बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या न्याहारीकरिता वेळ मिळत नाही असे अनेकजण सांगताना आपण ऐकतो.....आणि अशावेळी मग जे काही असेल ते, शक्यतो ब्रेडच आपल्या नाश्त्याचा आविभाज्य भाग बनतो. "ब्रेडशिवाय नाश्ता" ही संकल्पना अनेकांना पटत नाही. असं असूनही अनेक घरांमध्ये आजही विविध पदार्थ केले जातात.
पण बापूंचा नाश्ता मात्र standard नाश्ता असतो. बापू आपल्या नाश्त्यासाठी एकतर आंबील आणि / किंवा इडलीच खातात; आणि इडली सुद्धा तांदूळ व उडदाच्या पीठाचीच ! काही ठिकाणी इडली फक्त तांदळाच्या पीठाचीच करण्याचीच पद्धत असते. पण अशाप्रकारे केलेली इडली बापू शक्यतो टाळतात. "आंबील" मात्र बापू नाश्त्याला नेहमी घेतात. आजच्या तरुण पिढीला एखादवेळेस आंबील हा पदार्थ माहितही नसेल, कारण मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो त्यांनी आंबील क्वचितच कधी खालल्याचं मला आढळलं. तांदळापासून बनणारं, बनवायला सोपं आणि कमी खर्चिक असं हे आंबील शरीरासाठी मात्र अत्यंत गुणकारी आहे. आज बापूंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळेही नाश्त्याला आंबीलच घेतो. छोटे दीड ते दोन बाउल भरून आंबील एका माणसाला पुरेसं होतं. आंबील नाश्त्याला घेतल्यामुळे, आपण त्याबरोबर समजा इतर काही पदार्थ घेणार असू, तर त्याचंही प्रमाण खूपच कमी होतं. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जाण्याचा प्रश्नही उरत नाही. आंबीलने भूकही छान भागते व ते पोटासाठी शामकही आहे. आज सर्वांच्या माहितीसाठी परमपूज्य नंदाई घरी करतात त्या आंबीलची रेसिपी खाली देत आहे.
आंबील भात
Ambil Recipe
* साहित्य -
परिमल तांदूळ - १ वाटी साखर - १ चमचा दह्याचे ताक - ५ वाटी पाणी - ७ वाटी मीठ - चवीनुसार
* कृती -
सर्वप्रथम १ वाटी परिमल तांदूळ एका पातेल्यात घ्यावेत. त्यानंतर ते तांदूळ तीन वेळा पाण्यात धुवावेत. धुवून झाल्यानंतर त्यात ७ वाटी पाणी घ्यावे. जी वाटी आपण तांदूळ मोजण्यासाठी वापरली आहे, तीच वाटी पाणी मोजण्यासाठी वापरावी. त्यामुळे प्रमाणात फरक पडणार नाही. पाणी घेऊन झाल्यानंतर तांदळाचे पातेले कुकरमध्ये ठेवून ३ शिट्या काढाव्यात.

भात शिजल्यानंतर भाताचे भांडे कुकरमधून बाहेर काढून ठेवावे. जेव्हा आपण भाताचं भांडं बाहेर काढू तेव्हा त्यात पाणी असणारच आहे. आता हा भात थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढावा. अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे ५ सेकंदांपर्यंत मिक्सर फिरवावा. मिक्सरच्या भांड्यातून परत तो भात त्या पातेल्यात काढून घ्यावा. आता त्यात १ चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे. साखर व मीठ घातल्यानंतर हा भात पुन्हा चांगल्या रितीने मिक्स करावा.

नंतर अशा प्रकारे मिक्स झालेल्या भातात ५ वाटी ताक घालावे. ताक घालून झाल्यानंतर परत ह्या भाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता मिक्स झालेल्या भाताची चव घेऊन बघावी. गरज वाटल्यास मीठ थोडे अधिक घालावे. त्यानंतर हे भाताचे भांडे तसेच रात्रभर ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवू नये. आंबील तयार होण्यासाठी साधारण १२-१४ तास वेळ लागतो.

अशा प्रकारे तयार झालेले आंबील आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ तास झाल्यानंतर खाऊ शकतो. म्हणजेच संध्याकाळी ८ वाजता केलेले आंबील आपण दुस-या दिवशी सकाळी १० वाजता खाऊ शकतो.
ll Hari Om ll ll Shriram ll ll Ambadnya ll