Lyrics of Aniruddha Path from album Aniruddha Path

॥ हरि ॐ ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
वाचे घेता नांव जाई अहंभाव ।
येई सोऽहंभाव उदयासी ॥
जे हो गुरुनाम तेचि हरिनाम ।
जाणा हेचि वर्म भक्तीपंथी ॥
रामकृष्ण हरी बापू त्रिपुरारी ।
राहो ओठावरी नाम सदा ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अनिरुद्ध हरी मंत्र षडक्षरी ।
वाचे जो उच्चारी तो तरला ॥
अनिरुद्ध हरी जपे जो अंतरी ।
कामादि सहा अरि तेणे जिंकले ॥
अनिरुद्ध हरी स्मरा निरंतरी ।
तेणे मुक्ती चारी होती सिद्ध ॥
अनिरुद्ध हरी या नामगजरी ।
प्रगटे समोरी महाविष्णू ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अनिरुद्ध माझा वैकुंठीचा राजा।
मज तन्नामाचा जडो छंद ॥
हृदयाचे स्पंदन श्वासाचे चलन ।
होवो त्यात गान अनिरुद्ध ॥
परा व पश्यन्ती मध्यमा वैखरी ।
गावोत एका स्वरी अनिरुद्ध॥
नसांत भिनावे रक्तात भिजावे ।
कंठी प्रगटावे गुरुनाम ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नाम हे पावन जेथे याचे गान ।
तेथे नारायण प्रतिष्ठित ॥
सोपे हे साधन नामसंकीर्तन ।
तेणेचि प्रसन्न चक्रपाणी ॥
हरिनामाहून गुरुनामस्मरण ।
आवडे हे कथन केशवाचे॥
हरी तो निर्गुण होऊनिया सगुण ।
केले नामधारण अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
बापू साईनाथ स्वामी तो समर्थ ।
तोचि एक नाथ अनाथांचा ॥
द्वारकामाईत होता जो राहात।
शिरडीचा संत अनिरुद्ध ॥
अक्कलकोटास होता ज्याचा वास ।
संतावतंस तो अनिरुद्ध ॥
तीही रुपे पूर्ण आज ही तो पूर्ण ।
सर्वथा संपूर्ण अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
गुरु मकरंद यांचे राखी ब्रीद ।
ऐसा शिष्यकोविद अनिरुद्ध ॥
स्वामी आणि साई दोघे भिन्न नाही ।
हेचि तत्व देई अनिरुद्ध ॥
गुरु आणि भक्त होता एक चित्त ।
काही ना रहात अशक्य जगी ॥
ऐसी शिकवण आम्हासी देऊन ।
दिले सोपे साधन अनिरुद्धे ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अनिरुद्ध नाम गाई जो सप्रेम ।
त्यास नित्यनेम भेटे हरी॥
गुरुनाम गोड ज्यास याचे वेड ।
कैवल्याचे झाड त्याच्या द्वारी ॥
अनिरुद्धपाठ पंढरीची वाट ।
चाले जो ही नीट तो उद्धरे ॥
नाम अनिरुद्ध पूर्ण ब्रह्म शुद्ध ।
करी हे समृद्ध साधकासी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नाम हा साबण चित्त जे मलीन ।
त्याचे प्रक्षालन करीत असे ।
नाम हरे भीती मना देई शक्ति ।
तेणे घडे भक्ती नवविधा ॥
घेऊनिया हाती नामाचा हातोडा ।
भिंत सारी पाडा तेलियाची ॥
तारेल संसारी नामाची ही होडी ।
नेई पैलथडी सुखेनैव ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अव्यक्ते आकारा आला हा पसारा ।
त्याच्या पैलपारा हरी राहे ॥
हरीचे जे स्थान तेचि गुरुस्थान ।
नाही दोघे भिन्न एकरुप ॥
हरीहूनी श्रेष्ठ परि गुरुतत्व ।
गुरुचे महत्व सर्वोपरी ।
वंदी नारायण गुरुचे चरण ।
ऐसे नाथवचन भागवती ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
गुरु आणि हरी दोघे उभे समोरी ।
पाय आधी तरी गुरुचे धरा ॥
हरीच्या अगोदर गुरुनाम घ्यावे ॥
सर्वाआधी वंदावे गुरुदेवा ॥
गुरुने दावीला गोविंद आम्हाला ।
म्हणूनि तयाला आधी स्मरु ॥
गुरु व गोविंद आम्हा अनिरुद्ध ।
नाम त्याचे सिद्ध कालत्रयी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
गुरुनामजप निरसी विकल्प ।
करी एकरुप सद्गुरुसी ॥
नाम हे जपता पावे शिष्य गुरुता ।
ऐसी ही महत्ता गुरुनामी ॥
गुरुनाम घ्या हो फोडूनिया टाहो ।
येईल पहा हो धावुनि हरी ॥
विष्णू अविनाशी भुले ना मायेसी ।
परि नामी त्यासी ओढ भारी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
गुरुनाम घेऊन जावे त्या शरण ।
करावे रुदन विरहाने ॥
आम्ही तुझे भक्त कैसे रे व्यथित ।
करी रे कृतार्थ आम्हा आता ।
ऐसे जो वदून करील क्रंदन ।
द्रवेल हरिमन करुणेने ॥
सद्गुरुचे नाव विरहाचा भाव ।
यांनी वासुदेव भेटे झणी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नामाचा पुकार इतुका प्रखर ।
वैकुंठी ना स्थिर राही नरहरी ॥
प्रल्हादाचा शब्द राखे नरहरी ।
आला स्तंभांतरी प्रगटून ॥
गजेंद्राची हाक जैसी परिसूनी ।
येई चक्रपाणि गरुडावरी ॥
ऐसा बहुतांसी नामे प्राप्त झाला ।
हरी ना निराळा नामाहुनी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नामप्रेमे हरी पावे नामदेव ।
नामे ज्ञानदेव होई ज्ञानी ॥
नामाचा विस्तार आहे हो केवढा
। आकाशाएवढा नामे तुका ॥
सद्गुरुनामात रमे एकनाथ ।
झाला भागवत नामे एका ॥
सार्या संतांचा हा एकचि विचार ।
नाम हेचि सार दृढ धरी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नामातच राम नाम आत्माराम ।
नाम हा विराम संसृतीचा ॥
नामे हनुमान करी हो उड्डाण ।
नाम हे विमान श्रीरामाचे ॥
नामे सागरात तरले पाषाण ।
मग का कठीण मानवासी ॥
अनिरुद्धराम हेचि एक नाम ।
ज्याचे शिवा प्रेम अनिवार ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
हरी हर यात मानतो जो द्वैत ।
त्याचा परमार्थ व्यर्थ झाला ॥
दोघांचे एकत्व दावी गुरुदेव ।
ऐसी आहे माव सद्गुरुंची ॥
हरी हर मिळून झाले अवतीर्ण ।
गुरुरुपे दर्शन देती आम्हा ॥
जो विष्णु मुरारि तोच त्रिपुरारि ।
एक तो सर्वांतरी अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
हरीनाम घेता भेटे गुरु भक्ता ।
गुरुनाम घेता लाभे हरी ॥
होता हरी प्रसन्न भेटवी गुरुसी । लावी सत्पथासी गुरुरुपे ॥
सद्गुरुशिवाय ना दुजा उपाय ।
जोडण्या ते पाय श्रीहरीचे ॥
गुरु अनिरुद्ध भेटता अतूट ।
होई हरी प्रगट आपोआप ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नाम दोन अक्षरे सद्गुरुचरण ।
ठेवा घट्ट धरुन अहर्निश ॥
सद्गुरुंचे पाय ज्याने दृढ धरीले ।
त्यास भय नुरले कळिकाळाचे ॥
नामे गळे अहम उमळते प्रेम ।
मिळे पद परम नामामुळे ॥
नको योग ज्ञान वेद मीमांसन ।
सोपे हे सोपान गुरुनाम ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नामे मनःशुद्धी नश्यते कुबुद्धी ।
साधते समृद्धी विवेकाची ॥
विवेकाच्या बळे वैराग्य उजळे ।
तेणे श्रद्धा फळे गुरुवरी ॥
श्रद्धा बळकट सबूरीची वाट।
गुरुच्या निकट नेई त्वरे ॥
विवेक वैराग्य श्रद्धा व सबूरी ।
नामे प्राप्त चारी साधकासी ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
शास्त्रांचे हे शास्त्र मंत्राचा हा मंत्र ।
नाम हे पवित्र अनिरुद्ध ॥
दर्शने कुंठली वादात गुंतली ।
तेथ नामे केली सुखपूर्ती ॥
वेद त्रिगुणात अडकूनी गेले ।
नामे उल्लंघीले त्रिगुणासी ॥
एक नाम नेई त्रिगुणाच्या पार ।
ऐसे नाम थोर अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नामाचा हा वन्हि चेतविता मनी।
पापराशी जळुनी जाती सार्या ॥
नामरुपी आप हरी भवताप॥
होई निर्विकल्प मनोवृत्ती ॥
विष्णुपदतीर्थ नाम हे पावन ।
करा रे प्राशन हृदयाने ॥
नाम तोडी पाश नाम मुक्ताकाश ।
नाम हा प्रकाश कैवल्याचा ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
नाम भागीरथी शिव धरी शिरी ।
पितरे उद्धरी नामगंगा ॥
नाम मोरपीस प्रिय श्रीहरीस ।
शोभे मुकुटास गोपाळाच्या ॥
कृष्णाचे स्वरुप कोणा न कळले ।
गोपांनी जाणले नामप्रेमे ॥
रामकृष्ण हरी विठ्ठल गोविंद ।
तोच अनिरुद्ध सदाशिव ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अध्यात्माच्या दुग्धी भक्ती नवनीत ।
नाम तेथ घृत सार त्याचे ॥
साराचे हे सार भक्तीचे माहेर ।
नाम मूलाधार महाविष्णुचा ॥
इतर धावती मुक्तिचिया पाठी ।
नाम घेता पाठी लागे मुक्ती ॥
सगुणभजने निगुर्णाची प्राप्ती ।
ऐसी फक्त शक्ती नामामध्ये ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
अनिरुद्धपाठ सद्गुरुंचा माठ ।
हरीची ही पेठ गुरुनाम ॥
कासवीचे दृष्टी पोसे गुरुभक्ता ।
येई नाम घेता हा अनुभव ॥
गुरुनामचिंतनी जो लीन राहे।
त्याची चिंता वाहे अनिरुद्ध ॥
कधीही कुठेही कुणीही हे घ्यावे ।
वाचे आळवावे अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
निंदा वाद बरळ हा वाचेचा विटाळ।
हाती घ्यावे टाळ गावे नाम ॥
नाम एकतारी गर्जे ज्याच्या घरी ।
तेथेच श्रीहरी नित्य वसे ।
अनिरुद्ध नामे लागले ज्या वेड ।
अव्यक्तापल्याड तोचि पावे ॥
योगीन्द्र हा दास अनिरुद्ध नाथ ।
त्यानेच हा पाठ वदवीला ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥
पाठ करी नित्य राखुनि सातत्य ।
त्यास दिसे सत्य बापुरुप ॥
गाई भक्तिभावे नामाचे पोवाडे ।
त्याच्या चोहीकडे बापू उभे ॥
नामाचा जो झाला नामी जो बुडाला ।
त्याचा रखवाला अनिरुद्ध ॥
अनिरुद्ध योगे योगीन्द्र हा धन्य ।
धरीले अनन्य गुरुनाम ॥
अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा ।
दुःखियांचे दुःख बापू हरी ॥