Lyrics of Sawala Sundara from album Pipasa 1

२०. सावळा सुंदर सुंदर रूपड्याचा
सावळा सुंदर सुंदर रूपड्याचा
भला दांडगा मर्द मराठा कोरीव लावण्याचा ॥ धृ ॥
वज्रविदारक रणी धुरंधर।
तरी कसा हा मृदु धराधर।
शासन करी जरी तरी अभयंकर ।
सारथी कैवल्याचा ॥ १ ॥
हसता ह्याने जीव थिरकतो ।
दृष्टी मिळता हृदय भेदितो ।
चरण देहुडा वरी बसवितो ।
पालक प्रेमी जनांचा ॥ २ ॥
घनदाट त्या मिशीत हासूनि ।
फसवी लावी वेड मम मनी ।
कृपाकरांनी पाप भेदूनी ।
रक्षक भक्तजनांचा ॥ ३ ॥
वदन मनोरम राजीव लोचन ।
ज्ञान पाझरे त्या डोळ्यातून ।
भक्ति करता नेई तारून ।
भंजक प्रारब्धाचा ॥ ४ ॥
पिपा बदलला चित्र बदलले ।
आजानुबाहू विराट दिसले ।
सामीप्याचे द्वार उघडले ।
राजा कारुण्याचा ॥ ५ ॥