे अनेक विषयांशी अनेक जण अनभिज्ञ होते. जुगाड विषयी बोलताना बापू म्हणाले "पुढे येणार्‍या काळात यशस्वीपणे तरुन जाण्यासाठी जुगाड स्ट्रॅटेजी हा एकमेव उपाय असेल. जुगाड स्ट्रॅटेजी जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून राहिल.

बापूंचा व्यापक दृष्टिकोन सर्व श्रध्दावानांपर्यंत पोहचावा या हेतूने मी हा लेख आजच्या ब्लॉगपोस्टमध्ये देत आहे.

 

Jugaad_Management
Jugaad

 

राममेहरसिंग यांच्या पोल्ट्री फार्मवर इलेक्ट्रिसिटी उपलब्ध तर होती, पण सातत्याची शाश्‍वती मात्र नव्हती. लोडशेडिंगचा प्रश्‍न खूप भीषण बनत चालला होता. तासनतास इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पोल्ट्रीफार्म चालवणं मुश्किल बनत होतं. एका बाजूला हा प्रश्‍न, तर दुसर्‍या बाजूला जनरेटरच्या डिझेलचा वाढता खर्च. इलेक्ट्रिसिटीचं बिल महिना रु. ४५,०००/- आणि त्याचबरोबर डिझेलचा महिना खर्च रु. १,२०,०००/-.

प्रश्‍न तर जटिल होता. पण पूर्वाश्रमीचे सैनिक असणारे राममेहरसिंग आपल्यापुढील जटिल प्रश्‍नाने गांगरून, भांबावून गेले नाहीत. हरियानाच्या झज्जल गावातील राममेहरसिंग यांनी शांतपणे, पूर्ण विचारांती त्यांच्या मनाला पटलेला साधा आणि सोपा, पण काटकसरीचा असा काही उपाय शोधला की जो पुढे जाऊन सर्वांना मार्गदर्शक ठरला. हा उपाय केल्यानंतर राममेहरसिंगचा डिझेलचा खर्च आहे फक्त रु. ६०,०००/- आणि आता त्यांनी दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगमकडून वीज घेणंही बंद केलं आहे; आज ते साधारणपणे महिन्याला रु. १,००,०००/- ची बचत करत आहेत. पण हे त्यांना कसं शक्य झालं?

तर राममेहरसिंग यांनी त्यांच्या फार्मवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारं पोल्ट्री वेस्ट वापरून बायोगॅस पॉवर प्लान्टच्या सहाय्याने स्वतःच वीजनिर्मिती करायचं ठरवलं; आणि आता असा अनोखा बायोगॅस पॉवर प्लान्ट बसवल्यावर त्यांच्याकडे अशा पद्धतीने स्वतःच निर्माण केलेली वीज इतकी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे की दिवसाला कुठल्याही लोडशेडिंगशिवाय अव्याहतपणे १४ तास वीज ते वापरत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पोल्ट्री वेस्टच्या वापरामुळे बायोगॅस पॉवर प्लॅन्टमधून बाहेर पडणारी स्लरी (मळी) ही अत्यंत पोषक असं खत म्हणून शेतात वापरता येतंय. या खतात नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फोरस ही पोषक द्रव्यं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झालंय.

अशी ही पोल्ट्री वेस्टमधून इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनची (वीज निर्मितीची) राममेहेरसिंह यांची अनोखी संकल्पना!

राममेहरसिंग यांची ही नावीन्यपूर्ण संकल्पना फक्त प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून प्रत्यक्षात आली; राममेहरसिंग यांनी प्रतिकूल परिस्थितीलाच संधी मानून आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या ‘वेस्ट’लाच मौलिक साधनसंपत्तीत रूपांतरित केलं. त्यांनी स्वतःच्या समस्येवर एक किफायतशीर आणि विश्‍वासार्ह उपाय, तोडगा तर काढलाच, पण हरियानातील सर्व पोल्ट्रीफार्मच्या मालकांना एक अभिनव मार्ग दाखवला. राममेहरसिंग यांच्या या अनोख्या शोधाची हरियाना सरकारनेही उचित दखल घेतली व अशा प्रकारे वीजनिर्मिती करू इच्छिणार्‍या पोल्ट्रीफार्मच्या मालकांना आर्थिक मदतीची सोय केली.

आजच्या भाषेतील प्रचलित शब्द वापरायचा तर असं विचारावं लागेल की राममेहेरसिंह ह्यांनी कसं काय हे ‘जुगाड’ केलं?

जुगाड... आम्ही भारतीय ‘जुगाड’ (Jugaad) हा शब्द अगदी सहजतेने रोजच्या जीवनात वापरत असतो. एखादं काम किंवा करावयाची गोष्ट सहजतेने होत नसेल किंवा जमत नसेल तर आम्ही पटकन म्हणतो, ‘अरे काहीतरी ‘जुगाड’ कर रे’ किंवा ‘काहीतरी ‘जुगाड’ करायला हवं.’ आम्हाला त्यावेळी अभिप्रेत असलेला अर्थ असतो ‘येन केन प्रकारेण’ ते काम करून घ्यायचं, उरकायचं; त्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचा. आणि बर्‍याचवेळा बर्‍याच जणांना ह्यात ‘कुठलाही’ मार्ग निषिद्ध नसतो; आणि ह्या प्रचलित अर्थामुळेच हा शब्द अनेकजण चुकीच्या तर्‍हेने वापरत असतात.

...आणि मग इथेच प्रश्‍न येतो ‘जुगाड’ (Jugaad) म्हणजे नक्की काय? आजच्या मॅनेजमेंट गुरुंना आणि कंपन्यांच्या सीईओज्ना या शब्दाचा हा ‘येन केन प्रकारेण’ हा अर्थच अभिप्रेत आहे का? त्यांचीही संकल्पना अशीच आहे का? नक्कीच नाही; कारण आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकून रहायचं असेल, तर चाकोरीबाहेरचंच काहीतरी दिलं पाहिजे हे पुरेपूर पटलेल्या आजच्या मॅनेजमेंट जगताचा ‘जुगाड’ (Jugaad) हा एक स्वयंसिद्ध मंत्र बनला आहे. ते एक शास्त्रीय तंत्र आहे, त्याचबरोबर ती एक कलाही आहे, ह्याची खात्री आजच्या मॅनेजमेंट जगताला अधिकाधिक पटू लागली आहे.

‘जुगाड’ या मॅनेजमेंट मंत्राची अथवा तंत्राची साधी व सोपी व्याख्याच जर करायची झाली तर थोडक्यात असं म्हणता येऊ शकेल की ‘जुगाड’ (Jugaad) म्हणजे मानवाच्या कल्पकतेतून आणि हुशारीच्या सहाय्याने, उपलब्ध असलेल्या साधनांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, सर्वांसाठी फायदेशीर असलेला एक साधा, सोपा आणि किफायतशीर उपाय किंवा तोडगा काढण्याची एक योजनाबद्ध तत्त्वप्रणाली!

‘जुगाड’करिता झपाटून जाऊन आव्हान स्वीकारण्याची मनाची धारणा असावी लागते; त्याचबरोबर आवश्यकता असते ती रोजच्या वापरातील वस्तूंचा नव्याप्रमाणे वापर करण्याची, शिताफीने आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेची, कल्पकतेची, अवघड परिस्थितीतही मनाच्या शांत राहण्याच्या कुवतीची आणि त्याचबरोबर परिस्थितीनुसार बदल घडवून आणणार्‍या विचारसरणीची, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही विचारपूर्वक कृती करून काटकसरीच्या मार्गाने अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्त फलप्राप्ती किंवा फलनिष्पत्ती करून घेता येते. मग कधी ही फलनिष्पत्ती ‘कमी खर्च किंवा जास्त फायदा’ ह्या स्वरूपात असेल, तर कधी ‘कमीतकमी वेळात केलेल्या जास्तीत जास्त कामा’च्या स्वरूपात असेल; पण ह्या दोन्ही प्रसंगी वस्तूचा अथवा सेवेचा दर्जा किंवा गुणवत्ता कुठल्याही प्रकारे घसरत नाही किंवा घसरू दिला जात नाही. अशा या अनोख्या मॅनेजमेंट तंत्राचा उगम भारतात झालाय हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावू शकतात; पण आज त्याच्या वापराचं विशिष्ट असं एक शास्त्र विकसित झालंय, हे नक्की!

‘जुगाड’ हा शब्द ‘जूग्गड’ या हिंदी/पंजाबी शब्दावरून आलाय. पंजाबमधील ग्रामीण भागात वाहतुकीकरिता वापरात असणारं, वेगवेगळे भाग जुळवून तयार केलेलं, लोकप्रिय आणि खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असणारं वाहन म्हणजे ‘जूग्गड’. हे वाहन प्रवाशांच्या, तसंच सामानाच्या वाहतुकीसाठी समानपणे वापरलं जातं. ह्याचा पुढचा भाग असतो मोटरसायकलसारखा; आणि मागचा भाग असतो सायकलरिक्षासारखा किंवा जीपच्या मागच्या भागासारखा. साधारणपणे वीसएक माणसं एकावेळी ह्यातून प्रवास करतात; क्वचित प्रसंगी त्याहूनही जास्त. हे वाहन प्रथम ज्या डिझेल इंजिनवर चालत असे, ते मुळात शेतातील इरिगेशन पंप चालवण्याकरता वापरलं जायचं. या वाहनाला कुठलीही आरटीओची मान्यता नसली तरी हे आज भारतातील ग्रामीण भागात हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं वाहन आहे. आज जुन्या डिझेल इंजिनची जागा मोटरसायकलच्या इंजिनने घेतली आहे.

उपलब्ध असलेल्या साधनांचा किफायतशीर वापर करून कल्पकतेने अधिक चांगली किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट बनवणं म्हणजे ‘जुगाड’; जे करणं आवश्यकच आहे ते काटकसरी पद्धतीने करणं म्हणजे ‘जुगाड’. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ म्हणजे जो सक्षम आहे त्याचाच कालौघात निभाव लागतो; तोच टिकून राहतो हे तत्त्व प्रत्यक्षात आणणं म्हणजे ‘जुगाड’.

या सहस्त्रकाच्या पहिल्या बारा वर्षातच आपण अनेक क्षेत्रात अनेक स्तरांवर प्रचंड बदल होताना बघितले. या बदलांचा वेगही तसाच प्रचंड आहे; आणि हा वेग पकडतांना अनेकांची दमछाक होत आहे. पण शाश्‍वत मानवी मुल्यांची जपणूक करण्याबरोबरच या बदलांशी आणि बदलांच्या वेगाशी आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही तर कालौघात आमचा निभाव लागणार नाही आम्ही विरून जाऊ आम्ही नाश पाऊ आणि म्हणूनच बदलत्या काळाची पावलं ओळखून प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी काही मोजक्या सतरा जणांचा सेमिनार घेतला. जुलैच्या लागोपाठ दोन सोमवारी. प्रत्येकजण वेगवेगळ्या स्त्रोतांशी निगडीत होता. कोणी डॉक्टर होतं तर कोणी इंजिनिअर तर कोणी वकील कोणी व्यावसायिक तर कोणी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये उच्चपदावर काम करणारे मॅनेजमेंट एक्सपर्टस् होते. तर कोणी खाजगी कंपनीत काम करणारे तर काही सेवाभावी संस्थांशी निगडित असणारे. तीस (३०) तासांच्या या सेमीनारमध्ये डॉ. अनिरुद्धांनी अनेकविध विषयांची ओळख करून दिली. अटेंशन इकॉनॉमी, जुगाड, क्लाऊड कॉम्युटिंग यासारखे अनेक विषयांशी अनेकजण अनभिज्ञ होते. जुगाड विषयी बोलताना डॉ. अनिरुद्ध म्हणाले पुढे येणार्‍या काळात यशस्वीपणे तरून जाण्यासाठी जुगाड स्ट्रेटेजी म्हणजे जुगाड व्युहतंत्र हा एकमेव उपाय असेल आणि हेच जुगाड व्यूहतंत्र किंवा व्यूहरचना जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून राहील; तसेच प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल आणि तेच सक्षमतेच लक्षण ठरेल.

आणि म्हणूनच ह्या ‘जुगाड’ची गरज आज कॉर्पोरेट जगतालाही जाणवू लागली आहे.

आज जगात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्याही आपले खर्च कमी कसे होतील यावर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेक कंपनीज्ना त्यांचा रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर होणारा खर्च झेपेनासा झालाय. सध्या प्रचलित असणारी ‘सिक्स सिग्मा’ (Six Sigma) पद्धत नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास अपुरी पडत आहे. शिवाय या खर्चातून नवीन काही हाती येईल याची खात्रीही नसते व त्याचबरोबर आलंच तरी ते कधी आणि किती काळानंतर, हाही प्रश्‍नच असतो. मार्केटमध्ये तर जीवघेणी स्पर्धा आहे. अशा वेळेस अनेक मॅनेजमेंट गुरुज आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओज् आपला नेहमीचा साचेबंद दृष्टिकोन बदलून भारतात उगम पावलेल्या ‘जुगाड’ तंत्राचा वापर नित्य व्यवहारात करू लागले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनरल इलेक्ट्रिक आणि प्रॉक्टर अँड गँबल या बहुराष्ट्रीय कंपन्या!

‘जुगाड इनोव्हेशन’ या पुस्तकात, पुस्तकाचे प्रथितयश लेखक मॅनेजमेंट तज्ञ नवि रादजाऊ, जयदीप प्रभू आणि सिमोनी आहूजा यांनी ‘जुगाड’ची सहा मूलभूत तत्त्वं मांडली आहेत. ज्या कोणाला आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची इच्छाआकांक्षा आहे, त्या प्रत्येकाने वाचावे असे हे उत्कृष्ट पुस्तक आहे. पुस्तकात मांडलेली तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत; १. संकट किंवा प्रतिकूल परिस्थितीलाच संधी मानणं. २. कमीतकमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीतजास्त कार्यक्षमता वाढवणं. ३. विचारसरणीची व कृतीची परिवर्तनीयता म्हणजेच साचेबंद विचारसरणी सोडून उदारमतवादी असणं; अर्थात नवीन स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेला मनाचा मोकळेपणा. ४. प्रश्‍नांवरील उपाय किंवा तोडगा साधा आणि सोपा असणं. ५. दुर्लक्षित घटकांचाही विचार करणं - सर्वसमावेशकता ६. मनाला भावतं तेच करणं (अनेकविध पर्यायांचा विचार करून)

या सर्व तत्त्वांचा/मुद्यांचा एकत्रित विचार करून शोधलेला उपाय म्हणजेच ‘जुगाड’तंत्राचा उचित वापर. कुठलंही एक तत्त्व जरी दुर्लक्षित राहिलं, तर याला ‘जुगाड’ म्हणता येणार नाही; आणि म्हणूनच ‘जुगाड’ हे सायन्स (शास्त्र) आणि आर्ट (कला) यांचा सुरेख संगम आहे.

राममेहरसिंग यांच्या या अभिनव प्रयोगाचा सांगोपांग विचार करता असं नक्कीच म्हणता येईल की त्यांनी ‘जुगाड’ची मूलभूत तत्त्वं, ‘जुगाड’चे पायाभूत नियम अमलात आणले.

aniruddha bapu, aniruddha, bapu, Dr. aniruddha joshi, cycle, jugaad

हे पायाभूत नियम पाळले की समस्येवर आधी कधीच न कल्पिलेला तोडगा समोर येऊ शकतो. आसाममधील मोरीगांवच्या राहणार्‍या कनकदासनी सहजतेने या सर्व तत्त्वांचा सुरेख वापर करून आपल्या प्रश्‍नाला सहज, सुंदर उपाय शोधला. कामावर जाण्याकरता कनकदासजींना रोज सायकलचा प्रवास करावा लागायचा व तोही अतिशय खाचखळगे व खड्डे असलेल्या रस्त्यांवरून. रस्ते व्यवस्थित करणं हे त्यांच्या अखत्यारीतही नव्हतं आणि त्यांच्या कुवतीबाहेरही. तसा विचार करणं निरर्थक होतं. पाठदुखी मागे लागून कनकदासजी हैराण झाले; पण त्यांनी हार मानली नाही. याच खाचखळगे, खड्डे असलेल्या रस्त्याचाच कसा उपयोग करून घेता येईल या विचारांनी त्यांना झपाटून टाकलं आणि त्यातूनच शोध लागला एका अनोख्या सायकलचा. कनकदासजींनी आपल्या सायकलमध्ये काही बदल घडवून आणले. आता ही बदल घडवून आणलेली सायकल जशी खड्ड्यांतून जाते, तशी तिच्या पुढच्या चाकाचे ‘शॉक ऍब्सॉर्बर्स’ ऊर्जा उत्सर्जित करतात व हीच ऊर्जा मागच्या चाकाला गती देण्यास वापरली जाते. म्हणजेच सायकल जेवढ्या वेळा खाचखळग्यांतून जाईल व धक्के खाईल, तितक्याच प्रमाणात ती सायकल सहजपणे जास्त वेग पकडेल व चालवणार्‍याचे श्रम वाचतील, शिवाय चालवणार्‍याला होणारा खाचखळग्यांचा त्रासही ‘शॉक ऍब्सॉर्बर्स’मुळे कमी होईल! इथे कनकदासजींनी संकटालाच संधी मानलं. कमीत कमी साधनांचा वापर व तोही काटकसरीने करून त्यांनी काढलेला उपाय सर्वसामान्यांना वापरता येण्याजोगा होता आणि हे सर्व करत असताना त्यांच्या विचारात आणि कृतीत लवचिकताही होती. साचेबंद विचारसरणी त्यांनी झुगारली; आणि शेवटी असं म्हणता येईल की अनेक पर्यायांचा विचार करून शेवटी त्यांच्या मनाला जे पटलं तेच त्यांनी केलं.

अशी ही अभिनव सायकल ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ अहमदाबाद येथील प्रोफेसर श्री. गुप्ता यांच्या नजरेस पडली व त्यांनी कनकदासजींना ह्या शोधाचे पेटंट मिळवून देण्यास मदत केली. आज एम.आय.टी. चे विद्यार्थीही या शोधाचा वापर स्वयंचलित वाहनात कसा करता येईल याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत शक्य होईल व त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल.

Jugaad_incubator

पण कनकदासजी हे काही एकच ‘स्टँड अलोन’ (एकमेव) उदाहरण नाही; अशी भारतातील अनेक उदाहरणं देता येतील. चेंगलपट्टू (तामीळनाडू) येथील बालरोगतज्ञ डॉ. सत्या जगन्नाथन यांना ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या इन्क्यूबेटर्सचा प्रश्‍न भेडसावत होता. त्यावेळेस सर्वत्र उपलब्ध असणार्‍या इन्क्यूबेटरची किंमत साधारण एक लाखाच्या आसपास होती; ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब गरजूंना ह्याची सेवा परवडणं शक्यच नव्हतं व हे ग्रामीण भागातील बालमृत्यूंच्या मोठ्या प्रमाणाचं एक प्रमुख कारण होतं. डॉ. सत्या जगन्नाथनची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना. गरीब गरजूंबद्दलच्या आत्मीयतेने, आपुलकीने डॉ. सत्या जगन्नाथन यांनी वापरायला सोपा असा ‘लो-कॉस्ट’ (अत्यंत माफक किंमतीचा) ‘इन्फन्ट वॉर्मर’ शोधून काढला. त्यातच फेरफार करून त्यांनी एका अभिनव इन्क्यूबेटरची निर्मिती केली, ज्याची किंमत साधारणपणे रु. १५,०००/- पर्यंत पडते. या शोधामुळे आज भारताच्या ग्रामीण भागाला भेडसावणारा खूप मोठा प्रश्‍न डॉ. सत्या जगन्नाथन यांनी सोडवला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्णपणे अपारंपरिक (‘अनकन्व्हेन्शनल’) मार्गाचा अवलंब केला; चाकोरीबाहेर जाऊन मोकळ्या मनाने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात होती.

आज भारतीय कॉर्पोरेट विश्‍वानेही या ‘जुगाड’ तंत्राचा अवलंब चालू केला आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘टाटा नॅनो’ कार.

Jugaad_Tata_nano

आजच्या घडीला टाटा नॅनो ही जगातील सर्वांत स्वस्त कार आहे. मोटरसायकल किंवा स्कूटरवरून जाणारं चार जणांचं अख्खं कुटुंब, हे भारतातील सर्वच शहरांत नित्य दिसणारं चित्र होतं. अशा कुटुंबांना परवडेल अशी आरामदायक, सुरक्षित, त्याचबरोबर दुचाकीला पर्याय ठरू शकणारी कार देता यावी अशी मनिषा त्यावेळचे टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांची होती. ‘जुगाड’ तंत्राचा वापर करून टाटा मोटर्सने ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली. टाटा मोटर्सने ‘फ्रूगल इंजिनिअरिंग’ म्हणजेच काटकसरी कृती व अभियांत्रिकी यांचा सुरेख संगम करून त्यांचं ध्येय साध्य केलं आणि हाच धडा पुढे टाटा मोटर्सचे एम.डी. रविकांत यांनी चालवला. जेव्हा पश्‍चिम बंगालमधील सिंगूर येथे सामाजिक व राजकीय कारणांमुळे कारखाना उभा करून उत्पादन चालू करणं अशक्य झालं, तेव्हा श्री. रविकांत यांनी सर्व पर्यायांचा सांगोपांग विचार करून ‘स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकत’ कारखाना सिंगूर येथून गुजरातमधील साणंद येथे हलवला. त्याकरिता त्यांना कोणत्याच तथाकथित मॅनेजमेंट एक्स्पर्टच्या सल्ल्याची आवश्यकता भासली नाही. कारखाना उभारून उत्पादन चालू होण्यास लागणारा अठ्ठावीस महिन्यांचा काळ श्री. रविकांत यांनी चौदा महिन्यांवर आणला. श्री. रविकांत यांनी ‘जुगाड’ची तत्त्वं जशीच्या तशी - तंतोतंत अमलात आणली.

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi, ecg, jugaad

भारताच्या कॉर्पोरेट विश्‍वातील अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. कारण ‘जुगाड’करिता आवश्यक असणारे गुण आणि विचारांची बैठक ही भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे भारतीय जनमानसाच्या मनोवृत्तीतच आहे, फक्त त्याला एका विशिष्ट पद्धतीने वापरायची आवश्यकता आहे. भारतातल्या सर्व शहरांत दिसणारी ‘शेअर टॅक्सी’ किंवा ‘शेअर रिक्षा’ची पद्धत ‘जुगाड’ नसून काय आहे? बसणार्‍या प्रत्येकाचा फायदा, त्याचप्रमाणे टॅक्सी आणि रिक्षाचालकाचंही अधिक उत्पन्न! इंधनाचीही बचत, त्यामुळे कमी होणारं प्रदूषण व त्याचबरोबर वाहतुकीवरील ताणही कमी. आता या शेअरिंग पद्धतीला शासकीय यंत्रणेचीही मान्यता मिळू लागली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचंच उदाहरण द्यायचं झालं तर जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीचं देता येईल. जीईचं नेहमी वापरात असणारं महाग व वजनदार ईसीजी मशीन भारतात वापरण्यास तेवढंसं योग्य नव्हतं. ते ईसीजी मशीन त्याच्या जास्त वजनाने डॉक्टरांना इतरत्र नेणंही शक्य होत नव्हतं; तसं ते नेणं त्रासदायक होतं. त्याचबरोबर भारतासारख्या देशात अनेक ठिकाणी लोडशेडिंगमुळे (विजेच्या भारनियमनामुळे) असं विजेवर चालणारं मशीन उपयोगी नव्हतं. अशा वेळेस जीई (इंडिया) च्या इंजिनिअर्सनी हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या एका नवीन ईसीजी मशीनची निर्मिती केली. नित्याच्या वापराच्या मशीनच्या तुलनेत ह्या ‘मॅक-४००’ मशीनचं वजन एक पंचमांश होतं व किंमत एक दशांश होती. वजनाने हलकं असल्याकारणाने ते कुठेही घेऊन जाणं डॉक्टरांना सोपं होतं व त्याचबरोबर ‘बॅटरीवर’ चालत असल्याने म्हणजेच विजेची आवश्यकता नसल्यामुळे, खेडोपाडी हे मशीन वापरणं सुटसुटीत होत होतं. जीई हेल्थकेअर (इंडिया) चे प्रेसिडेंट आणि सीईओ टेरी ब्रेसनहॅम यांच्या मते ‘तुमचा शोध हा फक्त नव्या विकसित तंत्रज्ञानावर आधारित न राहता, तो शोध असा एक व्यावसायिक आदर्श बनायला हवा, ज्याच्यामुळे ते नवविकसित तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांना परवडणारं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारं असावं’; आणि या नव्या ईसीजी मशीनने नेमकं हेच करून दाखवलं.

एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने ‘जुगाड’ची सहाही तत्त्वं उत्कृष्टरित्या वापरात आणण्याचं जीई हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आज भारतात जीईचा महसूल साधारण साडेचौदा हजार कोटी रुपयांचा आहे. यावरून जीईच्या फक्त भारतातील व्यवसायाच्या व्याप्तीची कल्पना करता येऊ शकेल.

aniruddha bapu, bapu, aniruddha, dr aniruddha joshi, nokia, jugaad

कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये असं कुठलंही नवीन उत्पादन तयार करायचं असलं की त्याची सुरुवात होते ती आपला ग्राहक ठरवण्यापासून व नंतर त्या ग्राहकांच्या आवश्यकता व गरजा ओळखण्याची. इथे चटकन डोळ्यासमोर येतं, ‘नोकिया’ ह्या बहुराष्ट्रीय मोबाईल कंपनीच्या ‘नोकिया ११००’ ह्या मोबाईलसेटचं उदाहरण! जेव्हा त्यांच्या भारतातील, आफ्रिकेतील व ब्राझीलमधील ‘एथनोग्राफर्स’नी त्या त्या देशातील संभाव्य ग्राहकक्षेत्राची माहिती आणली, ती खरं तर एखादं मोबाईलसारखं नवीन उत्पादन बाजारात आणायची तयारी करणार्‍या कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीकरिता निराशाजनकच होती. अस्वच्छ झोपड्यांमध्ये राहणारे, अशिक्षिततेचं प्रमाण भरपूर असणारे, बाजारात उपलब्ध असणारा कुठलाही मोबाईल न परवडणारे व त्या मोबाईल्सची अतिप्रगत फीचर्स समजण्यास अवघड वाटणारे गरीब कष्टकरी व मजूरवर्गातील लोक. मुख्य म्हणजे ते जिथे राहतात व काम करतात, तिथे धुळीचे प्राबल्य व विजेची कमतरता असल्याने त्यावेळेस सर्वत्र उपलब्ध असणारे मोबाईल्स तिथे फार काळ टिकूच शकले नसते.

ही सर्व माहिती हाती येताच नोकियाचे संशोधक व तंत्रज्ञ कामाला लागले....ह्या वर्गाला, त्यांच्या अडचणींवर मात करणारा मोबाईल उपलब्ध करून द्यायचाच हे आव्हान स्वीकारत!

....आणि साकार झाला नोकियाचा क्रांतिकारी ‘नोकिया-११००’ हा मोबाईल. धुळीच्या वातावरणाला पुरून उरणारं मजबूत डिझाईन, ज्यात वापरणार्‍याला गोंधळून टाकणारं एकही अतिप्रगत फीचर दिलेलं नव्हतं....केवळ कॉल करण्याची-घेण्याची, तसेच एसएमएसची सुविधा....बस्स! शिवाय ह्या रिसर्चसच्या हेही लक्षात आलं होतं की अनेकदा ह्या वस्त्यांमध्ये मोबाईल असणारे लोक मोबाईलच्या स्क्रीनचाच वापर काळोखात उजेडासाठी करतात. तेव्हा त्यांनी ह्या मोबाईलमध्ये नंतर चक्क टॉर्चचं फीचरही समाविष्ट केलं आणि ह्या नाविन्यपूर्ण डिझाईनची त्यांना पोचपावतीदेखील मिळाली. हा फोन ह्या ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. केवळ ह्या गरीब कष्टकरी वस्त्यांमध्येच नव्हे, तर तो वापरायला अतिशयच सोपा असल्याने मध्यमवर्गातही चांगलाच लोकप्रिय झाला; शिवाय अनपेक्षितपणे तो अजून एका वर्गात लोकप्रिय ठरला, तो म्हणजे आशिया खंडातील ट्रक ड्रायव्हर्स, ज्यांना रात्रीचा गाडीमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्याकरता लाईटची जरूरी भासत असल्याने त्यांनीही हा फोन उचलून धरला. हा फोन इतका लोकप्रिय ठरला की ह्या फोनचे जगभरात तब्बल २५ कोटीच्या वर सेट्स विकले गेले, हा आजतागायतच्या कुठल्याही मोबाईलच्या मॉडेलच्या विक्रीकरता उच्चांक आहे.

आजच्या घडीला पूर्वी कधी नव्हे इतकी ‘जुगाड’ची आवश्यकता लोकांना पटू लागली आहे. नव्या सहस्रकाच्या स्वागताला जगाची लोकसंख्या सहाशे कोटी होती; तीच आज या सहस्रकाच्या पहिल्या तपात सातशे कोटीवर जाऊन पोहोचली आहे. यामुळे सर्वत्र अन्नधान्याबरोबरच इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय. याचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किंमतीवर होतोय. शिवाय कुठल्याही उत्पादनाकरता आवश्यक असणार्‍या पाण्याचा आणि विजेचा प्रश्‍नही भयावह रूप धारण करतोय. त्याचबरोबर बाजारातील स्पर्धाही तीव्र होतेय. ग्राहकराजाही चोखंदळ बनलाय; त्याच्याकडेही खरेदीसाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे वस्तूचा दर्जा उच्च ठेवून किंमत कमी ठेवण्याची गरज प्रत्येकाला जाणवायला लागली आहे. अशा परिस्थितीत ‘जुगाड’चा मार्ग सर्वांनाच खुणावतोय; आजच्या जगाची ती गरज बनली आहे.

खेड्यामधला गरीब मजूर असो किंवा शेतीबरोबर पशुपालन करणारा छोटा शेतकरी असो की शहरातील कॉर्पोरेट विश्‍वाची जबाबदारी सांभाळणारा उच्चपदस्थ अधिकारी असो; छोट्याशा गावातील लहानसा उद्योजक असो किंवा देशातील मोठा उद्योगसमूह असो; मल्टिनॅशनल (बहुराष्ट्रीय) उद्योगसमूह असो किंवा फेसबुक-गुगल सारख्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आयटी कंपनीज् असोत; सरकारी किंवा निमसरकारी संस्था असोत, प्रत्येकाला येणार्‍या काळात सक्षमतेने टिकून राहण्यासाठी ‘जुगाड’चा वापर अनिवार्य बनला आहे; नव्हे, ती त्यांची मूलभूत गरज बनली आहे. ‘जुगाड’चा दृष्टिकोन (‘ऍप्रोच’) न ठेवल्यामुळे किंवा न स्वीकारल्यामुळे अनेक कंपन्यांची अथवा युरोपियन देशांची काय वाताहत झाली आहे, याची अनेक उदाहरणं देता येतील.

भोवतालच्या परिस्थितीमुळे ‘जुगाड’च्या तत्त्वांशी सहजतेने परिचित असणार्‍या भारतीय समाजाने, ‘आधी ते सावधपण’ या रामदास स्वामीच्या उक्तीनुसार पुढे येऊ घातलेल्या काळासाठी ‘जुगाड’या तंत्राचा व्यापक स्तरावर यथोचित वापर करणे त्यांच्यासाठी श्रेयस्कर ठरेल यात दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी आवश्यकता आहे ती जे आहे, जसे आहे त्यापासून सुरुवात करण्याची आणि जे मिळवलंय, साध्य केलंय, त्यावर संतुष्ट न राहता ‘जुगाड’चा वापर करून प्रयास करण्याची; मग यशाची वाट बघावी लागणार नाही, यशच पाठी लागेल... निःसंशय!

English Article